For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हजारोंच्या साक्षीने धोंडगणांचे अग्निदिव्य पार

12:21 PM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
हजारोंच्या साक्षीने धोंडगणांचे अग्निदिव्य पार
Advertisement

देवी लईराईनेही पूर्ण केला आपला पण : जत्रोत्सव अमाप उत्साहात, अलोट गर्दीत साजरा,चार दिवशीय कौलोत्सवाला प्रारंभ

Advertisement

डिचोली : सहा वर्षांच्या खंडानंतर मयेतील देवी केळबाईने आपण डोक्यावर अग्नी घेऊन नाचण्याचा पण पूर्ण केल्यानंतर देवी लईराईनेही अग्निदिव्यातून मार्गक्रमण करण्याचा आपला पण काल सोमवारी पहाटे पूर्ण केला. आपल्या असंख्य धोंडगणांनंतर स्वत: अग्निदिव्य पार करून देवी थेट चव्हाटा येथे रवाना झाली. हा देवीचा पण प्रत्यक्ष डोळ्यात भरून घेण्यासाठी शिरगावात हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. सर्वांच्या चेहऱ्यांवर अमाप उत्साह ओसंडून वाहत होता. देवीच्या अग्निदिव्य मार्गक्रमणानंतर जत्रोत्सवाची सांगता झाली. तर चार दिवस कौलोत्सव चालणार आहे. शिरगावातील देवी लईराईच्या जत्रोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि दिमाखात प्रारंभ झाला होता. सकाळपासूनच शिरगावात भाविकांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. दुपारी मंदिरातून बाहेर काढून मु•ाr येथे मूळ आदिस्थानात नेण्यात आलेली चिरा (देवीची उत्सवमूर्ती) रात्री 8.30 च्या सुमारास नाचत, गाजत पूर्ववत मुख्य मंदिरात आणण्यात आली. रात्री देवीचा कळस असंख्य धोंडगणांच्या उपस्थितीत मंदिरातून बाहेर काढण्यात आला. कळसाने होमकुंडाला अग्नी दिल्यानंतर देवीचा कळस पवित्र तळीवर स्नानासाठी गेला. कळस तळीवर गेल्यानंतर सर्व धोंडगणांनी होमकुंडाला देवीच्या नामघोषात प्रदक्षिणा मारली आणि धोंडही पवित्र तळीवर स्नानासाठी रवाना झाले. देवीच्या स्नानानंतर कळस मु•ाr येथे मंदिरात ठेवण्यात आला. धोंडगणांनी तळीवर स्नान केल्यानंतर मु•ाr येथे मंदिरात उपस्थिती लावली. तेथे धोंडगणांना देवीचा प्रसाद म्हणून मोगरीच्या कळ्या देण्यात आल्या. सदर कळ्या तोंडात ठेऊन सर्व धोंडगण अग्निदिव्य मार्गक्रमणासाठी सज्ज झाले.

होमकुंडातील सर्व लाकडे पेटून निखारे तयार होऊ लागताच सदर निखारे एक-एक बाजूने काढून थर रचण्यास प्रारंभ झाला. एका बाजूने निखाऱ्यांचा थर तयार होताच धोंडगणांनी अग्निदिव्य मार्गक्रमणास प्रारंभ केला. रात्री अडीच वा. च्या सुमारास धोंडगणांच्या मार्गक्रमणास प्रारंभ झाला होता. पहाटेपर्यंत सर्व धोंडगणांनी अग्निदिव्य पार केल्यानंतर पहाटे देवीच्या कळसाने अग्निदिव्य पार करून आपला पण पूर्ण केला. अग्निदिव्य पार केल्यानंतर देवीच्या कळसाने थेट चव्हाटा येथे कुच केली. पहाटे कळस चव्हाटा येथे ठेवण्यात आला. दुपारपर्यंत शिरगावात आलेल्या भाविकांनी कळसाचे चव्हाटा येथे दर्शन घेतले. तर संध्याकाळी देवीच्या कौलोत्सवाला प्रारंभ झाला. कळस थेट मानसवाडा येथे दाखल झाला आणि येथून भाविकांच्या घरांना भेटी देण्यास प्रारंभ केला. देवीचे आपापल्या अंगणात स्वागत करण्यासाठी भाविकांनी चांगलीच तयारी केली आहे. गुरुवार 16 मेपर्यंत शिरगावात कौलोत्सव चालणार आहे. तर त्याच दिवशी रात्री विधीवतपणे देवी मंदिरात प्रवेश करणार असून या जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. राज्यभरातील आणि राज्याबाहेरील देवीच्या भाविकांची या कौलोत्सवाला मोठी गर्दी असते.

Advertisement

Advertisement
Tags :

.