For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यावर विचार गरजेचा...

06:13 AM Jun 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
यावर विचार गरजेचा
Advertisement

केवळ छोट्या छोट्या कारणावरून होणारे मतभेद, ईगो यातून होणारी भांडणे इतकी विकोपाला जाऊ लागतात की नाते संपवण्यापर्यंतचा विचार समोर येऊ लागतो. त्या जोडप्यासोबतच कुटुंबातील सगळ्यांनाच ते त्रासदायक ठरते, तरुण जोडप्यांची घटस्फोटांची वाढती संख्या खरोखरच चिंताजनक आहे. घटस्फोट घेतल्यानंतर लगेच समस्या मिटेल असे वाटले तरी त्यानंतरही नवीन समस्या उद्भवू शकतात.

Advertisement

मॅडम मला नवऱ्यासोबत राहायचं नाही. मी वेगळी राहून सुखी होईन. नकोय मला संसार! अंग हो हो! पण नेमकं काय झालं आहे? मॅडम आमचे विचार फारसे जुळत नाहीत. मतभेद होतात. कुठून या माणसाच्या प्रेमात पडायची दुर्बुद्धी झाली मला तेच कळत नाही! आम्ही अगदी छान आयडियल कपल होऊ असं वाटायचं मला! पण कसलं काय.. जाऊ दे. मी स्वत: सक्षम आहे माझ्या मुलाला वाढवायला! त्याच्यापेक्षा माझा जास्त अधिकार आहे मुलावर. अग मधू, काय चाललंय तुझं? इतका वेळ शांत असलेल्या तिच्या आईने बोलायला सुरुवात केली. किती बोलतेस? तुमचा गोड मुलगा तुमच्या मधला दुवा आहे. त्याच्या वाटण्या करायला तो काय पोळी भाकरीचा तुकडा आहे का? त्या मुलाची अवस्था पहा जरा. तुम्हा दोघांचंही प्रेम हवे आहे त्याला. खरंच काही प्रॉब्लेम असता किंवा घटस्फोट घेणं गरजेचं असतं तर मी साथ दिली असती तुला. पण आताचा तुझा हा निर्णय शहाणपणाचा नाही.

मॅडम, मी हिची बाजू मुळीच घेणार नाही. मुळात ही हट्टीच आहे. लहानसहान कारणांवरुन लगेच हा निर्णय? सगळी माणसे खूप चांगली आहेत. मतभेद नसतात कुणामध्ये? तुम्हीच समजावून सांगा तिला! मी खरंच कंटाळले. शुल्लक कारणांवरून घटस्फोटाचा निर्णय किती शहाणपणाचा? यामध्ये दोन्ही कुटुंबाची विनाकारण फरफट व या चिमुकल्याचा त्यात काय दोष हो? छोट्या छोट्या कारणांवरून मुलीने घेतलेला टोकाचा निर्णय तिच्या आईला अस्वस्थ करणारा होता. जोडप्यांमधील मतभेद आणि घटस्फोटाच्या दिशेने होणारा प्रवास अशा अनेक केसेस समोर येत असतात. समस्याग्रस्त जोडपी, विसंवादाची विविध कारणे, नात्याचे बदलते प्रवाह, नात्यांची फिल्मी समिकरणं, पतीपत्नींच्या एकमेकांकडून वाढलेल्या अपेक्षा, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून विसंवादी रुप धारण करून घटस्फोटाचा निर्णय घेणं असं चित्र सर्रास पाहायला मिळू लागले आहे. काही अपवादात्मक केसेसमध्ये घटस्फोट घेण्याला पर्याय नसतो कारण त्यावेळी घटस्फोट ही गरज बनते.

Advertisement

परंतु केवळ छोट्या छोट्या कारणावरून होणारे मतभेद, ईगो यातून होणारी भांडणे इतकी विकोपाला जाऊ लागतात की नाते संपवण्यापर्यंतचा विचार समोर येऊ लागतो. त्या जोडप्यासोबतच कुटुंबातील सगळ्यांनाच ते त्रासदायक ठरते, तरुण जोडप्यांची घटस्फोटांची वाढती संख्या खरोखरच चिंताजनक आहे.

घटस्फोट घेतल्यानंतर लगेच समस्या मिटेल असे वाटले तरी त्यानंतरही नवीन समस्या उद्भवू शकतात. क्षुल्लक कारणावरून घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाच्या परिणामांना त्या जोडप्याला सामोरे जावे लागतेच परंतु मुले असतील तर त्यांची फरफट होते. या सगळ्या टप्प्यातून जात असताना आणि नंतरही त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहतात. सुदृढ मानसिक आरोग्यासाठी मुलांना दोघांच्याही प्रेमाची गरज असते. परंतु भांडणाच्या, वादविवादाच्या नादात काही जोडप्यांना याचे भान राहत नाही. एखाद्या मुलामुलींची आई वडिलांपैकी एकावर जास्त माया, प्रेम असू शकते परंतु या गोष्टीचा शस्त्रासारखा उपयोग करून पुन्हा एकाचाच ‘अपत्यावर’ अधिकार असल्यासारखे त्याला वागवू पाहणे चुकीचे ठरते. या साऱ्या गोष्टींमुळे मुली चिडचिडी, भित्री होतात. नकारात्मक विचार करण्याकडे त्यांचा कल वाढू शकतो आणि व्यक्तिमत्त्व विकासामध्ये या गोष्टी अडथळा बनू शकतात, याचे पालकांनी भान ठेवणे आवश्यक आहे.

आई-वडिलांच्या भांडणात मुलांची वाटणी करणे हे अतिशय क्लेशकारक आहे. क्षुल्लक कारणावरून घटस्फोटाचा निर्णय घेत असताना तो निर्णय अमलात आणल्यानंतर ज्या गोष्टींना सामोरे जावे लागते त्याचा विचारही तटस्थपणे करायला हवा. ज्यावेळी कायदेशीररित्या पती-पत्नीचे नाते संपुष्टात येते त्यावेळी हे नातं आता संपलंय याचा स्वीकार वाटतो तेवढा सोपा नसतो.

उमेदीने मांडलेल्या संसाराचे तुकडे वेचणे हे वाटते तेवढे सोपे नसते. घाई घडबडीत घेतलेल्या अशा निर्णयाने पश्चात्तापाची वेळ येते. विलक्षण एकाकीपण, स्वत:च्या अत्यंत व्यक्तिगत आयुष्यावर टीका टिप्पणी, ठोस उत्तर देता येत नाहीत असे जनमानसाचे असंख्य प्रश्न, सल्ले यांचे चटके बसू लागतात. घटस्फोटानंतर मनस्थिती दुखरी, नाजूक बनते. कितीही खंबीरपणा दाखवला तरी तो सारा काळ वेदनादायी असतो. काही वेळा काही जणांना अशा साऱ्या प्रक्रियेदरम्यान हे सारे थांबले पाहिजे अशीही जाणीव होते परंतु इगो नावाचा विषाणू त्यावर मात करतो.

एक लक्षात घ्यायला हवे की कोणत्याही नात्यामध्ये मतमतांतरे, मतभेद असतातच.

दोन माणसे वेगळी आहेत म्हटल्यानंतर आचार-विचार, मते यात अंतर हे असणारच आहे. परंतु एकमेकांना समजून घेत सुवर्णमध्य साधणे गरजेचे आहे.  पती-पत्नीच्या वादांची असंख्य कारणे असतात परंतु त्याच्या मुळाशी ठराविक मुद्दे असतात. अट्टाहास, दुराग्रह असणे. भावनातिरेक, कमी समायोजन क्षमता, नीटपणे व्यक्त न होणे, समजून घेताना काही प्रश्न उद्भवणे, संवादाचा अभाव, चुकीच्या पद्धतीने संवाद हे सारे सुसंवादात अडथळे निर्माण करते आणि अडथळ्यांची शर्यत पार करताना चिकाटी कमी पडू लागते. जोडप्यांमध्ये मतभेद असणारच आहेत परंतु त्याचे मनभेदांमध्ये रूपांतर होत नाही ना हे पाहणे फार गरजेचे आहे.

प्रेम, विश्वास, आपुलकी, तडजोड, एकमेकांना समजून घेणे या पायावरच वैवाहिक नात्याची इमारत उभी असते. तो पायाच डळमळीत झाला तर सारे अवघड होऊन बसते. मुठीतून अलगदपणे निसटणाऱ्या वाळू सारखे आपल्या हातून आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण, माणसे निसटू लागतात आणि कोवळ्या जीवांचे त्यामध्ये हाल होतात. क्षुल्लक कारणांवरून होणारे मतभेद किती आणि कुठवर न्यायचे याचे भान जोडप्याने ठेवणे गरजेचे आहे. एकमेकांना समजून घेऊन एकमेकांतील गुणदोषांचा शोध लागल्यानंतर गुणांचे कौतुक आणि दोषांवर प्रयत्नपूर्वक उपाययोजना करणे आवश्यक आहे. विसंवादाची कारणे शोधून दोन्ही बाजूंनी त्यातून मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा. वैवाहिक नाते टिकण्यासाठी दोघांचेही नाते टिकवण्याची इच्छा आणि प्रयत्न महत्त्वाचे असतात हे मात्र खरं!!

अॅड. सुमेधा देसाई

Advertisement
Tags :

.