शक्तीपीठ विरोधी मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे आवाहन
शिरोळ येथे शक्तीपीठ विरोधी कृती समितीची बैठक
कोल्हापूर
राज्य सरकारच्यावतीने धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा निर्णय शेतकऱ्यांना भुमीहीन करून सामान्य जनतेलाही देशोधडीला लावणारा आहे. त्यामुळे मुंबई येथील विधानभवनावर १२ मार्च रोजी होणाऱ्या शक्तीपीठ विरोधी मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले.
शक्तीपीठ महामार्ग विरोधात विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी शक्तीपीठ विरोधी कृती समितीची बैठक झाली.
बैठकीमध्ये बोलताना शेट्टी म्हणाले, शक्तीपीठ महामार्गासाठी शासनाकडून लाखो शेतकऱ्यांची हजारो एकर संपादित केली जाणार आहे. राज्यामध्ये विकास झाला पाहिजे पण विकास होत असताना शेतकऱ्यांचे शोषण करून अथवा शेतकऱ्यांचा बळी घेऊन विकास करणे हा विकास अभिप्रेत नाही. सध्या शक्तीपीठ महामार्गास समांतर असा रत्नागिरी-नागपूर महामार्ग सुरू असल्याने पर्यायी महामार्गाची आवश्यकता नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सहापदरी रस्त्यासाठी जास्तीत जास्त 35 कोटी रूपये खर्च होत आहे. मात्र शक्तीपीठ महामार्गाचा १ किलोमीटर रस्त्यासाठी १०८ कोटी रूपयाचा खर्च करण्यात येणार आहे. राज्य सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या संगनमताने जवळपास ५७ हजार कोटीचा भ्रष्ट्राचार शक्तीपीठ रस्त्याच्या माध्यमातून होणार आहे. टोलच्या माध्यमातून सामान्य जनतेची पिळवणूक होणार असून रत्नागिरी नागपूर व शक्तीपीठ या दोन समांतर रस्त्यांचा प्रकल्प खर्च व टोलमधून मिळणारे उत्पन्न ग्रहीत धरल्यास किमान ४० ते ५० वर्षे जनतेला टोल भरावा लागणार आहे.यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संघटीत करून हा लढा तीव्र करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. बैठकीस गिरीष फोंडे, सम्राट मोरे, अजित पोवार, डॉ. बाळासाहेब पाटील, मायकल बारदेस्कर, शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते.