यावर विचार गरजेचा...
खरं म्हणजे तुम्ही लग्नच करायला नको होतं. कशाला लग्न केले? यामध्ये अडकायचेच नाही ना..एकटे रहायचे होते! दोघेही सुखी झालो असतो. जोडीदाराला उद्देशुन उच्चारलेली अशी अनेक वाक्य, संवादाच्या अनेक फैरी झडताना अनेकदा पहायला मिळतात.
काय दुर्बुद्धी आठवली आणि तुझ्याशी लग्न केलं. वीट..वीट आलाय नुसता. घरामध्ये जरा शांतता नाही. असा एक तगडा संवाद पुरुष पात्राच्या मुखातून बाहेर पडतो आणि स्त्राrपात्राच्या हुंदक्यातुन तात्पुरता या नाट्याचा शेवट होतो. असे वादविवाद, संवाद-विसंवाद किंवा मतभेद पती पत्नीच्या नातेसंबंधातच घडतात असे नाही तर जिथे दोन माणसे भेटतात नाते असणारी, नसणारी तिथे कधी ना कधीतरी अशी संवादनाट्या वेगवेगळ्या स्वरुपात घडतच असतात. इथे ना वयाची अट असते, ना शिक्षणाची, ना आर्थिक दर्जाची.
समाजात राहताना, नाती सांभाळताना, विविध भूमिका पार पाडताना मतभेद, विसंवादी सूर उमटणारच! परंतु हे ‘मतभेद मनभेदापर्यंतचा प्रवास’ करत नाहीत ना? जरी आयुष्याची वाटचाल करत असताना अगदी शंभर टक्के ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ संभवत नसले तरी जीवनाचे गाणे अगदीच बेसूर होणार नाही किंवा त्या दिशेने आपली वाटचाल होणार नाही इतपत काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. ज्यांच्यामध्ये सामाजिक कार्यक्षमता विकसीत झालेली असते अशी माणसे विसंवादाकडे वाटचाल होणार नाही याकडे लक्ष ठेवून असतात. घराचे घरपण टिकवून ठेवण्यासाठी, नाते टिकवून ठेवण्यासाठी भावनिक हुशारीतील दोन्ही पैलू ‘व्यक्तिगत कार्यक्षमता आणि सामाजिक कार्यक्षमता’ महत्त्वाची भूमिका निभावत असतात.
आपणा सर्वांनाच माहिती आहे की भावना या वर्तनासाठी, जगण्यासाठी, कृतीसाठी प्रेरीत करत असतात. यश-अपयशाचे अनेक टप्पे जीवनात येत असतात. समजा एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आले तर निराश न होता असे का झाले याचा शोध घेऊन, त्यावर काम करुन, पुन्हा जोमाने प्रयत्न करायला जे तयार असतात ते निश्चित आपले ध्येय गाठू शकतात. हे सर्व भावनिक हुशारीच्या बळावर जमू शकते. भावनिक गुणांक अर्थात Qिं पद्धतशीर प्रयत्न केल्यास कोणत्याही टप्प्यावर आपण वाढवू शकतो. परंतु असे प्रयत्न मुलांच्या लहानपणीच केले तर भावनांवर योग्य नियंत्रण येऊन अनेक गोष्टी सुकर होऊ शकतात.
‘स्व’ च्या संदर्भात भावनांची जाण असणं, भावनांचं नियोजन करुन स्वत:ला चांगल्या गोष्टींसाठी प्रेरित करणं हे जसं महत्त्वाचं असतं, तसंच स्वत: पलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं आणि त्या दुसऱ्यापर्यंत पोहचवता येणंसुद्धा. महत्त्वाचे असते. सहानुभूती आणि परानुभूती हे शब्द आपल्याला ठाऊक आहेत. परानुभूती म्हणजे दुसऱ्याला नेमके काय वाटते आहे हे त्या व्यक्तीचा दृष्टिकोन लक्षात घेऊन समजून घेणे, तिची मानसिकता लक्षात घेऊन वागणे.
पहा, ज्यावेळी एखादा अभिनेता/अभिनेत्री विशिष्ट पात्राची भूमिका रंगवत असतात त्या क्षणी ती ते भूमिका जगत असतात. इथे परानुभूतीमुळेच अभिनय उत्कृष्ट होत असतो. ए माझ्या मनातलं तु कसं काय ओळखलंस? हे वाक्य काही नातेसंबंधात ऐकायला मिळते ते परानुभूती मुळेच!
परानुभूती हे भावनिक बुद्धीमत्तेचे महत्त्वाचे अंग आहे. जिथे जिथे दुसऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींशी संबंध येतो तिथे परानुभूतीचा अवलंब केल्यास अगदी नाजूक परिस्थितीही कौशल्याने हाताळता येते. भावनिक हुशारी उत्तम असेल तर विविध क्षेत्रात काम करत असताना, नातेसंबंधामध्ये अडचणी उद्भवण्याची शक्यता फारच कमी होते.
अर्थात त्यासाठी मुळात आपल्या मनात डोकाऊन पहायला शिकायला हवे. तर आपल्या मनात येणारे विचार, भावना याकडे लक्ष जाईल. तिथे सुधारणा आवश्यक असल्यास ती करता येईल. सामान्यत: लोकांची भावनांकडे बघण्याची आणि हाताळण्याची विशिष्ट पद्धत असते. त्या आधारे गट करायचे झाल्यास पुढील प्रमाणे करता येतील.
1.ज्यांना आत्मभान असते असे लोक आपल्या मूडस् बाबत सजग असतात. त्यांना त्यांचे स्ट्रेंथही ठाऊक असतात आणि मर्यादांचेही भान असते. कधी मूड बिघडला तर फार वेळ त्यामध्ये ते रुतून बसत नाहीत. सकारात्मक दृष्टिकोनातून ते जीवनाकडे बघत असतात. सजगतेमुळे भावनांचे व्यवस्थापन ते कौशल्याने करतात.
2.काही लोकांचा बरा वाईट मूड त्यांचा संपूर्ण ताबा घेतो. ते भावभावनांच्या लाटेत असे अडकतात की त्यामधून बाहेर पडणं त्यांना शक्य होत नाही. ते आपलं भावनांवर नियंत्रण नाही असे समजत राहतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाहीत. परिणामी अशा व्यक्ती भावनांची हाताळणी योग्य प्रकारे करु शकत नाहीत.
3.काही लोक असेही असतात की ज्यांना आपल्याला काय वाटतंय हे कळत असतं, स्वत:चे बरे वाईट मूड मान्यही करतात परंतु ‘आपलं बुवा अस्संच आहे’ असं म्हणत स्वत:ला बदलायला तयार नसतात. त्या बदलासाठी कष्ट घेण्याची तयारी दाखवत नाहीत.
वरील पैकी आपण कोणत्या गटात मोडतो, हे आजमावल्यावर आपलं भावनांचं नियोजन कसं आहे पडताळून पाहता येईल.
हे नियोजन चांगले असण्यासाठी भावनिक प्रतिसाद आणि प्रतिक्रिया फरक तपासून बघणं गरजेचे आहे. पहा हं, अगदी क्षुल्लक कारणांवरुन रागावणारी मंडळी आपण प्रतिसाद देत आहोत की प्रतिक्रिया हे समजून घेण्याच्या फंदात पडत नाहीत. अनेकदा काही कळायच्या आतच रागावण्याची प्रतिक्रिया देऊन ते मोकळे झालेले असतात. विशिष्ट अशा विचार, भावना, कृतीचा साचा तयार झाला की किंचीतशीही ठिणगी पडायचा अवकाश राग आलाच म्हणून समजा. बऱ्याचवेळा भावनांची हाताळणी कुशलतेने करणे शिकण्याऐवजी अनेक माणसे आपल्या वागण्या बोलण्याचे समर्थन करताना दिसतात. परंतु केवळ रागाच्याच बाबतीत नव्हे तर कोणताही भावनातिरेक हा त्रासदायक असतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी साक्षीभावाने स्वत:चे अंतरंग न्याहाळायला शिकायला हवे. ज्यावेळी आपण असा सराव करतो त्यावेळी भावनांचे रंगही ओळखता येऊ लागतात आणि अपेक्षित प्रतिसाद आणि प्रतिक्रिया देता येतात. अशा व्यक्ती मग भावनिक वादळाला, झंझावाताला योग्य रीतीने काबूत ठेऊ शकतात.
दररोज आपण शारिरीक स्वच्छतेच्याबाबतीत जसे सजग असतो तसे मनाच्या स्वच्छतेच्या बाबतीत ही सजग रहायला हवे. मनामध्ये अविचारांचे, विघातक भावनांचे तण वाढते आहे का याकडे लक्ष असणे गरजेचे आहे. तसे लक्ष असेल तर त्यावर निश्चित काम करता येते. मनाची मशागत उत्तम असेल तर जीवनाची वाटचाल अधिक सुकर होते हे मात्र खरे!
अॅड. सुमेधा संजिव देसाई