यंदा इफ्फीत नवोदित भारतीय चित्रपटांसाठी स्वतंत्र विभाग
20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणार आयोजन
प्रतिनिधी/ पणजी
येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 55 व्या इफ्फीमध्ये एक स्वागतार्ह पाऊल टाकताना भारतीय चित्रपटांच्या नवोदित निर्मात्यांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली आहे. नवीन दिग्दर्शकांच्या कार्याचे प्रदर्शन करून त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. त्याअंतर्गत जास्तीत जास्त 5 नवोदित चित्रपट निवडण्यात येतील. ते सर्व चित्रपट ‘सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट’ विभागात दाखवण्यात येतील.
या विभागाद्वारे इफ्फीकडून देशातील विविध कथा आणि सिनेमॅटिक शैली
प्रदर्शित करणाऱ्या नवोदित भारतीय चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. या निवडीतून तऊण चित्रपट निर्मात्यांची सर्जनशील दृष्टी आणि कथा मांडणीतील अनोखा दृष्टिकोन अधोरेखित होईल.
याव्यतिरिक्त पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाच्या सर्जनशीलतेचा आणि क्षमतेचा सन्मान करणे तसेच भारतीय चित्रपटांच्या विकासात या दिग्दर्शकाच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने 55 व्या इफ्फीमध्ये भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कारदेखील प्रदान करण्यात येणार आहे.
भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार
नवोदित भारतीय दिग्दर्शकांना त्यांची सर्जनशील दृष्टी, कलात्मक गुणवत्ता, कथाकथन आणि एकूण प्रभावासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत 5 लाख ऊपये रोख आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या विभागाच्या प्रवेशिका खुल्या करण्यात आल्या असून 23 सप्टेंबर 2024 ही चित्रपट सादर करण्याची अंतिम मुदत आहे. याबाबतचे इतर संबंधित तपशील डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट इफ्फीगोवा डॉट ओआरजी या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.