सद्गुरूंच्या उपदेशानुसार वागणाऱ्याचे कल्याण होते
अध्याय सातवा
मृत्यूनंतर माणसाला कोणती गती मिळते ह्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. पुण्यकर्मे करणाऱ्याला स्वर्ग मिळतो आणि पापकर्मे करणाऱ्याला नरकात जावे लागते हे आपल्याला माहित आहे. जो ईश्वरभक्ती करत करत निष्कामपणे सत्कर्मे करतो तो सूर्यमार्गाने पुढे सरकतो तर सकाम भक्ती करणारा चंद्रलोकापर्यंत मजल मारतो
उत्तरायणाच्या दिवसकाळी जे ब्रह्मज्ञानी देह सोडतात ते ब्रह्माला जाऊन मिळतात तर दक्षिणायनाच्या रात्रकाळी जे देह सोडतात ते चंद्रलोकात जाऊन परत फिरतात व त्यांचा पुनर्जन्म होतो. ह्या अर्थाचे ‘अग्निर्ज्योतिरहऽ शुक्ला कर्मार्हमयनं गतिऽ । चान्द्रं ज्योतिस्तथा धूमो रात्रिश्च दक्षिणायनम् ।।2।। कृष्णैते ब्रह्मसंसृत्योरवाप्तेऽ कारणं गती। दृश्यादृश्यमिदं सर्वं ब्रह्मैवेत्यवधारय ।। 3।। हे दोन श्लोक आपण अभ्यासत आहोत.
बाप्पा म्हणाले, जोपर्यंत शिष्य सद्गुरूंच्या ज्ञानरुपी प्रकाशात राहतो तोपर्यंत त्याला ब्रह्मधामी जाण्याची वाट स्पष्ट दिसत असते. याउलट सद्गुरूंची शिकवण न मानता जे पुढे जातात ते चुकीच्या मार्गाला लागतात. मृत्यूनंतर मनुष्य या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका गतीला प्राप्त होतो. एकापासून पुनर्जन्म व दुसऱ्यापासून मोक्ष मिळून ब्रह्मलोक प्राप्त होतो. यापैकी कोणती गती प्राप्त करून घ्यायची हे माणसाच्या हातात असते. वास्तविक पाहता वरील वर्णन वाचल्यावर माणसाला आपण चांगले वागून, देवभक्ती करून मृत्यूनंतर सूर्यमार्गाने जाऊन ब्रह्मपदी विराजमान व्हावे असे वाटणे साहजिक आहे परंतु माणसाची स्वार्थी वृत्ती समाजात वावरताना उफाळून येते आणि तिचे पोषण करण्यासाठी तो त्याच्या कळत, नकळत अनेक गैरकृत्ये करू लागतो. त्यामुळे मृत्यूनंतर त्याला चंद्रमार्गाने जावे लागून पुन्हा जन्माला यावे लागते.
चंद्रमार्गाने जावे लागून पुन्हा जन्म होऊ नये म्हणून आपण वैयक्तिक जीवनात सावध राहून गैरकृत्ये करण्याचे टाळले पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, काहीतरी करण्यापेक्षा न करणे सोपे असते कारण त्यात काहीच करावे लागत नाही पण माणसाचा स्वभाव त्याला गप्प बसू देत नाही. जो विवेकाने चांगले, वाईट ह्यातील फरक ओळखतो आणि त्यानुसार चांगले कर्म करतो त्याचे भले होते.
पूर्वप्रारब्धानुसार मनुष्याला या जन्मातील गरिबी, श्रीमंती, सुखदु:ख, शारीरिक व्याधी, पीडा, क्लेश तसेच संकटं आदि गोष्टी प्राप्त होत असतात व त्यात बदल होत नाही पण जो मनुष्य सद्गुरूंच्या उपदेशानुसार जीवनात वाटचाल करतो त्याची संकटे तसेच दु:खदायक प्रसंग सद्गुरु सुसह्य करतात. प्रसंगी स्वत: भोगतात व शेवटी त्याला शुक्ल गती म्हणजे प्रकाशाचा मार्ग प्राप्त करून देतात. त्याआधारे मनुष्य ब्रह्मलोकी जाऊ शकतो. तेथे पोहोचलेल्या मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही. थोडक्यात जीवनात कोणतीही परिस्थिती वाट्याला आली तरी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणारा, ईश्वराची भक्ती करून आपल्या कल्याणाचा मार्ग पकडू शकतो. जीवनात स्वत:चे भले करून घ्यायचे की नाही ही गोष्ट ईश्वराने मनुष्याच्या हातात ठेवलेली आहे.
कृष्णमार्गाने जाणारे जीव चंद्रलोकी म्हणजे स्वर्गादि दिव्य लोकांना पोहोचतात आणि पुण्य संचयानुसार तेथे राहून पुण्यसंचय संपला की, पृथ्वीवर पुनर्जन्म घेतात. वरील सर्व वर्णन सकाम अथवा निष्काम सत्कर्म करणाऱ्यांनाच लागू पडते. अशी सत्कर्मे हातून घडण्यासाठी ह्या उपासनायोग अध्यायाचा अभ्यास साधकांनी समरसून करावा. जेणेकरून ईश्वराची उपासना हातून घडेल व वरीलपैकी एक कोणतीतरी गती उपासनेच्या शुद्धतेवर प्राप्त होईल.
क्रमश: