For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जे त्रिगुणांच्या पलीकडे गेलेले आहेत ते विषयांना विष मानून त्यांचा त्याग करतात

06:30 AM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
जे त्रिगुणांच्या पलीकडे गेलेले आहेत ते विषयांना विष मानून त्यांचा त्याग करतात
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

ब्रह्म सत्य असून जगत मिथ्या आहे ह्याची खात्री पटलेले योगी समोर दिसणाऱ्या दुनियेकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत. ते ईश्वराशी अनन्य झालेले असतात आणि आपले जीवन चालू राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी ईश्वर आपल्याला पुरवेल अशी त्यांना खात्री वाटत असते. आता त्यांना अविनाशी असलेल्या ब्रह्माबद्दल जाणून घ्यायची ओढ लागलेली असते. आपले अस्तित्व त्याच्यात विलीन व्हावे असेही त्यांना वाटत असते. त्याबद्दल जाणून घ्यायची अर्जुनाची इच्छा ओळखून पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, ब्रह्माबद्दल बोलणारे वेदवेत्ते ते अविनाशी आहे असे सांगतात, सर्व इच्छा सोडून दिलेले विरक्त त्यामध्ये प्रवेश करतात व जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात. त्या ब्रह्मपदाबद्दल मी तुला थोडक्यात सांगतो.

जे घोकिती अक्षर वेद-वेत्ते । विरक्त यत्ने मिळती जयास ।। जे ब्रह्मचर्ये पद इच्छिताती । ते सांगतो मी तुज तत्त्व-सार ।। 11 ।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ज्या ज्ञानाच्या पुढे जाणून घेण्याचे काहीच उरत नाही अशा ज्ञानाची वेदवेत्ते जणू खाणच असतात. ते ब्रह्मरूप अविनाशी आहे असे म्हणतात. प्रचंड वारा सुटला असता आकाश आहे तिथेच स्थिर आणि निश्चळ असते. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान स्थिर आणि कायम टिकणारे असते. ब्रह्मज्ञान सोडून इतर ज्ञान जे असते त्याला ज्ञान म्हणण्यापेक्षा विषयांची माहिती असे म्हणता येईल. त्यामुळे ते ज्ञान किंवा माहिती ही विषयांप्रमाणे नष्ट होणारी म्हणजे क्षर समजावी. त्याउलट आत्मज्ञानाचे आहे. ते ब्रह्माचे प्रकटीकरण करते. ते काम संपले की, ते ज्ञान त्यातच लय पावते. ब्रह्म विषयांप्रमाणे नष्ट होणारे नसल्याने त्याला अक्षर असे म्हणतात.

परमपुरुषाचे सातत्याने चिंतन करून जे त्रिगुणांच्या पलीकडे गेलेले आहेत ते विषयांना विषासमान मानून त्यांचा त्याग करतात. त्यामुळे त्यांची सर्व इंद्रिये शुद्ध झालेली असतात. असे विरक्त झालेले पुरुष देहाचा आधार घेऊन, त्यांना अखंड प्रिय असलेल्या परब्रह्माची उपासना करत असतात. ते त्यांना इतके प्रिय असते की, त्याच्यापुढे ते इतर सर्व गोष्टी क्षुल्लक मानतात. अगदी ब्रम्हचर्यासारखी कठिण गोष्टही त्यांच्या हातून सहजी पाळली जाते. साधकाची ज्ञानेंद्रिये त्याला विविध गोष्टींचे आकर्षण दाखवून त्याने विषयांचा उपभोग घ्यावा म्हणून प्रयत्न करत असतात. हे साधकाने ओळखले असते. इंद्रिये आपल्या आणि परब्रह्माच्या भेटीत अडथळे उभे करू शकतात हे ओळखून इंद्रियांनी आपल्याला फशी पाडू नये म्हणून साधक सावध असतो. तो त्यांच्याशी कठोरपणाने वागून त्यांना मवाळ करतो. संयमाने त्यांना अंकित करून घेऊन त्यांच्यावर विजय मिळवतो.  वेदामध्ये सर्वकाही सांगितले आहे, ते परिपूर्ण आहेत असे वेद जाणणारे लोक मोठ्या प्रौढीने सांगत असतात पण आत्तापर्यंत चर्चा केलेले ब्रह्मपद इतके दुर्लभ आणि कळण्यास कठीण आहे की, वेदानाही ते काय आहे ह्याचा नीट उलगडा न झाल्याने त्याच्यापुढे त्यांनी हात टेकले आहेत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.