For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भगवंतांच्या उपदेशानुसार जे वागतील, ते कर्मबंधनातून मुक्त होतील

06:33 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
भगवंतांच्या उपदेशानुसार जे वागतील  ते कर्मबंधनातून मुक्त होतील
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

माणसाचा स्वभाव बदलणे फार अवघड असते कारण तो प्रकृतीच्या गुणामुळे तयार होत असतो आणि स्वभावाप्रमाणे त्याच्या हातून कर्म होत असते. कित्येकवेळा त्याची इच्छा नसते तरीही त्याच्या हातून चांगले, वाईट दोन्ही प्रकारचे कर्म होत असते. ही गोष्ट आत्मज्ञानी माणसाच्या लक्षात आलेली असते. त्याला कोणतेही कर्म मी केले असे वाटत नाही. तो म्हणतो माझ्याहातून ते कर्म माझ्या स्वभावानुसार झाले.

त्याउलट सामान्य माणसे मात्र कर्म मी केले असे म्हणून फळाच्या अपेक्षेत गुंतून पडतात. समोरची अज्ञानी माणसे फळाच्या अपेक्षेत गुंतून कर्म करत आहेत, हे आत्मज्ञानी माणसाच्या लक्षात आलेले असले तरी ते चुकतायत असे त्याने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास फळाची अपेक्षा करायची नसेल तर कर्म तरी कशाला करा असा विचार करून, करत असलेले कर्मही ते करणार नाहीत.

Advertisement

पुढे भगवंत म्हणाले, आत्मज्ञानी माणसाच्या स्वभावाबद्दल मी सांगितलेले लक्षात ठेव आणि चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेऊन सर्व कर्मे मला समर्पण करून आशारहित, ममतारहित आणि शोकरहित होऊन युद्ध कर. आपणही आपले कर्म आशारहित, ममतारहित होऊन करणे भगवंतांना अपेक्षित आहे परंतु असे सांगणाऱ्याचा मत्सर किंवा द्वेष करायला लोक कमी करत नाहीत. भगवंतांना मनुष्य स्वभावाची चांगलीच जाण असल्याने पुढील श्लोकात ते म्हणतात, जे माझा मत्सर न करता माझ्यावर श्रद्धा ठेवतील आणि मी सांगितल्याप्रमाणे आचरण करतील, ते कर्माच्या बंधनापासून मुक्त होतील.

माझे शासन हे नित्य जे निर्मत्सर पाळिती । श्रद्धेने नेणते ते हि तोडिती कर्म-बंधने ।। 31 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, हे धनुर्धरा! जे श्रद्धावान व मत्सररहित होऊन माझ्या मताप्रमाणे आचरण करतील, ते कर्मबंधनापासून मुक्त होतील. अशा लोकांनी कर्म केले तरी ते मुक्त असतात असे तू समज.

पुढील श्लोकात त्यांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करून त्यांचा मत्सर करणाऱ्या लोकांच्याबाबतीत भगवंत सांगतात की, माझ्या सांगण्याची हेटाळणी करून, मी सांगतोय त्याकडे दुर्लक्ष करून, मी सांगितल्याप्रमाणे वागत नाहीत, ते मूढ, अविवेकी आणि भ्रष्ट असल्याने त्यांचे पतन होते.

परी मत्सर-बुद्धीने जे हे शासन मोडिती । ज्ञान-शून्य चि ते मूढ पावले नाश जाण तू ।। 32।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जे लोक मायेच्या आधीन होतात ते इंद्रियांनी दाखवलेल्या आकर्षणांना बळी पडतात. ज्याप्रमाणे मुलाचे आईवडील मुलाचे लाड पुरवताना काहीवेळा अतिरेक करतात त्याप्रमाणे मायेच्या अधीन झालेले मन इंद्रियांचे सर्व लाड पुरवत असते. त्यांचा माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करण्याचा कल असल्याने ते माझ्या सांगण्याचा तिरस्कार करून, त्याला केराची टोपली दाखवतात. माझ्या सांगण्याचा अनादर करतात, माझी चेष्टा करतात. त्यांनी मोहरूपी अमली पदार्थाचे सेवन केलेले असते. त्यामुळे ते विषयरूपी विषाने व्यापलेले असतात आणि अज्ञानरूपी चिखलात फसलेले असतात, असे नि:संशय समज.

प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे वाया जाते अथवा जो जन्मापासून आंधळा आहे, त्याच्या सांगण्यावर कुणी विश्वास ठेवत नाहीत किंवा चंद्राचा उदय कावळ्याच्या उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे मी सांगितलेला विचार अज्ञानी लोकांच्या पचनी पडत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.