मध्यप्रदेशात धर्मांतर घडविणाऱ्यांना फाशी ठोठावणार
मुख्यमंत्री मोहन यादव यांची मोठी घोषणा : कायद्यात तरतूद करणार असल्याचे सुतोवाच
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशात लोकांचे धर्मांतर घडवणाऱ्यांना मृत्युदंड म्हणजेच फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शनिवारी यासंबंधीची घोषणा केली आहे. धार्मिक स्वातंत्र्य कायद्याद्वारे आम्ही यासंबंधीची तरतूद करत असून जे लोक धर्मांतर करतात त्यांना आमचे सरकार फाशी देईल, असे ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत धर्मांतर किंवा गैरवर्तनाला समाजात स्थान मिळणार नाही. या घृणास्पद कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांशी सरकार कठोरपणे वागेल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
सरकारने कोणत्याही प्रकारच्या धर्मांतर आणि गैरवर्तनाविरुद्ध संकल्प केला असून आम्ही वाईट गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही. निष्पाप मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये सरकार खूप कडक आहे, म्हणूनच मृत्युदंडाची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमचे सरकार बळजबरीने किंवा लोकांना आमिष दाखवून दुष्कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही. आम्ही अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत जगण्याचा अधिकार देऊ इच्छित नाही, असेही ते पुढे म्हणाले.
गैरवर्तन प्रकरणांमध्ये कडक पवित्रा
राजधानी भोपाळमधील कुशाभाऊ ठाकरे कन्व्हेन्शन हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात लाभार्थी महिलांनी त्यांचे अनुभवही सांगितले. यावेळी मोहन यादव म्हणाले की, निष्पाप मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये सरकार खूप कडक आहे. तसेच धार्मिक स्वातंत्र्य कायद्यात बदल करून, आता लोकांचे धर्मांतर करणाऱ्यांना मृत्युदंडाची तरतूद असेल. या पावलामुळे राज्यातील धर्मांतराच्या घटनांवर कडक नजर ठेवली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
महिला लाभार्थींना निधीचे हस्तांतरण
आंतरराष्ट्रीय महिला दिनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी 1.27 कोटी महिलांच्या खात्यात सुमारे 1552.73 कोटी रुपये आणि 26 लाख महिलांच्या खात्यात गॅस रिफिलिंगसाठी 55.95 कोटी रुपये हस्तांतरित केले. त्यांनी अनेक महिलांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रमाता पद्मावती पुरस्कार (2023), राजमाता विजयाराजे सिंधिया समाजसेवा पुरस्कार (2023-24), राणी अवंतीबाई वीरता पुरस्कार (2024) आणि श्री विष्णू कुमार महिला आणि बाल कल्याण समाजसेवा सन्मान पुरस्कार (2024) देऊन सन्मानित केले.