महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचे यंदा शतकपूर्ती वर्ष

11:42 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

1924 मध्ये भरले होते काँग्रेसचे 39 वे अधिवेशन : महात्मा गांधी यांनी भूषविले अध्यक्षस्थान

Advertisement

मनीषा सुभेदार

Advertisement

बेळगावमध्ये 25 डिसेंबर 1924 मध्ये भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषविले होते. आज गांधी जयंतीनिमित्त अधिवेशनाच्या स्मृतींना हा उजाळा...

राष्ट्रपिता म्हणून ज्यांना भारतीयांनी आदराचे स्थान दिले त्या महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. आज गांधी जयंतीनिमित्ताने इतिहासात डोकावून पाहताना या अधिवेशनाच्या अनेक स्मृती बेळगावने जपल्या आहेत. 1924 मध्ये बेळगावमध्ये काँग्रेसचे 39 वे अधिवेशन भरले होते. त्यावेळी तुलनेने लहान असणाऱ्या या शहराची अधिवेशनासाठी निवड केली गेली हे विशेषच होय.

अनेक जणांनी महात्मा गांधीजींना 1924 मध्ये भरलेल्या या अधिवेशनाला उपस्थित न राहण्याचा सल्ला दिला होता. तथापि म. गांधी यांची या अधिवेशनाला लाभलेली उपस्थिती याचे श्रेय कर्नाटक सिंह गंगाधरराव देशपांडे यांना जाते. याबाबत ‘माझी जीवनकथा’ पुस्तकामध्ये त्यांनी या अधिवेशनाचा मान बेळगावला कसा मिळाला याचे सविस्तर विवेचन केले आहे. अधिवेशन विजापूर, हुबळी येथे भरविण्यासाठीसुद्धा प्रचंड प्रयत्न झाले. परंतु गंगाधरराव यांच्या अंर्तमनाने जणू कौलच दिला होता. त्यामुळे स्थळ निश्चित होण्यापूर्वीच त्यांनी तयारी सुरू केली होती. बेळगाव व शहापूर येथील काही प्रमुख व्यापाऱ्यांची त्यांनी भेट घेतली व त्यांनी 30 हजार रुपये गंगाधररावांना देणगी दाखल दिले.

या शिवाय ठळकवाडी येथील 50 हून अधिक बंगल्यांच्या मालकांनी आपले बंगले देण्याचे कबूल केले. गंगाधरराव यांनी रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन हंगामी स्टेशन सुरू करण्याची विनंती केली. तत्कालीन जिल्हा काँग्रेस समितीचे चिटणीस भीमराव पोतदार व मनपा अध्यक्ष चौगुले यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला. त्यामुळे हुबळीत झालेल्या बैठकीमध्ये बेळगावला तीव्र विरोध झाला तरी गंगाधरराव देशपांडे यांनी तयारीचा जो आढावा घेतला त्याचा बराच उपयोग झाला. शिवाय बहुतेकांनी या बैठकीत बेळगावला एकमताने पसंती दिली.

याशिवाय गंगाधरराव देशपांडे यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरेल आणि या प्रदेशातील लोकांना चळवळीसाठी उभारी मिळेल, असे सांगितल्याने महात्मा गांधी यांनी या अधिवेशनाला येण्याचे मान्य केले. तत्पूर्वी 1916 मध्ये त्यांनी बेळगावला भेट दिली होती. बेळगावमध्ये झालेले हे एकमेव अधिवेशन होते. जे म. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. अधिवेशनाची तयारी सुरू झाली तेव्हा जिल्ह्यातील 5 लोकांनी नुकसान झाल्यास प्रत्येकी 5 हजार रुपये नुकसान सोसण्याची तयारी लेखी स्वरुपात लिहून दिली. कृष्णराव व जीवनराव या याळगी बंधूंनी सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. आणि तयारी सुरू झाली. बेळगावमध्ये त्यावेळी नळ नव्हते, घरोघरी विहिरी नव्हत्या. पण तेवढे पाणी पुरेसे झाले नसते म्हणून विहीर खोदण्यात आली. जी काँग्रेस विहीर म्हणून आज ओळखली जाते. दरम्यान पुन्हा एकदा प्रांतिक काँग्रेस समितीने हुबळीच्या सभेला विरोध करत पुन्हा बैठक बोलावली. परंतु त्यावेळीही बेळगावचेच पारडे वरचढ ठरले.

जागेचा आराखडा बी. कृष्णराव यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला. अधिवेशनापूर्वी महापालिकेने रस्ते करून देण्याचे ठरवले. त्यामुळे तो खर्च वाचला. बांबू, खांब, वासे हे कोणत्या जंगलात मिळतील, याची चाचपणी करण्यात आली. 1923 मध्ये काकीनाडा येथे अधिवेशन झाले होते. तेथीलच तंबू बेळगावच्या अधिवेशनासाठी मागवून मंडपाचा खर्च वाचविण्यात आला. दरम्यान वृत्तपत्रात आलेल्या आवाहनानंतर वल्लभभाई पटेल यांनीसुद्धा आर्थिक मदत हवी का, अशी चौकशी केली. पण गंगाधररावांनी नम्रपणे नकार दर्शवला. पुंडलिकजी कातगडे, बाबुराव ठाकुर, कृष्णराव याळगी, जीवनराव याळगी यांनी स्वयंसेवक या भूमिकेतून अधिवेशन यशस्वी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी खास घोडे मागविण्यात आले होते. हे स्वयंसेवक अधिवेशन यशस्वी होण्यासाठी अहोरात्र झटले. याशिवाय वसंतराव पोतदार, भीमराव कुलकर्णी, शंकरराव कुलकर्णी यांचे प्रयत्नही महत्त्वाचे ठरले.

अधिवेशनासाठी मोतीलाल व जवाहरलाल नेहरु, अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू, चित्तरंजन दास, लाला लजपतराय, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित मदनमोहन मालविया, सैफुद्दीन किचलेव, डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. या अधिवेशनामध्ये भोजन व्यवस्थेची जबाबदारी वामन कलघटगी यांच्याकडे देण्यात आली होती आणि ती त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे अधिवेशन यशस्वी होण्यामध्ये त्यांचेही प्रयत्न मोलाचे होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी पाणीसाठा करण्यासाठी अधिवेशन स्थळी असलेल्या टेकडीवर मद्रास सदर्न मराठा रेल्वे विभागाने मोठे टँकर बसविले. गजाननराव देशपांडे यांनी टेबल आणि खुर्च्यांची सोय केली. खेमाजीराव गोडसे यांनी पाहुण्यांच्या निवासासाठी खोल्या उभ्या केल्या. तर जीवनराव याळगी यांनी मुंबईहून लहान जनरेटर आणून म. गांधीजी वास्तव्य करत असलेल्या खोलींमध्ये दिव्याची सोय केली.

अधिवेशनाला 30 हजारहून अधिक लोक उपस्थित होते. याच अधिवेशनामध्ये गांधींजींनी ‘अहिंसा आणि असहकार’ याची घोषणा करून चरखा आंदोलनाला नवी दिशा दिली. या अधिवेशनाच्या आठवणी चिरंतन रहाव्यात यासाठी या ऐतिहासिक स्थळाचा जीर्णोद्धार होण्याची मागणी करण्यात आली. त्याची दखल घेऊन 2001 मध्ये काँग्रेस विहिरीचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि याठिकाणी वीरसौध या ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या स्थळाची निर्मिती करण्यात आली. आज वीरसौधमध्ये स्वातंत्र्य लढा, काँग्रेस अधिवेशन यांची छायाचित्रे पहायला मिळतात. अधिवेशनाच्या स्मृती जपण्यासाठी छत्रपती शिवाजी उद्यान येथे महात्मा गांधी स्मारकही उभारण्यात आले.

सर्वांना श्रीखंड पुरीचे जेवण

खेमाजीराव गोडसे यांनी अतिशय उत्तम व कल्पकतेने खोल्या उभ्या केल्या. महात्मा गांधी यांची खोली त्यांनी इतकी सुरेख तयार केली की, ‘धिस ईज नॉट हट, बट पॅलेस’ असे उद्गार महात्मा गांधी यांनी काढले होते. मुख्य म्हणजे भोजनासाठी दररोज मिरजहून चक्का मागवून अधिवेशनासाठी आलेल्या सर्वांना श्रीखंड पुरीचे जेवण देण्यात येत होते.

अधिवेशनाचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांमध्ये भगतसिंग पत्रकार म्हणून आले होते. सोबत त्यांचे वडील किसनसिंग होते. पहिले व दुसरे रेल्वेगेट यादरम्यान हंगामी रेल्वेस्टेशन उभारण्यात आले. ज्याला फ्लॅग स्टेशन म्हणून ओळखले जाते. मुख्य म्हणजे या रेल्वेमध्ये एका डब्यामध्ये 24 जणांनी बसावे, असे मराठी व तमिळमध्ये लिहिले होते, अशी माहिती कृष्णराव याळगींचे सुपुत्र विठ्ठलराव याळगी यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article