हे यशही नसे थोडके
पॅरिस येथे पार पडलेली पॅरालिंपिक स्पर्धा भारतासाठी अत्यंत महत्वाची आणि लक्षवेधी ठरली. 7 सुवर्ण पदकांची कमाई करत एकंदर 29 पदकांची लयलुट करत भारताने निर्भेळ आणि नोंदणीय असे यश संपादन केले. मागच्या पॅरालिंपिक स्पर्धेच्या तुलनेमध्ये भारताची यावेळची कामगिरी अधिक गोल्डन ठरली. त्यामुळे भारतीय संघ या यशासाठी नक्कीच कौतुकास्पद पात्र ठरला आहे.
84 सदस्यांचे पथक पॅरीसच्यापॅरालिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. 28 ऑगस्टपासून सुरू झालेल्या स्पर्धेचा समारोप 8 सप्टेंबरला झाला. 29 पदके ही आजवरची भारताची ऑलिंपिक इतिहासातील सर्वोच्च कामगिरी मानली जाते. 7 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके आणि 13 कास्य पदकांसह 29 पदके प्राप्त करत 18 व्या स्थानी भारतीय संघ राहिला. भारतीय खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीसाठी सरकार त्याचप्रमाणे पॅरालिंपिक कमिटी
ऑफ इंडिया यांचे भक्कम पाठबळ महत्वाचे ठरले. खेळाडूंना चांगल्यात चांगल्या सुविधा देण्यासोबत त्यांची वैयक्तिक काळजी घेण्याचे समिती व सरकारने संयुक्तपणे पाहिले. तिरंदाजीत शितल देवी हिने आपला मागचा विक्रम मागे टाकला. अॅथलेटिकमध्ये सुमीत अंतील याने 70.59 मीटर अंतरावर भालाफेकमध्ये नवा विक्रम नेंदला. यासोबत शरद कुमार, धरमबीर आणि सचिन खिलारी यांनीदेखील आपल्या क्रीडा प्रकारात विक्रम प्रस्थापित केला. नेमबाज अवनी लेखरा हिने आपला पूर्वीचा विक्रम मोडीत काढला. भारताने या स्पर्धेत आणखी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकाच दिवसामध्ये 8 पदके भारताने पटकाविली. ज्यामध्ये 2 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कास्य पदकांचा समावेश होता. यापूर्वी टोकियो 2020 स्पर्धेमध्ये एकाच दिवशी भारताने 5 पदके मिळविली होती.
या स्पर्धेमध्ये शितल देवीचा गौरव करणे रास्त ठरणारे आहे. कारण ती सर्वात युवा खेळाडू आहे. 17 वर्षांची शितल देवी पॅरालिंम्पिक स्पर्धेत पदार्पण करणारी सर्वात युवा अॅथलिट ठरली आहे. तर धरमबीर हा 35 वर्षीय खेळाडू ज्येष्ठ खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेमध्ये महत्वाचे म्हणजे महिलांचा सहभाग सर्वाधिक राहिला आहे. 84 पैकी 32 महिला यंदाच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. पदकांमध्ये सुद्धा लक्षणीय वाटा उचलताना 10 पदके आपल्या नावावर केली. 1 सुवर्ण, 1 रौप्य, 8 कास्य पदके महिलांनी जिंकली आहेत. यातही अवनी लेखरा हिचे विशेष कौतुक करण्याची गरज असून तिने टोकियो 2020 पाठोपाठ यंदाच्या पॅरालिंपिकमध्येही पदक जिंकत आपली कामगिरी अधिक सरस केली आहे. तुलसी मती, मुरगेसन, शितल देवी आणि मनिषा रामदास यांनी या स्पर्धेत यंदा पदार्पण करत पदके जिंकली आहेत. स्पर्धेचा इतिहास पाहता 11 स्पर्धेत 12 पदके या तुलनेत गेल्या दोन स्पर्धांमध्ये 48 पदकांची कमाई करणे ही भारताची खऱ्या अर्थाने स्पृहणीय कामगिरी ठरली आहे. टोकियो 2020 स्पर्धेत 19 पदके प्राप्त केली होती. त्यात 5 सुवर्ण, 8 रौप्य, 6 कास्य पदके समाविष्ट होती. टोकियो पूर्वीच्या पॅरालिंपिक्स स्पर्धांकडे पाहिल्यास भारताने केवळ 4 सुवर्ण पदके मिळविली होती. आता मागच्या दोन स्पर्धातले यश हे निश्चितच कौतुकास्पद म्हणता येईल.