Ambabai Temple Kolhapur : दीपावलीनिमित्त हजारो भाविक अंबाबाई चरणी !
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दीपोत्सवाची रंगत
कोल्हापूर : दीपावली आणि नरक चतुर्दशीच्यानिमित्ताने सोमवारी दिवसभर करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. या गर्दीत स्थानिकांची संख्या जास्तीची होती. दुसरीकडे दसरा चौक व बिंदू चौकातील वाहनतळावरुन मिळालेल्या माहितीनुसार परजिल्ह्यातील भाविकही दुपारच्या सुमारास अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापुरात मोठ्या संख्येने दाखल आले होते.
बहुतांश स्थानिक व परजिल्ह्यातील भाविक हे दीपावलीच्या औचित्यावर नवनवीन कपडे परिधान करुनच अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. अनेकांच्या कपड्यांवरील सुवासित सेंट, अत्तराचा सुगंध मंदिर आवार व परिसरात दरवळत होता. दरम्यान, दीपावली व नरक चतुर्दशीच्या औचित्यावर अंबाबाईची नरकासुराचा वध या स्वरूपात अशी पूजा बांधली होती. श्रीपूजक नारायण कुलकर्णी व सहकाऱ्यांनीही पूजा बांधली. या पूजेचा फोटो देवस्थान समितीच्या वतीने आपल्या सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटवरुन व्हायरल करण्यात आला होता.
स्थानिक भाविकांनीही पूजेचा फोटो सोशल मीडियाद्वारे पै-पाहूणे, मित्र मंडळांना शेअर केला होता. तसेच दुपारी चारनंतरही अंबाबाईच्या या खास पूजेचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा स्थानिक भाविकांची पाऊले मंदिराकडे वळली होती. मात्र अनेकांनी मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळील दर्शन मंडपातून 73 मंदिरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेण्याऐवजी मुखदर्शन घेण्यालाच प्राधान्य दिले.
परगावच्या भाविकांनी मात्र दर्शन मंडपातून जाऊन अंबाबाईचे दर्शन घेत मनोकामना व्यक्त केली. दुपारी १२ पासून ते अगदी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दर्शन मंडप भाविकांनी कमी अधिक प्रमाणात भरतच होता.अनेक भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनानंतर थेट सराफ व्यावसायकांची गुजरी गाठली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह महाद्वार रोड, ताराबाई रोड व लक्ष्मी रोडवरील दुकानांमध्ये जाऊन कपडे, साड्यांची मनसोक्त खरेदी केली.
काहींनी गृहपयोगी वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दीपावली पाडव्यासाठी लागणाऱ्या वह्या आणि चोपडीसुद्धा भाविकांकडून खरेदी करण्यात आली. अनेकांना चप्पल लाईनला जाऊन कोल्हापूरी चप्पलचीही खरेदी करण्याचा मोह अवरता आला नाही. रात्री उशिरापर्यंत खरेदीचा माहौल होता. त्यामुळे अंबाबाई मंदिराभोवतालच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली होती.