थॉमस चषक : भारत उपांत्य फेरीत दाखल
बलाढ्या चिनी तैपेईचा 3-0 असा पराभव, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग, आयुष यांचे दमदार विजय
वृत्तसंस्था, हॉर्सेन्स (डेन्मार्क)
2026 च्या थॉमस चषक पुरूषांच्या सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी भारताने बलाढ्या चिनी तैपेईचा 3-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. 2022 साली या स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकाविले होते. आता भारतीय पुरूष बॅडमिंटन संघाचे या स्पर्धेतील किमान एक पदक निश्चित झाले आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि सात्विक साईराज-चिराग शेट्टी यांची कामगिरी दर्जेदार झाली. लक्ष्य सेनने 2 मॅच पॉईंट्स वाचवित चिनी तैपेईच्या सहाव्या मानांकीत चोयु तिएन चेनचा फडशा पाडला. तर दुहेरीच्या लढतीत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी चिनी तैपेईच्या चीयु चेह आणि वेंग लिन यांचा पराभव करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या 20 वर्षीय आयुष शेट्टीने चिनी तैपेईच्या आठव्या मानांकीत तसेच अखिल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतील विद्यमान विजेत्या लिन चुन यी याला पराभवाचा धक्का देत आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेले.
पुरूष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने चोयु चेनचा 18-21, 22-20, 21-17 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करत भारताला आघाडी मिळवून दिली. हा सामना 78 मिनिटे चालला होता. या लढतीत चेनने पहिल्या गेम 21-18 असा जिंकून लक्ष्य सेनवर आघाडी घेतल्यानंतर पुढील दोन गेम्समध्ये चेनकडून लक्ष्य सेनला म्हणावा तसा अधिक प्रतिकार झाला नाही. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडू अचूक स्मॅश फटक्यावर गुण घेत होते. मात्र लक्ष्य सेनने सलग चार गुण घेत चेनशी बरोबरी साधली. अखेर लक्ष्य सेनने हा दुसरा गेम 22-20 असा जिंकून चेनशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये 36 वर्षीय चोयु चेनची दमछाक झाल्याचे जाणवले. या संधीचा फायदा घेत लक्ष्य सेनने सुरूवातीला 11-7 अशी आघाडी घेतली. त्यानंतर लक्ष्य सेनने आपली आघाडी वाढविताना वेगवान स्मॅश फटक्यावर चेनकडून वारंवार चुका झाल्या. लक्ष्य सेनने हा शेवटचा गेम 21-17 असा जिंकून चेनचे आव्हान संपुष्टात आणले.
पुरुष दुहेरीच्या सामन्यांमध्ये भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी चिनी तैपेईच्या चियु चेह आणि वेंग लिन यांचा 23-21, 19-21, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करुन भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. हा दुहेरीचा सामना 65 मिनिटे चालला होता. या लढतीत चिनी तैपेईच्या जोडीने चिराग आणि साईराजला वारंवार नेटजवळ खेचले. पण सात्विक आणि चिराग यांनी पहिला गेम 23-21 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये चिनी तैपेईच्या जोडीने आपल्या डावपेचात बदल करत हा गेम 21-19 असा जिंकून बरोबरी साधली. मात्र तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीने आपल्या वेगवान अचूक फटक्यांवर चिनी तैपेईच्या जोडीचे आव्हान 21-12 असे संपुष्टात आणले. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी विजेतेपद मिळविले होते.
तिसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या 20 वर्षीय आयुष शेट्टीने चिनी तैपेईच्या आठव्या मानांकीत लीन चून यी याचा 21-16, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला. या लढतीमध्ये आयुष शेट्टीने आक्रमक आणि बचावात्मक खेळाचे सुंदर मिश्रण ठेवले होते. लीनला यापूर्वी पायाला दुखापत झाल्याने त्याला परतीचे फटके मारणे अवघड जात होते. पहिल्या गेममध्ये आयुष शेट्टीने 11-7 अशी आघाडी लिनवर मिळविली. लिनला शेवटपर्यंत ही आघाडी भरुन काढता आली नाही आणि त्याला हा पहिला गेम 16-21 असा गमवावा लागला. दुसऱ्या गेममध्ये आयुष शेट्टीने आपल्या अचूक सर्व्हिस आणि फटक्यावर अधिक भर दिला. त्याचा त्याला चांगलाच लाभ मिळाला आणि शेवटी त्याने हा दुसरा गेम 21-17 अशा जिंकून आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेले.
भारतीय बॅडमिंटन संघाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत यापूर्वी एकदा म्हणजेच 2022 साली विजेतेपद पटकाविले होते. त्याशिवाय 1952, 1955 आणि 1979 साली भारताने या स्पर्धेत कांस्यपदके मिळविली होती. आता या स्पर्धेत भारताची उपांत्य फेरीतील गाठ फ्रान्स किंवा जपानबरोबर होईल.