योगच्या प्रसारासाठी झटणारे : योगपटू विश्वदीप नाईक
योग अकादमीची स्थापना : योग शिक्षणात पदवी
नरेश कृष्णा गावणेकर, फोंडा
योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक व शारीरिक शास्त्र आहे. योग हे एक पूर्ण विज्ञान जीवनशैली, चिकित्सा व पूर्ण अध्यात्म विद्या आहे. हजारो वर्षांपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषी-मुनीनी योग आविष्कृत केले होते. महर्षी पतंजलीने अष्टांग योगच्या रुपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादीत केले. आज साऱ्या जगाला योगचे महत्त्व समजले आहे. दि. 21 जून हा जागतिक योगदिन म्हणून साजरा होत आहे. गाव्यातही अनेक संस्था व योगपटू योग शिक्षण देण्यास झटत आहेत. शालेय स्तरावरही योगचा समावेश आहे. आडण मडकई येथील 35 वर्षीय योगपटू विश्वदीप आनंद नाईक हा योगच्या प्रचार व प्रसारासाठी झटत आहे. त्याने योग अकादमी सुरु करून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्याने तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत गोवा संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील स्पर्धेत तो पंच म्हणून कामगिरी बजावित असून योग शिक्षणातील पदवी व पदविका त्यांने प्राप्त केल्या आहेत.
त्याची आई अनुजा हिच्या प्रेरणेमुळे विश्वदीपने योग क्षेत्रात पाऊल ठेवले. इयत्ता पाचवीत शिकताना आईने त्याला योगासनाचा तक्ता आणून दिला. ते पाहून त्याला योगची आवड निर्माण झाली. 2003 साली आठवीत असताना त्याला योग शिक्षक संजीव नाईक व रमेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच साली जबलपूर-मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत त्याने प्रथमच गोवा संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर प्रशिक्षकाने त्याला बेतोडा फोंडा येथील ॐ नित्य दिव्य योगाश्रमात प्रशिक्षण घेण्यास सांगितले. त्याच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीत या आश्रमचे योग गुरु व इतर प्रशिक्षकांचे बहुमूल्य योगदान आहे.
2003 साली त्यांने जबलपूर मध्यप्रदेश येथे झालेल्या 28 व्या राष्ट्रीय स्पर्धेत तसेच राजस्थान येथे झालेल्या योगासन भारतीच्या मास्टर्स स्पर्धेत तर 2024 साली बंगळूरू येथे झालेल्या मास्टर्स योगासन चॅम्पियन स्पर्धेत सहभाग घेतला. राज्य पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांने अनेक पदके मिळविली आहेत. यानंतर गोवा योगासन स्पोर्टस् असोसिएशन्सशी त्याचा संबंध आला. तेथे त्याला अधिकृत पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या असोसिएशन तसेच आश्रमतर्फे होणाऱ्या योगासन स्पर्धांमधून त्याला पंच म्हणून काम करण्याची संधी लाभते. 2025 साली योगासन स्पोर्टस् फेडरेशन ऑफ झाबिंयातर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत त्याने पंच म्हणून काम पाहिले आहे.
योग अकादमीची स्थापना
योगचे महत्त्व आज सगळ्यांना समजले असून योगची जागृती व्हावी, निरोगी आरोग्य लाभावे, तसेच सर्वांगिण कल्याण व्हावे, यासाठी त्याने मडकई येथे नुकतीच स्वत:ची ‘सर्वस्वास्थ्यम योग व फिटनेस अकादमी’ सुरु केली आहे. त्याचबरोबर कुठ्ठाळी, मडगाव येथेही त्याचे योगवर्ग सुरु असून गोव्यातील विविध भागातील इच्छुक युवा त्याच्याकडून ऑनलाईन प्रशिक्षण घेतात. या कामासाठी त्याला त्याच्या कुटुंबीय व मित्रांचा भक्कम पाठिंबा मिळतो.
योगची पदवी संपादित
विश्वदीपने कुडचडे येथील सरकारी पॉलिटेक्नीकमधून इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरींगमध्ये पदविका शिक्षण घेतले आहे. सध्या तो वेर्णा येथील सिमेन्स लिमिटेड कंपनीत 2016 पासून नोकरी करीत आहे. योगमध्ये त्याने 2025 साली बंगळूरू येथील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेच्या विद्यापीठातून बीएससी योग ही पदवी मिळविली आहे. त्यापूर्वी त्याने 2016 साली अन्नामलाई विद्यापीठातून योग पदविका व 2023 साली स्वामी विवेकानंद अनुसंधान संस्थेच्या विद्यापीठातून योग इन्स्ट्रक्टर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचा तो योग वेलनेस इन्स्ट्रक्टर आहे.
नुकतीच त्याने मडकई येथे अकादमीच्या विद्यार्थ्यांसाठी अखिल गोवा योगासन स्पर्धा आयोजित केली होती. यात 140 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. युवापिढीनी योग शिक्षण घेणे आवश्यक आहे, असे तो सांगतो. योगामुळे निरोगी आरोग्य लाभते, शिक्षणातही प्रगती होण्यास मदत होते तसेच सर्वांगिण विकास साधता येतो. विश्वदीप सध्या बेतोडा फोंडा येथील ॐ नित्य दिव्य योगाश्रमात ज्येष्ठ योग गुरु जयवंत भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक योग शिक्षण घेत आहे.