‘त्या’ विद्यार्थ्यांना बारावीचा दर्जा मिळणार : मुख्यमंत्री
आठवी, दहावीच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ : दर्जामुळे पदवी शिक्षणासाठी करु शकणार अर्ज
पणजी : आठवी उत्तीर्ण आणि दहावी अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी एक वर्षाचा आयटीआय कोर्स केल्यास त्यांना दहावीचा समांतर दर्जा मिळणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याने दोन वर्षाचा आयटीआय कोर्स केला तर त्याची पात्रता बारावीशी समांतर दर्जाची समजली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. डिचोली, फर्मागुढी, वास्को, काकोडा व म्हापसा येथील कुशल सेंटरच्या पायाभरणी सोहळ्यात ते बोलत होते. आल्तिनो-पणजी येथील आयटीआय केंद्रात ऑनलाईन पद्धतीने डॉ. सावंत यांनी पायाभरणी केली. ते पुढे म्हणाले की उपरोक्त समान दर्जासाठी शिक्षण खात्याकडून लवकरच आदेश जारी करण्यात येणार असून त्यानंतर हा समान दर्जाचा नियम लागू होणार आहे. सरकारी खात्यात एमटीएस पदांसाठी दहावी उत्तीर्ण अशी पात्रता आहे. वरील नियम लागू झाल्यानंतर दहावीत अनुत्तीर्ण झालेले परंतु आयटीआय पूर्ण केलेले विद्यार्थी एमटीएस पदांसाठी अर्ज करू शकतील आणि ती नोकरी मिळवू शकतील असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. बारावीचा समान दर्जा मिळाल्यानंतर आयटीआय केलेले विद्यार्थी बीए, बी कॉम या पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतील. पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून त्याची कार्यवाही होणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. आयटीआयची मानसिकता बदलावी आणि मुलांनी आयटीआय शिकावे म्हणून हा बदल करण्यात आला आहे. त्यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, आयटीआय संचालक एस. एस. गावकर व इतर मान्यवर हजर होते.