For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

12:16 PM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया
Advertisement

येळ्ळूर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने समस्या : 20 दिवस उलटूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर/येळ्ळूर

येळ्ळूर गावाला पाणीपुरवठा करणारी छत्रपती शिवाजी रोडवरील जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असून 20 ते 23 दिवस झाले तरी ग्रामपंचायत व पीडीओ यांना जाग नाही. एकीकडे गावातील काही भागात पाण्यासाठी तासन्तास नळाजवळ महिलांना ताटकळत उभे रहावे लागते. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. छत्रपती शिवाजी रोडवरील शेतकरी विकास संघाच्या दारात व नवहिंद मल्टिपर्पजसमोर अशा दोन ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत. जलवाहिनीतील पाणी सरळ गटारीमध्ये जात असल्याने पाण्याचा लोंढा रस्त्यावर नाही. याबाबत ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी कळवले असूनही केवळ कर्मचाऱ्यांनी वरवर पाहणी केली. पण जलवाहिनी दुरुस्तीबाबत कोणतीच हालचाल केली नाही. त्यामुळे गेल्या 20 ते 25 दिवसात हजारो लिटर पाणी वाया जावूनही गावगाडा चालवणाऱ्या मंडळींना याचे देणेघेणे नाही, अशी स्थिती झाली आहे. गावात अनेक ठिकाणी जलवाहिनीला लहान-मोठे छेद गेले असल्याने गावात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. याबाबत तक्रार करूनही केवळ चालढकल केली जाते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Advertisement

24 तास पाणीपुरवठा योजनेमुळे नागरिकांचा भ्रमनिरास

गावाला 24 तास पाणी पुरवठा करणार म्हणून जलजीवन मिशन योजनेद्वारे कोट्यावधी रुपये खर्च करून गावात नव्याने जलवाहिन्या घालण्यात आल्या. घरोघरी नळ देण्यात आले. पण 24 तास पाणी येणाऱ्या नळाला 24 दिवसातून एकदा पाणी येते. अशा स्थितीमुळे ग्रामस्थांचा फार मोठा भ्रमनिरास झाला आहे. पूर्वीची जलनिर्मल योजना व आताच्या जलजीवन मिशन योजनेमध्ये फारसा फरक नाही. तेव्हापण नळाला आठवड्यातून एक, दोनदा व आताही तीच स्थिती. मग कोट्यावधी रुपये खर्चून पाणी नसेल तर फायदा कोणाचा झाला? हा संशोधनाचा विषय आहे.

300 मीटरवरून पाणी आणण्याची महिलांवर वेळ

गावातील पाणी व्यवस्थापनेचे तीनतेरा वाजले असून काही ठिकाणी पाणी दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर जाते. तर काही ठिकाणी ठिबक सिंचन सुरू असते. गल्लीतील सार्वजनिक नळांची हिच तऱ्हा असून कमी-जास्त दाबामुळे नळावर वाद होतातच. महिलांचा सकाळचा अधिकतम वेळ हा नळावरच जातो. हनुमान नगर, चांगळेश्वरी नगरसारख्या उपनगरांमध्ये एखाद दुसरा सार्वजनिक नळ असल्याने महिलांना तासन्तास ताटकळत नळाजवळ उभे रहावे लागते व घागऱ्या मोजून पाणी भरावे लागते. नळ जवळ नसल्याने 300 मीटरची पायपीट करून पाणी भरावे लागते.

ग्रा. पं.ने वेळीच लक्ष घालण्याची मागणी

वस्ती वाढल्यामुळे नव्याने सार्वजनिक नळांची मागणी करून सहा-सहा महिने झाले. निवेदनही दिले. पण केवळ वेळकाढू व आश्वासनापलीकडे पदरात काहीच पडले नाही, असे हनुमाननगर व चांगळेश्वरी नगरातील महिलांनी यावेळी सांगितले. जनतेच्या सुखासाठी आणि गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत व पी.डी.ओ.सह अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी यात वेळीच लक्ष घालून गावातील पाणी समस्या दूर करावी. नाहीतर येत्या काही दिवसात याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असे एकंदरीत चित्र आहे.

निदान फिल्टरपंप तरी 24 तास सुरू ठेवावा

गावातील पिण्याच्या पाण्याच्या तऱ्हा बघता पिण्याच्या पाण्याच्या वापरासाठी गावातील बारा घडघड्याच्या विहिरीवर फिल्टरपंपाची सोय असून बहुतांश ग्रामस्थ येथील पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. पण फिल्टरपंप कधी नादुरुस्त होईल आणि झालाच तर कधी दुरुस्त होईल हे निश्चित नसल्याने पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांमध्ये नेहमीच रुखरुख लागून राहिलेली असते. निदान फिल्टरपंप तरी 24 तास सुरू रहावा, अशी व्यवस्था ग्रामपंचायतीने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.