यंदाचा आयपीएल लिलाव गोव्यात
वृत्तसंस्था, नवी दिल्ली :
यावर्षी होणाऱ्या आयपीएल लिलावाच्या ठिकाणाची घोषणा करण्यात आली असून डिसेंबरच्या मध्यात त्याचे गोव्यामध्ये आयोजन केले जाणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी वृत्तसंस्थेला बुधवारी सांगितले.
मागील तीन लिलाव परदेशात झाल्यानंतर आता आयपीएलचा लिलाव पुन्हा भारतात होत आहे. ‘आम्ही गोव्याची निवड निश्चित केली आहे. 15 ते 16 डिसेंबर या लिलावाच्या तारखा असण्याची शक्यता आहे,’ असे धुमल म्हणाले. लिलावाच्या मागील तीन आवृत्त्या दुबई, जेद्दाह आणि अबू धाबी येथे झाल्या होत्या. लिलाव भारतात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे धुमल यांनी यापूर्वी म्हटले होते. हा मिनी लिलाव असल्याने तो एका दिवसाचा कार्यक्रम असणार आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी जाहीर केले की, आयपीएल 2027 च्या आवृत्तीसाठीचा लिलाव यावर्षी डिसेंबरमध्ये गोव्यात होणार आहे. ते म्हणाले की, ‘मागील तीन वर्षात सौदी अरेबिया, दुबई व अबू धाबी या तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणी लिलाव आयोजित केल्यानंतर बीसीसीआय यावर्षीचा लिलाव गोव्यात आयोजित करणार आहे. त्याचे आयोजन डिसेंबरमध्ये करणार आहोत,’ असे त्यांनी सांगितले.