जे देवाचे स्वरूप जाणतात ते त्याच्यासारखेच होतात
अध्याय चौथा
भगवंत म्हणाले, साधूंचे रक्षण करण्यासाठी त्यांना त्रास देणाऱ्या दुष्टांचा नाश करण्यासाठी मी योगमायेच्या सहाय्याने जन्म घेतो. माझे जन्म घेण्याचे कारण आणि मी करत असलेली दैवी कर्मे जो जाणतो, तो पुरुष देहत्यागानंतर पुन: जन्मास न येता मला येऊन मिळतो. मी अजन्मा असूनही माझे जन्म घेणे आणि निक्रिय असूनही कर्म करणे, हे माझे अविकारस्वरूप जो जाणतो, तो परममुक्त असतो. तो माझ्याप्रमाणेच इंद्रियाने कर्म करीत असला, तरी कोणत्याही प्रकारच्या आसक्तीने बांधला जात नाही. तो निरपेक्ष असल्याने, देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही. त्याचा देह ज्यावेळी पंचत्वात विलीन होतो, त्या वेळी तो माझ्या स्वरूपी विलीन होतो. अविकारस्वरूप झालेल्या भक्तांच्या मन:स्थितीबद्दल बोलताना भगवंत पुढील श्लोकात म्हणाले, माझा आश्रय घेतलेले आणि आसक्ती व क्रोधरहित भक्त, तप व ज्ञान यांनी पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात.
नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय । झाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले ।। 10 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, जे माझे स्वरूप जाणतात ते माझ्यासारखेच होत असल्याने आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल शोक करीत नाहीत, त्यांचे मन इच्छारहित झालेले असल्याने अमुक एक इच्छा अपुरी राहिली म्हणून ते कुणावर रागावण्याचा प्रश्नच येत नाही. ते सदैव माझ्यातच गुंतलेले असतात, त्यामुळे माझ्या सेवेसाठी त्यांचे जगणे असते किंबहुना माझ्या सेवेसाठीच त्यांचा जन्म झाला आहे असे मानून ते जगतात. जे आत्मज्ञानाने संतुष्ट असतात. त्यांची विषयाची ओढ नष्ट झालेली असते. ते तपरूपी तेज्याच्या राशी असतात. ते तीर्थानादेखील पवित्र करणारे तिर्थरूप असतात. ते सहजच माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. ते माझेच स्वरूप झाल्याने त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कोणताही फरक रहात नाही. अशुद्ध सोन्यातले पितळ आणि काजळी निघून गेल्यानंतर शुद्ध स्वरूपातील सोने शिल्लक उरते त्याप्रमाणे भक्तातल्या इच्छा आणि अपेक्षा नाहीशा झाल्या की त्याला माझे स्वरूप प्राप्त होण्यासाठी वेगळे असे काहीच करावे लागत नाही. इच्छा आणि अपेक्षा नाहीशा होण्यासाठी ते यम-नियमांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने आचरण करतात, ते तपाने आणि ज्ञानाने शुद्ध होतात. त्यामुळे ते आणि मी नि:संशय एकरूप होतो.
पुढे एक गंमत सांगताना भगवंत म्हणतात, व्यवहारात देवघेव करत असताना माणसे एकमेकाशी अनुरूप वागत असतात. त्याप्रमाणे मीही वागतो. त्यामुळे लोक मला जसे भजतात, मीही त्यांना तसाच भजतो. माझे हे तत्व जाणणारे ज्ञानी लोक मी वागतो तसेच वागतात.
भजती मज जे जैसे भजे तैसा चि त्यास मी । माझ्या मार्गास हे येती लोक कोणीकडूनि हि ।।11 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जे माझी अनन्य भावाने भक्ती करतात, त्याप्रमाणे मीही त्यांच्यावर प्रेम करतो. तसं बघितलं तर लोकांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो परंतु माझे वर सांगितलेले तत्व न जाणल्याने त्यांच्या बुद्धीत वेगवेगळे विचार येत असतात. त्यातूनच मी एक असलो तरी माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात. मी नामरहित असताना मला अनेक प्रकारची नावे देतात. मी चर्चेचा विषय नसताना मला देव-देवी म्हणतात. वेगवेगळ्या कल्पनांनी संभ्रमित झालेले लोक, माझ्या ठिकाणी चांगला व वाईट असा भेद करतात.
क्रमश: