हे जग ब्रह्ममय आहे
अध्याय चौथा
आपली जीवनयात्रा ईश्वरी इच्छेनुसार चालणार आहे हे लक्षात येणं हे ज्ञान आणि त्यानुसार निरपेक्षतेनं कर्म करत गेल्यास आपलं पाप नष्ट होणार आहे हे समजणं ह्याला विज्ञान म्हणतात. ज्ञान आणि विज्ञान याची ज्याला पुरेपूर कल्पना आहे तो सर्व प्राणिमात्रांकडे समदृष्टीने पहात असतो. तसेच ह्यांच्यापैकी कुणीही आपल्या जीवनक्रमात फेरफार करू शकत नाहीत हेही त्याच्या लक्षात आलेले असल्याने त्याच्या मनात कुणाविषयीही रागलोभ नसतो. तो आयुष्यभर सर्वांबद्दल प्रेमभाव बाळगून असतो. हे जग ईश्वरव्याप्त असून सर्वांच्यातील ईश्वरी अंश त्यांना दिसत असतो ह्या अर्थाचा वश्यऽ स्वर्गो जगत्तेषां जीवन्मुक्ताऽ समेक्षणाऽ । यतोऽ दोषं ब्रह्म समं तस्मात्तैर्विषयीकृतम् ।।18।। श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार मिळालेलं काम ईश्वरीकार्य आहे ह्याची खात्री कर्मयोगी मनुष्यास असते. ते निरपेक्षतेनं करून ईश्वरास अर्पण करणे हे एकच कर्म ते नित्यनेमाने करत असतो. दोषरहित व समान असे ब्रह्म त्यांनी आपल्या ज्ञानाचा विषय केलेला असतो.
ब्रम्हाच्या सततच्या अभ्यासाने ब्रम्हाचे दोषरहित असणे व सर्वांना समान वागणूक देणे हे गुण त्याच्याही अंगात भिनलेले असतात. या गुणांमुळेच त्यांच्या मनात सर्वांच्याबद्दल प्रेमभावना व आपुलकी असल्याने त्यांना सर्वांच्यातील ईश्वरी अंश स्पष्ट दिसत असतो व सर्व विश्व ब्रह्ममय असल्याची त्यांना खात्री असते. त्यांच्या चित्तातील मळ पूर्णपणे नाहीसा झालेला असल्याने निर्मळ मनाने तो सतत माझेच चिंतन करत असतो. इहपरलोकातील सुख हे तात्पुरते असल्याने त्या सुखावर पाणी सोडण्यास तो सहजी तयार होतो. ह्या ब्रह्मभावाचा त्यांनी आश्रय घेतलेला असल्याने स्वर्ग व जगत त्यांना वश असते. पुढील श्लोकात बाप्पा सांगतात अशा लोकांना हर्ष, शोक या देहाच्या अवस्था जाणवत नाहीत किंवा मोहाची बाधा होत नाही.
प्रियाप्रिये प्राप्य हर्षद्वेषौ ये प्राप्नुवन्ति न ।
ब्रह्माश्रिता असंमूढा ब्रह्मज्ञाऽ समबुद्धयऽ ।। 19।।
अर्थ- प्रिय अथवा अप्रिय गोष्ट प्राप्त झाली असता ज्यांना हर्ष अथवा दु:ख होत नाही, जे ब्रह्माचा आश्रय करतात, मोहरहित व सर्वत्र समान बुद्धि ठेवणारे असतात ते ब्रह्मज्ञ होत म्हणजे ब्रह्म जाणणारे असतात.
विवरण- सामान्य माणसाची देहबुद्धी जागृत असते. मी म्हणजेच देह अशी कल्पना दृढ असल्याने त्याला हवं तसं झालं की, तो सुखी होतो. त्याला नको असेल तसं घडू लागलं की, त्याला वाईट वाटतं. एखादी वस्तू आवडली की, ती आपल्याला हवी या विचाराने त्याला त्या वस्तूचा मोह होतो. वस्तू लवकर मिळाली नाही तर त्याला त्या वस्तूचा लोभ सुटतो. ती वस्तू मिळण्यात जर कुणी आड आलं तर त्याचा राग येतो. एक देहबुद्धी इतके सगळे चमत्कार घडवते. जेव्हा आपल्यातल्या ईश्वराचा विसर पडतो तेव्हा देहबुद्धी प्रबळ होते पण ज्या साधकांना ईश्वरी अस्तित्वाची जाणीव सतत होत असते, त्यांना सर्वत्र ईश्वराशिवाय काहीच दिसत नसते. प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत ईश्वरी अंश जाणवत असतो.
प्रत्येक परिस्थितीत त्याला ईश्वरी हात दिसत असतो. असे साधक स्वत:ला ईश्वरापासून वेगळे समजत नसतात. सर्व जग ब्रह्ममय आहे आणि ब्रह्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला येथे जागा नाही हे तत्वज्ञान त्यांना पुरेपूर पटलेलं असल्याने सर्वत्र ईश्वर सोडून अन्य काही नाहीच या खात्रीमुळे इतर कोणतीही परिस्थिती, व्यक्ती वा वस्तू या असत्य असून केवळ ईश्वर एकच सत्य आहे हे ब्रह्मज्ञान त्यांना झालेलं असल्याने सुख, दु:ख, मोह या देहाच्या कोणत्याही अवस्था त्यांना जाणवत नाहीत. प्रारब्धानुसार आलेले भोग ते भोगत असतात पण त्या भोगांच्या दु:खामुळे त्यांच्या साधनेत खंड पडत नाही.
क्रमश: