बदनामीचे षडयंत्र रचणाऱ्यांना योग्य उत्तर मिळेल!
खेड :
आमदार अनिल परब अर्धवट वकील असून ते हेतूपुरस्सर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नाहक बदनामीचे षडयंत्र रचत आहेत. त्यांचा राजीनामा मागणारे ते कोण? असा खडा सवाल उपस्थित करत नाहक बदनामीचा खटाटोप करणाऱ्यांना योग्यवेळी योग्य उत्तर मिळेल, असा सूचक इशारा शिवसेना नेते व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला आहे.
तालुक्यातील भरणे येथील हॉटेल बिसू येथे रविवारी ते पक्षप्रवेश सोहळ्dयासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, वाशी येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बारवरील केलेल्या कारवाईनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांना कारवाई न करण्यासंदर्भात फोन आले. पण त्यांनी कोणालाही जुमानले नाही. याचमुळे योगेश कदमांची बदनामी करण्यासाठी सावली प्रकरण जाणीवपूर्वक केल्याचा आरोप करत लेडीज बार बंद न करण्यासाठी पोलिसांचाच चक्क गृहराज्यमंत्र्यांवर दबाव असल्याचे पुढे आले आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचे ठणकावून सांगताना परवाने 13 जुलैलाच जमा केले आहेत. अनिल परब यांनी 18 जुलैला विधीमंडळात विषय काढला. त्यामुळे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ते दिशाभूल करत आहेत. विधानमंडळात नियमबाह्य काढलेले विषय आरोप तत्काळ काढून टाकावेत, यासाठी सभापतींना अर्जही दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या सगळ्dयाची चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचेही रामदास कदम यांनी सांगितले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा डान्स बारशी काडीमात्र संबंध नाही. आमच्यावर नाहक जो - जो चालून येतो, त्याच्यावर मी कायदेशीर कारवाई केली. कोणालाही सोडलं नाही आणि जे आमच्या मुळावर यायचा प्रयत्न करत आहेत. भविष्यामध्ये त्यांना योग्य ते उत्तर नक्कीच मिळेल, असे त्यांनी सांगितले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम अजून जोमाने काम करतील. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी लेडीज बार असतील ते सगळे बंद करून टाका, असेही मंत्री योगेश कदम यांना सांगितल्याची माहितीही दिली. मंत्री योगेश कदम यांना राजकारणातून संपविण्यासाठी उद्धव ठाकरे व अनिल परब यांनी जंग जंग पछाडले. ते विधानभवनात गेल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच केवळ उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी अनिल परब हे योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत. उद्धव ठाकरे असू देत किंवा अनिल परब असू देत त्यांची स्वप्ने कधीच साकार होणार नाहीत, असे खडेबोलही कदम यांनी सुनावले.
- जितेंद्र आव्हाड यांनी धर्मगुरूच व्हायला हवे
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा धर्माच्या बाबतीत खूप अभ्यास आहे. त्यांनी धर्मगुरूच व्हायला पाहिजे, असा टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी लगावला.