यंदा गोकूळ उत्पादकांची दिवाळी होणार आंनददायी ; 'इतक्या' कोंटींची मिळणार भेट
५ लाख दूध उत्पादकांची दिवाळी आनंददायी ठरणार
कोल्हापूर - यंदा २२ कोटी ३७ लाख रुपये इतकी ज्यादा रक्कम फरक म्हणून दिली आहे. त्यामुळे गोकुळशी सलग्न ५ लाख दूध उत्पादकांची दिवाळी आनंददायी ठरणार आहे, असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
चेअरमन मुश्रीफ म्हणाले, गोकुळने दूध उत्पादकांना आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पुरवठा केलेल्या म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे आणि गाय दूधास प्रतिलिटर १ रुपये ४५ पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक दिला आहे.
दूध संस्थासाठी प्रतिलिटर सरासरी १ रुपये २५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स पोटी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना हीरक महोत्सवी वर्षानिमित्त जादा दर फरक प्रतिलिटर २० पैसे दिला असून तो देण्यात आलेल्या फरकामध्ये समाविष्ट केला आहे.
जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळ संलग्न ८ हजार दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख दूध उत्पादकांना फरक दिला जाणार आहे. दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या फरकासह गोकुळने या आर्थिक वर्षामध्ये दूध उत्पादकांसाठी राबवलेल्या विविध योजना व उपक्रमावर ४२ कोटी रुपये खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी उपस्थित होते.
२५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट
प्रतिदिनी गोकुळने दूध संकलनाचा १८ लाख ५९ हजार लिटरचा टप्पा ओलांडला आहे. लवकरच २० लाख लिटरचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. तसेच २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
पूरग्रस्त भागात दूधाचा पुरवठा
गोकुळने मराठवाडा, सोलापूर जिल्ड्यातील पूग्रस्त भागात दूधपुरवठा केला आहे. दुभत्या जनावरांना चारा, पशुखाद्याचा पुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले.
मुंबईमधील दही प्रकल्प अंतिम टप्प्यात
वाशी नवी मुंबई येथील दही प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. नवी मुंबई आणि पुणे शाखेसाठी योग्य जागा खरेदी तसेच आईस्क्रीम, चीज, गुलाबजामन उत्पादन व विक्री दिवाळीपूर्वी सुरु करण्याचा प्रयत्न आहे. सिताफळ, अंजीर, गुलकंद बासुंदीही विक्रीसाठी उपलब्ध करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.