For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दलालीच्या दलदलीत ऊतलेल्यांचे धाबे दणाणले!

03:23 PM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
दलालीच्या दलदलीत ऊतलेल्यांचे धाबे दणाणले
Advertisement

‘पूजा, दीपश्री’ हे केवळ हिमनगाचे टोक : तब्बल 300 पेक्षा जास्त जणांचा सहभाग

Advertisement

पणजी : आलिशान जीवनशैली जगण्याच्या मोहापायी सरकारी नोकऱ्या विक्रीच्या दलाली व्यवसायात उतरून सध्या पोलिस कोठडीची हवा खाणारी पूजा नाईक हिचे उघडकीस आलेले प्रकरण म्हणजे हिमनगाचे एक टोक असल्याचे समोर आले आहे. दलालीच्या या ‘सागरा’त अशा शेकडो पूजा, प्रिया, दीपश्री, शिवा, सुनीता, सरिता या गुंतलेल्या असून भविष्यात त्यांच्यावरही ‘प्रकाश’ पडणार आहे. प्राप्त माहितीनुसार या व्यवसायात राज्यातील किमान 300 लोक गुंतलेले असून त्यांनी सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली शेकडो इच्छुकांना कोट्यावधींचा चुना लावला आहे.

आश्चर्यकारक प्रकार म्हणजे स्वत: सरकारी नोकरीत असून सुखवस्तू जीवन जगत असतानाही अतिरिक्त कमाईच्या लालसेने अनेक सरकारी नोकरही या दलाली व्यवसायात उतरले.  आज त्यापैकी एकाला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. तर इतरांना नोकऱ्या देण्याच्या फंदात पडलेल्या इतरांवर आज ना उद्या स्वत:चीच नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. राज्यात गेल्या काही वर्षांपासून दोन व्यवसाय प्रचंड तेजीत आहेत. पैकी पहिला व्यवसाय जमीन दलालीचा आणि दुसरा सरकारी नोकऱ्या देण्याचा. परंतु जमिनींचा व्यवहार सध्या बड्या प्रस्थांच्या हाती गेलेला आहे. त्यामुळे तेथे छोट्या माशांना स्थान राहिलेले नाही. परिणामी अनेकांनी ती वाट वाकडी केली आणि सरकारी नोकऱ्या देण्याची सहजसाध्य वाट धरली.

Advertisement

सरकारी नोकरी म्हणजे सुट्यांचा सुकाळ, सुविधांचा वर्षाव

आज सरकारी नोकऱ्या म्हणजे सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीपेक्षाही सुखवस्तू मानली जाते. भरभक्कम पगार, पाच दिवसांचा आठवडा पद्धती लागू झाल्यापासून सर्व सुट्या एकत्रित केल्यास तब्बल सहा महिने सुट्या, त्याशिवाय हक्काच्या रजा, मातृत्त्व रजा, पालकत्व रजा, प्रत्येकी दोन वर्षांनंतर फिरतीवर जाण्यासाठी प्रवास भत्ता, आजारपणातील औषधोपचार खर्चाचा परतावा, यासारख्या असंख्य सोयी सुविधा मिळत असल्याने प्रत्येकाला सरकारी नोकरीच हवी असते. या हव्यासापोटी ‘येन केन प्रकारेण’ ती मिळविण्यासाठी सगळेच धडपडत असतात. त्यासाठी प्रसंगी ‘तन-धन’ यांसह कशाचाही त्याग करण्याचीही त्यांची इच्छुकांची तयारी असते. त्याचा फायदा असे दलाल उठवत असतात.

नोकऱ्या विकल्या जातात हेच सत्य

तसे पाहता पैसे मोजून सरकारी नोकरी मिळविण्याची प्रथा ही काही काल परवाची नाही. थेट 1980 च्या दशकापासून हे प्रकार सुरू आहेत. मात्र त्याकाळी केवळ 20 हजारात सुद्धा नोकऱ्या मिळत होत्या व अशा नोकऱ्या मिळविलेले अनेकजण आजही नोकरीत आहेत. सध्या 20 हजारात नोकऱ्या मिळण्याचे दिवस इतिहासजमा होऊन गत 40 वर्षात त्यात चाळीस पट वाढ झालेली आहे, हे एकट्या पूजा नाईककडून जप्त करण्यात आलेल्या कोट्यावधींच्या मालमत्तेवरून स्पष्ट झालेले आहे. तिच्याकडे पाच आलिशान गाड्या व चार आलिशान फ्लॅट सापडले तर दीपश्रीकडूनही तीन कार आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही उघडकीस आलेली मालमत्ता पाहून कुणीही तोंडात बोटे न घातली तरच नवल ठरावे.

‘लोकलज्जे’ खातर ‘ते’ करत नाहीत तक्रारी

अशाप्रकारे नागवले गेलेल्यापैकी एखाददुसराच तक्रार करण्यास पुढे येतो. बाकीचे विविध कारणास्तव पोलिसांकडे जाण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ‘लोकलज्जा’ हे त्यामागील प्रमुख कारण आहे. म्हणुनच स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘तक्रारी करण्यासाठी पुढे या’ असे कितीही आवाहन केले तरी लोक तक्रारी करत नाहीत.

...................बॉक्स......................

दलालीच्या दलदलीतही ‘लेडिज’ आघाडीवर

नोकऱ्या मिळवून देण्याचा हा धंदा फायदेशीर असल्याचे दिसून येताच इतरांसोबत काही सरकारी बडे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि पोलीस देखील या व्यवसायात उतरले. असे एकेक करता सध्यस्थितीत किमान 300 लोक या व्यवहारात असल्याचे समोर आले आहे. नवलाईची गोष्ट म्हणजे त्यात पुऊषांपेक्षा महिलांचाच जास्त भरणा असून सध्या ‘प्रकाशात’ आलेल्या नावामध्येही महिलांचीच संख्या जास्त आहे. पैकी एकाने आत्महत्येद्वारे जीवन संपविले आहे. तर  दलालीच्या या दलदलीत ऊतलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement
Tags :

.