पेडण्याच्या पुनवेला हजारो भाविकांनी घेतले दर्शन
श्रीदेवी भगवती ,श्रीदेव रवळनाथ, भूतनाथ तरंगाचे भाविकांनी घेतले दर्शन
पेडणे : पेडण्याच्या प्रसिद्ध दसरोत्सव आणि पुनवेला काल गुरुवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी श्री देवी भगवती मंदिर, श्री देव रवळनाथ तसेच आदीस्थानात ठेवण्यात आलेल्या देव रवळनाथ आणि देव भूतनाथ यांच्या तरंगांचे दर्शन घेतले. सकाळपासूनच पावसाचे सावट पेडण्याच्या दसरा आणि पुनवेवर होते. ढगाळ वातावरण, पावसाचा शिडकाव यामुळे भाविकांमध्ये निरुत्साह जाणवला. भगवती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भरलेली फेरी आणि विविध प्रकारचे मांडण्यात आलेल्या स्टॉलच्या मालकांत कमी ग्राहकांमुळे नाराजी दिसून आली. पावसाचे वातावरण असल्यामुळे फेरीत मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थिती लावू शकले नाहीत. मात्र सकाळपासूनच भगवती मंदिरात रांगा लागलेल्या होत्या.
भगवती मंदिरात श्रीदेवी भगवतीचे सुवासिनीनी ओटी भरून तसेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले. सायंकाळी केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, अॅड. सिद्धी आरोलकर, नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, नगरसेविका उषा नागवेकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक माधव सीनाई देसाई, देवस्थानचे संयुक्त खजिनदार श्रीधर देसाई, सरपंच सुबोध महाले, माजी सरपंच भूषण नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, महेश परब, नरेश कोरगावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, पंच कल्पिता कलशांवकर, ऊद्रेश नागवेकर, प्रकाश कांबळी, कल्पेश कलशांवकर, मंथन परब आदी उपस्थित होते.