For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतकाळी ईश्वराचे स्मरण करणारे मुक्त होतात

06:28 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
अंतकाळी ईश्वराचे स्मरण करणारे मुक्त होतात
Advertisement

अध्याय सहावा

Advertisement

बाप्पा म्हणाले, भक्तांचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचा नाश करण्यासाठी ईश्वराने अवतार घेतलेले आहेत. रामकृष्णादि ईश्वरी अवतार पूर्वी होऊन गेले आहेत. त्यावेळी ईश्वर अवतार घेऊन समोर वावरत आहेत हेच बहुतेकांना समजले नव्हते किंवा स्वत:चे अस्तित्व सर्वोच्च मानत असल्याने त्यांनी राम कृष्णांना तुच्छ मानले. ते कामादि शत्रूंनी ग्रासले गेले असल्याने त्यांच्या हातून पापकर्मे घडत असतात. त्यामुळे त्यांना ईश्वरी तत्वाचे ज्ञान होत नाही. सगुण रूपात प्रत्यक्ष वावरत असलेल्या ईश्वराला ते ओळखू शकत नाहीत. माणसांना प्रापंचिक गोष्टींचीच देवाकडून अपेक्षा असते आणि ती सगुण रूपातील ईश्वर आपल्याला देऊ शकतो अशी त्यांची समजूत असते. निर्गुण, निराकार असं ईश्वराचं आत्मस्वरूप त्यांच्या जम्यातच नसतं कारण ते त्यांच्या मानवी डोळ्यांना दिसत नाही. ईश्वर अजन्मा असून अविनाशी आहे, आवश्यकतेनुसार अवतार घेऊन प्रकट होतो आणि लिलाकार्य संपलं की अंतर्धान पावतो पण लोकांना मात्र त्याचे जन्म व मृत्यू खरे वाटतात. कारण तो त्यांच्यासारखाच एक मनुष्य आहे अशी त्यांची धारणा असते.

ज्यांना ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली असते अशा क्वचित आढळणाऱ्या महात्म्यांना ईश्वरी तत्वाचे ज्ञान होते. सर्व जगाचा सूत्रधार तोच हे त्यांना समजते. नाटकाच्या प्रयोगात पडद्यामागील सूत्रधार स्टेजवर घडणाऱ्या घटना, त्यातील पात्रांच्या हालचाली यांचे नियोजन करत असतो. पात्रांना दिग्दर्शन करत असतो. त्यामुळे ती पात्रे प्रभावी होत असतात. त्यांची वर्तणूक, बोलणे, चालणे यांचा मोठा प्रभाव प्रेक्षकांच्यावर पडत असतो व ते समोरच्या घटना खऱ्या समजून त्यात समरस होतात. त्यांना फक्त समोर दिसणारी स्टेजवरची पात्रे व घटना यांचीच माहिती असते. त्या पाठीमागील सुत्रधाराचा हात त्यांना जाणवत नाही. त्याप्रमाणे सर्वसामान्य मंडळी मायेच्या आवरणाखाली वावरत असल्याने ईश्वराचे निर्गुण, निराकार रूप लक्षात न घेता सगुण, साकार रुपाला ते प्राधान्य देतात. सुत्रधाराला जशी स्टेजवरची व पडद्यामागे उभी असलेली सर्वच पात्रे दिसत असतात, मागे घडलेले व पुढे होणारे कथानक माहित असते त्याप्रमाणे ईश्वराला भूत, भविष्य व वर्तमान यासर्वांचे ज्ञान असते.

Advertisement

जे ज्ञानी लोक ईश्वराला जाणतात ते अंतकाळी श्रद्धेने ईश्वराचे स्मरण करून मुक्त होतात असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

य: स्मृतवा त्यजति प्राणमन्ते मां श्रद्धयान्वितऽ ।

स यात्यपुनरावृत्तिं प्रसादान्मम भूभुज ।। 16 ।।

अर्थ- हे राजा, श्रद्धेने युक्त होऊन जो अंतकाली माझे स्मरण करून प्राणाचा त्याग करतो त्याला माझ्या कृपेने पुन्हा जन्म मिळत नाही.

विवरण- जे श्रद्धेने धर्मग्रंथ वाचतात, कथा किर्तनाला जातात, ज्यांच्या घरात देवाबद्दलची श्रध्दायुक्त भक्ती पूर्वापार चालत आलेली आहे तसेच ज्यांना पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे ईश्वराची उपजतच आवड निर्माण झाली आहे किंवा जीवनात घडणाऱ्या काही इष्ट अनिष्ट प्रसंगामुळे ईश्वरी अस्तित्वाची जाणीव झालेली आहे त्यांना हा सर्व ईश्वराने मांडलेला मायेचा पसारा आहे हे लक्षात येतं व यात गुंतून पडण्यात अर्थ नाही याची जाणीव होते. यातून आपल्याला सोडवणारा केवळ ईश्वरच आहे हेही लक्षात येतं. अशी पार्श्वभूमी तयार झाली की, मनुष्य ईश्वराची भक्ती करू लागतो. हळूहळू त्यात त्याला अवर्णनीय आनंद मिळू लागतो. त्या कायम टिकणाऱ्या आनंदापुढे संसारिक गोष्टीतून मिळणारा, वस्तू, व्यक्ती व परिस्थितीवर अवलंबून असलेला आनंद त्याला गौण वाटू लागतो. त्यामुळे तो आनंद अधिकाधिक आणि अविरत मिळत रहावा म्हणून ते सदैव ईश्वराची भक्ती करत असतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.