बाप्पांची उपासना करणारे ब्रह्म पावतात
अध्याय सातवा
मायामोहाने मूढ बनलेला जीव केवळ देहसुखाचाच विचार करतो. त्यापलीकडे काही आहे हे तो लक्षातच घेत नाही. साहजिक उध्दार होण्याच्या दृष्टीने त्याच्या हातून कोणतेच वर्तन घडत नाही. त्यामुळे तो जन्ममृत्युच्या चक्रात म्हणजे संसार चक्रात अडकतो. ह्यातून कसे सुटायचे हेच त्याला कुणी समजावून सांगत नाही. जे संत साहित्याचा अभ्यास करतात त्यांच्या हे लक्षात येतं की, परब्रह्म, परमात्मा हा आपल्या जीवनाचा सूत्रधार असून तो आपला हितकर्ता आहे. आपण त्यांची भक्ती करावी म्हणजे तो आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला ह्या चक्रातून सुटण्याचा मार्ग दाखवेल. म्हणून जे ईश्वराची म्हणजे त्याचे सगुण रुप असलेल्या बाप्पांची भक्ती करतात, त्यांना संसारचक्रातून सुटका व्हावी म्हणून मार्ग दाखवण्यास ते तत्पर असतात. योगाभ्यास करून जे त्यात प्राविण्य मिळवतात. त्यांना सूर्यमार्गाने जाऊन परब्रह्मात विलीन होणे सहज शक्य होते. मात्र सामान्य संसारी जनांना योगाभ्यास करून सूर्यमार्गाने जाणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन संसारचक्रात गुरफटून गेलेल्या सामान्य लोकांचा उद्धार होण्याच्या दृष्टीने, काही सोपी साधने बाप्पा पुढील श्लोकातून सांगत आहेत. ते म्हणतात,
ये मां सम्यगुपासन्ते परं ब्रह्म प्रयान्ति ते ।
ध्यानाद्यैरुपचारैर्मां तथा पञ्चामृतादिभिऽ ।। 6 ।।
स्नानवस्त्राद्यलंकारसुगन्धधूपदीपकैऽ ।
नैवेद्यैऽ फलतांबूलैर्दक्षिणाभिश्च योऽर्चयेत् ।। 7।।
भक्त्यैकचेतसा चैव तस्येष्टं पूरयाम्यहम् ।
एवं प्रतिदिनं भक्त्या मद्भक्तो मां समर्चयेत् ।। 8।।
अर्थ-जे माझी योग्य प्रकारे उपासना करतात ते ब्रह्म पावतात. ध्यान आदिकरून उपचारांनी, तसेच पंचामृतादिकांनी, स्नान, वस्त्रs, अलंकार, सुगंध, धूप, दीप, नैवेद्य, फल, तांबूल आणि दक्षिणा यांनी भक्तिपूर्वक एकचित्ताने जो माझी रोज पूजा करतो त्याला इष्ट फल प्राप्त होते.
विवरण- समाधी मार्गाने जाऊन जे भक्त ईश्वराचे ध्यान करतात ते धन्य होतात पण हा मार्ग अत्यंत खडतर असल्याने सर्वांना रुचेल व पचेल असे नाही. त्यासाठी अत्यंत एकाग्रतेची आवश्यकता असते आणि ती चित्तशुद्धीच्या प्रमाणात होते. म्हणून समाधीमार्ग हा प्रगत साधकांसाठी आहे असे म्हंटले जाते. जे नव्याने साधना सुरु करू इच्छितात अशा भक्तांनी निर्गुण काय आहे हे समजून घ्यावे आणि सगुणाची उपासना करावी असे श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. परमार्थ साधण्यासाठी त्यांनी अत्यंत आदराने ईश्वराच्या सगुण रूपाची म्हणजे बाप्पांची यथाशास्त्र पूजा आवश्य करावी. त्याचे फळ म्हणून त्यांची चित्तशुद्धी होऊन हळूहळू समाधी मार्गाची जिज्ञासा उत्पन्न होऊ लागते व नंतर ब्रह्मप्राप्ती होते. प्रथमत: बाप्पांच्या सगुण रूपाचे ध्यान करावे. नंतर आवाहन करून बाप्पाना बसण्यासाठी आसन द्यावे. मग षोडशोपचारे पूजा करावी. बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वांना विशेष स्थान आहे. मग धूप दीप समर्पण करावे. शेवटी नैवेद्य दाखवावा. मनोभावे नमस्कार करून तीर्थ प्रसाद ग्रहण करावा. जो बाप्पांच्याबद्दल आदरपूर्वक प्रेमाने, एकनिष्ठ भावाने पूजा करेल त्याला त्याच्या पूजेचं योग्य ते फळ बाप्पा देतात.
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा ।
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै ।
नारायणयेति समर्पयामि ।
हा भागवतातील प्रसिद्ध श्लोक असे सांगतो की, कायेने, वाचेने, मनाने, इंद्रियांनी, बुद्धीने अथवा अनुकूल स्वभावाने मनुष्य जे जे करत असतो ते सर्व नारायणासाठीच आहे या भावनेने भक्त काया वाचा, मनाने जे जे करतो ते ते त्यांना समर्पित करतो.
क्रमश: