Solapur News : चैत्र चंपाषष्ठी यात्रेला हजारोंचा जल्लोष; ‘येळकोट’च्या जयघोषात उत्सव दणदणला
श्री खंडोबा चैत्र चंपाषष्ठी यात्रेला भाविकांची उसळलेली गर्दी
सोलापूर : बाळे येथील श्री खंडोबा देवाची पारंपरिक चैत्र चंपाषष्ठी यात्रा यंदा २६ नोव्हेंबरपासून उत्साहात सुरू झाली आहे. यंदाच्या यात्रा महोत्सवात चंपाषष्टीनंतरच्या पहिल्याच रविवारी सकाळपासूनच हजारो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 'यळकोट... यळकोट.. घे..' च्या जयघोषाने यावेळी मंदिर परिसर दुमदुमला होता. यावेळी मंदिर परिसर भंडारांनी न्हावून निघाला.
मार्तंडभैरव, मल्हारराजा म्हणूनप्रसिद्ध असलेल्या बाळे येथील मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभझाला. पहाटे ५ वाजता काकडा आरती केल्यानंतर सकाळी ८ वाजता 'श्रीं'ना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास अभिषेक करण्यात आल्यानंतर देवांना पुरणपोळी, बाजरीची भाकरी, साखरभात, तूप, भरीत, रोडगा असा नैवेद्य दाखवण्यात आला. यानंतर मंदिरातील तळी उचलणे, बारू सोडणे, जागरण गोंधळ आदी कार्यक्रमांना सुरुवात झाली.
सायंकाळी ८ वाजता 'श्रीं' ची महापूजा झाल्यानंतर यात्रेतील मानकरीयांच्या उपस्थितीत छबीना मिरवणुकीस प्रारंभ झाला. मंदिराच्या उत्तर दरवाज्यातून सुमारे ९ वाजता छबिना मंदिराबाहेर येताच 'येळकोट येळकोट घे' चा गजर बाळे परिसरात घुमला. मंदिरातून निघालेली छबीना मिरवणूक नंदीकट्टामार्गे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणातआल्यानंतर लंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पुन्हा श्री मांगोबा मंदिर मार्गे मंदिराच्या पूर्व महादरवाज्यातून छबीना मंदिरात आला. त्यानंतर 'श्रीं'ची आरती केल्यानंतर मानकऱ्यांना मानाचा विडा देऊन पहिल्या रविवारच्या यात्रेचा समारोप करण्यात आला.