यंदाचा तापदायक उन्हाळा
नदी-नाले, तळी-तलाव, झरे याबरोबर नैसर्गिक जलस्रोत शुष्क पडण्याच्या प्रक्रियेत उन्हाळा ऐन भरात असताना मे महिन्यात पूर्वी वाढ व्हायची. परंतु यंदा गोवा आणि कोकणातल्या नदी-नाल्यांच्या पात्रातल्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी झालेली असून, पूर्वाश्रमीच्या बारामाही प्रवाहित राहणाऱ्या गोड्या पाण्याच्या नद्या मान्सूनच्या पावसाळ्यानंतर कोरड्या पडू लागलेल्या आहेत. एकेकाळी नदी-नाल्यांच्या जलसंचय क्षेत्रातले जंगल सहसा कोणी तोडण्यास धजत नसे आणि त्यामुळे हे नदीनाले बारामाही प्रवाहित राहून, त्या त्या परिसरातल्या जलसिंचन सुविधेला हातभार लावत असत. परंतु आज जलसंचय क्षेत्रातल्या जंगलांवरती सराईतपणे कुऱ्हाड चालविली जात असल्याने, पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या गोड्या पाण्याच्या बऱ्याच नद्यांची भू-गर्भात पाणी धारण करण्याची क्षमता झपाट्याने कमी होऊ लागली आहे आणि त्याचे दुष्परिणाम वृक्ष-वेली आणि वन्यजीवांना भोगण्याची वेळ आलेली आहे.
यंदाच्या मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याच्या झळा तीव्र होण्याच्या प्रक्रियेत वाढ झालेली असून, एप्रिल महिन्यात तर महाराष्ट्रातल्या काही भागांतल्या किमान तापमानाने 40 सेल्सियसचा टप्पा ओलांडलेला असून, काही ठिकाणी विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट होऊन अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मारा होऊन मोसमी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाल्याने, ते हवालदिल झालेले आहे.
2026चा उन्हाळा तीव्र उष्णतेचा असल्याची शक्यता यापूर्वी हवामान खात्याने व्यक्त केलेली असून, मार्चपासून किमान तापमान वाढले, ते एप्रिलमध्येही चढत्या क्रमाचे राहिलेले आहे. देशभरात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यातल्या उष्णतेच्या लाटेचे चटके सोसण्याची वेळ बऱ्याच मोठ्या लोकसंख्येच्या वाटेला आलेली आहे. यंदा प्रशांत महासागरातील बदलामुळे उन्हाळा गेल्या वर्षाच्या तुलनेत सुसह्या होणार असल्याचे संकेत होते. परंतु याच आठवड्याच्या प्रारंभी महाराष्ट्रातील अकोला पाठोपाठ अमरावती, विदर्भ, चंद्रपूर येथील तापमानात कमालीची वाढ झाली असून, त्याचे चटके या परिसरातील लोकांना जाणवू लागलेले आहेत. तापमान वाढीचे संकट माथ्यावर असताना, त्यात भर म्हणून की, उन्हाळ्यात त्याचे चटके मोठ्या प्रमाणात सोसण्याची वेळ लोकांवरती आलेली आहे. दरवर्षी जेव्हा उन्हाळ्यात तापमान वाढू लागते, तेव्हा विजेच्या पुरठ्यावर आधारित पंखे, वातानुकूलीत यंत्रणेच्या मागणीपायी प्रचंड ताण येतो. धरणाच्या जलाशयातील उपलब्ध पाण्याच्या साठ्यात घट होत असल्याने, शेती-बागायतीच्या जलसिंचन पुरवठ्याच्या सुविधेवरती अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि बागायतदार यांच्या लागवडीला सिंचन सुविधा व्यवस्थित होत नसल्याकारणाने नुकसानी सोसावी लागते.
2015 ते 2025 या दशकभरात तापमानात कमालीची वाढ होत असल्याचे स्पष्ट झालेले. ही वाढ 175 वर्षांच्या इतिहासातली लक्षणीय ठरलेली आहे. 2024 हे इतिहासातले सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले असून, त्या पाठोपाठ 2025 या वर्षाचा क्रम लागलेला आहे. 2025च्या फेब्रुवारी ते जुलै या कालखंडात उष्माघाताच्या लाटेत भारतभर 84 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद असून, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांत उष्माघातापायी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या बरीच मोठी होती. महाराष्ट्रात 17 लोकांचा मृत्यू उष्माघाताने उद्भवल्याची नोंद आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात उन्हाळ्यात अवकाळी पावसापायी काही भागांतील लोकांच्या पिकांची नासधूस होण्याचे प्रमाण जसे लक्षणीय आहे तसेच काही ठिकाणी उष्माघातामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडण्याचे तसेच उष्माघातामुळे उद्भवणाऱ्या विविध आजारांचे प्रमाणही चिंताजनक आहे.
यंदा भारतभरातल्या डोंगरभागात उन्हाळा तीव्र होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. हिमालय, ईशान्य भारतातील प्रदेशात त्याचप्रमाणे पश्चिम घाटातील डोंगर प्रदेशात उन्हाळ्याचे दुष्परिणाम दरवर्षीपेक्षा यंदा प्रकर्षाने जाणवतील. उन्हाळ्यात कोरडेपणा प्रकर्षाने जाणवू लागल्याने, यंदा दुष्काळ, जलस्रोत शुष्क पडणे, जंगलांमध्ये वणवे लागून वन्यजीवांना प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाण्याबरोबर, उष्माघातविषयक विकारात वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून डोंगराळ प्रदेशातला उन्हाळा असह्य होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून, पूर्वीच्या तुलनेत झरे, विहीरी, तळी कोरड्या पडण्याचे प्रमाणही वाढत असल्याने जलसिंचनाच्या पुरवठ्याबरोबर पेयजलाची समस्याही येथे प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे. यंदा उन्हाळा प्रखर होणार असल्याने, ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळा आला की, जंगलांना आगी लागण्याच्या आणि काहीवेळा हेतूपुरस्सर त्या लावण्याच्या प्रकारांत वाढ होत असल्याने, या संकटाला सामोरे जाण्याची पूर्वतयारी वन खात्यातर्फे केली जात नसल्याने, जंगल संपदेचे आणि वन्यजीवांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यंदा पश्चिम घाटात उन्हाळ्याची तीव्रता वाढणार असल्याचा जो अंदाज व्यक्त केलेला आहे, त्याची दखल घेऊन, वन खात्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन, उद्भवणाऱ्या प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे.