For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भगवंतांचा विस्तार म्हणजेच हे जग होय

06:12 AM Oct 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
भगवंतांचा विस्तार  म्हणजेच हे जग होय
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

ईश्वर प्राप्तीतून मिळणारे आत्मसुख कायम टिकणारे असून ते कधी कमी होत नाही. प्रापंचिक सुख कितीही मिळाले तरी त्यातून ते आणखी मिळावे अशी इच्छा निर्माण होते किंवा ते मिळाले नाही तर वाईट वाटते. एखाद्याला ते मिळाले नाही तर ज्याला ते मिळाले आहे त्याचा तो द्वेष करू लागतो. थोडक्यात प्रापंचिक सुख हे इच्छा, द्वेष, सुख, दु:ख ह्या विकारांची जननी आहे परंतु आत्मसुख परिपूर्ण असल्याने त्यातून विकार उत्पन्न होत नाहीत. प्रापंचिक सुखाच्या तुलनेत कितीतरी श्रेष्ठ असलेल्या आत्मसुखाकडे पाठ फिरवल्याने माणसाचे जन्म-मरणाचे फेरे चालूच राहतात.

मनुष्य ह्या जगातल्या व्यक्ती आणि वस्तू स्वत:साठी आहेत असं समजून मी आणि माझे ह्या भावनेने संसाराला कवटाळून राहू इच्छित असतो. म्हणून माणसाला जागं करण्यासाठी भगवंत पुढील श्लोकात सांगतात की, अव्यक्तरूपाने मी हे सर्व जग व्यापलेले आहे. पाण्यावर जसा फेस दिसतो त्याप्रमाणे सर्व भूते माझ्यात आहेत असे दिसते पण तो भासच असतो.

Advertisement

मी चि अव्यक्त-रूपाने जग हे व्यापिले असे । माझ्यात राहती भूते मी न भूतांत राहतो ।। 4 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात भगवंतांपासूनच हे जग तयार झालेले असल्याने त्यांचा विस्तार म्हणजेच हे जग होय. जसे दूध विरजले असता त्याचे दही होते अथवा बीचे झाड होते किंवा सोन्याचेच अलंकार बनतात. गोठलेले तूप घट्ट असून ते अगदी कमी जागेत मावते पण तेच गरम केले की पसरते म्हणजे त्याचा विस्तार होतो त्याप्रमाणे भगवंतांचे अव्यक्तस्वरूप थिजलेले असते, तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते आणि त्रैलोक्याच्या रूपाने विस्तारते. लाटेचे पाणी उफाळून आले की, त्यावर फेस येतो प्रत्यक्षात त्यात पाणी नसून ते केवळ हवेचे बुडबुडे असतात. माणसाचे अस्तित्व त्या हवेच्या बुडबुड्याप्रमाणे असल्याने सर्व भूते भगवंतात सामावली आहेत असे वाटले तरी ज्याप्रमाणे स्वप्नातील माणसे जाग आल्यावर जशी नाहीशी होतात त्याप्रमाणे जो ह्या जीवनरुपी महास्वप्नातून जागा झाला आहे त्याच्या हे लक्षात येते की, त्याचे व इतर सर्वांचे अस्तित्व हा केवळ भास आहे. त्यामुळे त्याच्यात भगवंतांचे अस्तित्व नसते.

पुढे स्वत:च्या ऐश्वर्ययोगाबद्दल सांगताना पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत ही कल्पना सोडून माझा ऐश्वर्ययोग पहा. मी भूतांची निर्मिती करतो, तथापि अलिप्त असल्याने भूतांचे ठिकाणी नसतो.

न वा भूते हि माझ्यात माझा हा दिव्य योग की । करितो धरितो भूते परी त्यात नसे कुठे ।।5 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला म्हणाले, मायेच्या पलीकडे असणाऱ्या माझ्या शुद्धस्वरूप स्थितीकडे तू पाहशील तर हे सर्व प्राणी माझ्यात आहेत असे म्हणणे व्यर्थ आहे हे तुला पटेल. अरे हे सर्व विश्व मीच व्यापलेलं आहे आणि मीच सर्वांच्या रूपाने वावरत असतो मग इतरांना जागा कुठून येणार? मात्र माझा हा दिव्ययोग ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांना मी सोडून इतर सर्वांचे अस्तित्व जाणवते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.