यावर्षी सीमोल्लंघन शिस्तबद्धरित्या होणार
बेळगाव : शहर देवस्थान कमिटीच्या वतीने दरवर्षी बेळगावमध्ये सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडतो. परंतु भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने असल्याने बऱ्याचवेळा चेंगराचेंगरी होते. हे प्रकार टाळण्यासाठी नियोजनबद्ध व शिस्तबद्धरित्या सीमोल्लंघन कार्यक्रम यावर्षी केला जाणार आहे अशी माहिती रविवारी आयोजित शहर देवस्थान कमिटीच्या बैठकीत देण्यात आली. पाटील गल्ली येथील सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला शहरातील विविध देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
सीमोल्लंघनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांना सर्व पालख्यांचे दर्शन घेता यावे यासाठी यावर्षी विशेष व्यवस्था करण्याबाबत ही चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये चव्हाट गल्ली येथील देवदास सासनकाठी जालगार माऊती मंदिर, बसवाण्णा देवस्थान बसवाण गल्ली, माऊती देवस्थान माऊती गल्ली, मातंगी देवस्थान कसाई गल्ली, समादेवी मंदिर समादेवी गल्ली, कपिलेश्वर देवस्थान, नार्वेकर गल्ली येथील जोतिबा मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मंदिरांच्या प्रमुखांनी आपापल्या सूचना या बैठकीत मांडल्या.
यावेळी रणजीत चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुसकर, परशराम माळी, विजय तुमचे, मल्लेश चौगुले, आनंद आपटेकर, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, लक्ष्मण किल्लेकर, जोतिबा धामणेकर, नामदेव नाईक, नागेंद्र नाईक, श्रीनाथ पवार, हणमंत पाटील, बद्रू पुजारी, प्रथमेश अष्टेकर, नाना अष्टेकर, राहुल जाधव, अभी किल्लेकर यांच्यासह इतर उपस्थित होते.