ज्यांना ब्रह्म आणि अध्यात्मकर्म म्हणजे काय हे समजलेले असते ते जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलेले असतात
अध्याय आठवा
ह्या अध्यायाचे नाव अक्षरब्रह्मयोग असे आहे. सातव्या अध्यायात भगवंतांनी त्यांनी मांडलेल्या अखिल विश्वाच्या प्रपंचाची माहिती अर्जुनाला सांगितली आणि म्हणाले, माणसाच्या मनात एखाद्या विषयी प्रेम किंवा एखाद्याबद्दल द्वेष ह्या दोन टोकाच्या भावना असतात, त्याला द्वंद्व असे म्हणतात. ह्या द्वंद्वामुळे माणसे मोहात पडतात. ज्यांना सर्वजण एकाच ईश्वराची लेकरे आहेत ह्याची जाणीव झालेली असते त्यांना प्रेम किंवा द्वेषाच्या मोहात अडकणे योग्य नाही हे माहीत असते. तसे घडू नये म्हणून ते पुण्यकर्मांचे प्रमाण वाढवून प्रेम आणि द्वेषाची भावना मनातून नष्ट करतात. त्याचा चांगला परिणाम होऊन त्यांना स्वत:चे स्वरूप कळल्याने त्यांना माझ्या भेटीची ओढ लागते. माझी भेट व्हावी म्हणून ते माझ्या भजनी लागतात. त्यांना अखिल विश्वाचा आधार मीच आहे हे लक्षात आलेले असते. आता त्यांना म्हातारपण आणि मृत्यूची भीती वाटत नाही. शरीराचा मोह नाहीसा झालेला असल्याने मरताना आपल्याला शरीराचा त्याग करावा लागणार ह्या कल्पनेचे त्यांना वाईट वाटत नाही. त्यांना ब्रम्ह आणि अध्यात्म कर्म काय असते हे माहीत झालेले असते.
तुकाराम महाराजांना भगवंतांच्या सांगण्याची पूर्ण कल्पना आलेली होती. त्यांनी भगवंतांनी मांडलेला मायेचा पसारा ओळखला होता. त्यातून मुक्त होण्यासाठी ते भगवतभक्ती करत होते. जोवर जीवनमान आहे तोपर्यंत येथे राहून नंतर आपल्याला मुक्ती मिळणार आहे हे लक्षात आल्याने ते एका अभंगात म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणीली नोवरी । आता दिवस चारी खेळीमेळी. त्यांना म्हातारपणाचे तसेच मृत्यूचे भय उरलेले नव्हते कारण आणखी एका अभंगात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे लेकराचे अवघे हित । माता एक ते जाणत ही खात्री असल्याने, पांडुरंग कोणत्याही परिस्थितीत आपली काळजी घेईल अशी त्यांना खात्री होती. त्यामुळे उर्वरित चारदिवस खेळीमेळीत काढून ते वैकुंठगमन करणार होते.
ज्यांना ब्रह्म आणि अध्यात्मकर्म काय आहे हे समजलेले असते ते जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलेले असतात हे भगवंतांचे बोल ऐकून त्याबद्दल जाणून घ्यायची त्याला उत्सुकता वाटू लागली म्हणून तो अध्यायाच्या सुरवातीच्या श्लोकात भगवंतांना म्हणाला, मागील अध्यायाच्या शेवटी तुम्ही ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, आधिदैव, अधियज्ञ आणि अंतकालचे प्रयाण ह्या सात गोष्टींचा उल्लेख केलात परंतु मला त्यातले काहीही कळले नाही. तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले तरी कळण्यास सहजसोपे नसते. तुमचे बोलणे कांही साधारण नव्हे. तेव्हा हे पुरुषोत्तमा, ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म कशाला म्हणतात? कर्म म्हणजे काय व अधिभूत कशाला म्हणतात? अधिदैव कशाला म्हणतात? अधि-यज्ञ म्हणजे काय? आणि येथून प्रयाण करताना लोक तुम्हाला कसे ओळखतात? हे मला सविस्तर उलगडून सांगा.
ब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ।। 1 ।।
अधि-यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे । प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती ।। 2 ।।
क्रमश: