For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जे शिकतात, तेच जिंकतात!

06:58 AM Aug 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
जे शिकतात  तेच जिंकतात
Advertisement

आयआयटी दिल्ली’तील दीक्षांत समारंभात पंतप्रधान मोदींचा कानमंत्र : युवकांना महत्त्वाचे संदेश

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, 8 ऑगस्ट रोजी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहत युवकांना सतत शिकत राहण्याचे आणि जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले. जे लोक शिकतात ते नेहमी यशस्वी होतात किंवा जिंकतात असे सांगत त्यांनी वेगाने बदलणाऱ्या जगात तंत्रज्ञान ही सर्वात मोठी शक्ती असल्याचे नमूद केले. येत्या 30-35 वर्षांत युवकांनी उचललेली पावलेच ‘विकसित भारता’ची दिशा ठरवतील यावरही त्यांनी भर दिला.

पंतप्रधानांनी दीक्षांत समारंभात पदवी आणि पदके प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आयआयटी दिल्लीचे युवक केवळ पदव्या घेऊन नव्हे, तर देशाच्या कठीण समस्या सोडवण्याच्या स्वप्नासह पुढे जात आहेत. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना घाबरून न जाण्याचा सल्लाही दिला. जर एखादी समस्या खूप मोठी वाटत असेल, तर तिचे लहान लहान भागांमध्ये विभाजन करून ती सोडवली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी आयआयटी दिल्लीच्या पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. या समारंभात 587 पीएचडी अभ्यासकांसह 3,000 हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्लीचे प्रतिष्ठित शैक्षणिक पुरस्कार उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रदान केले. यामध्ये राष्ट्रपती सुवर्णपदक, संचालक सुवर्णपदक, शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक आणि परफेक्ट टेन सुवर्णपदकांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समारंभादरम्यान विद्यार्थ्यांना संबोधितही केले. ते म्हणाले, ‘तुमच्या मनात कुठेतरी काहीतरी वेगळेच चालले असेल. मी काही बाबा बागेश्वर नाही, पण मला खात्री आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात काहीतरी विचार असतात. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे भविष्यासाठी काहीतरी दूरदृष्टी असलीच पाहिजे. जगाचे सामरिक समीकरण क्षणोक्षणी वेगाने बदलत आहे. या बदलाचे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती हेच आहे. पुढील 20 किंवा 30 वर्षांत जग कसे दिसेल हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. जग, तंत्रज्ञान, उद्योग आणि व्यवसाय हे सर्व बदलतील. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, “जे सतत शिकत राहतील तेच यशस्वी होतील”, असा कानमंत्र पंतप्रधानांनी उपस्थित युवावर्गाला दिला.

प्रत्येक पिढीची आव्हाने वेगवेगळी

प्रत्येक पिढीला तिच्या काळातील विशिष्ट आव्हानांना सामोरे जावे लागते आणि आपली राष्ट्रीय जबाबदारीही पार पाडावी लागते. पुढील 30 ते 35 वर्षांत तुम्ही जे काही कराल, त्याचा परिणाम ‘विकसित भारता’च्या दिशेने होणाऱ्या आपल्या प्रवासावर होईल. त्यामुळे, तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय देशासाठी कसा फायदेशीर ठरेल आणि कोणत्या गरजा पूर्ण करेल यावर आधारित असला पाहिजे, असेही पंतप्रधान म्हणाले.

पीएम संशोधन फेलोशिपची संधी

तुम्हा सर्वांसमोर आणखी एक मोठी संधी आहे आणि ती नवीन संधी संशोधन क्षेत्रात आहे. ‘पीएम संशोधन फेलोशिप’ आपल्या आश्वासक तरुणांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देत आहे. याचा लाभ आणि संधी प्रत्येकाने घ्यावे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. नवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील विज्ञान आणि संशोधनाला नवी चालना देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानची (नॅशनल रिसर्च फाउंडेशन) देखील स्थापना करण्यात आली आहे. संशोधन क्षेत्रासाठी 1 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या निधीची व्यवस्था केली जात आहे. ‘एक राष्ट्र एक वर्गणी’ (वन नेशन वन सबक्रिप्शन) या उपक्रमाद्वारे आता देशातील अगदी लहान शहरांमध्येही जगप्रसिद्ध संशोधन नियतकालिके कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध होत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

मला तुम्हा सर्वांचा अभिमान!

विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या विशेष प्रसंगाचा भाग होताना त्यांना आनंद होत आहे आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुकही आहे. ज्याप्रमाणे आज तुमच्या कुटुंबीयांना अभिमान वाटत आहे, त्याचप्रमाणे मलाही तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो. तुम्ही केवळ पदव्या मिळवत नाही, तर देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न पूर्ण करत आहात. आजच्या या कार्यक्रमात मुलींचे योगदान मोठे असलेले दिसते. आणखी काही मुली गुणवंत झाल्या असत्या तर परिस्थिती अधिक चांगली असती, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आयुष्याच्या परीक्षेत सर्व काही ‘अभ्यासक्रमाबाहेरचे’

कॅम्पसमधील शिक्षण आणि कॅम्पसबाहेरील जीवन यात फार मोठा फरक आहे. आयआयटीच्या परीक्षांना ठराविक अभ्यासक्रम असतो, पण आयुष्याच्या परीक्षेत सर्व काही ‘अभ्यासक्रमाबाहेरचे’ असते. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कोणते असाइनमेंट पूर्ण करायचे आणि कोणत्या परीक्षा द्यायच्या हे माहीत असते, पण आयुष्यात खरा प्रश्न काय आहे, हे त्यांना अनेकदा स्वत:च ठरवावे लागते, असा महत्त्वाचा मुद्दाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मांडला.

Advertisement
Tags :

.