हे जीवन हे एक महास्वप्नच आहे
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, अर्जुना शरीर विनाशी असल्याने कालांतराने ते थकते, कमकुवत होते. म्हणून त्यातील आत्म्याला हे जगत चालवणारी शक्ती दुसरे शरीर प्रदान करते. हे म्हणजे एक वस्त्र बदलून दुसरे नेसल्यासारखेच आहे. आत्मा जन्म-मरणरहित असल्याने तो कायम टिकणारा असून अत्यंत शुद्ध आहे. हा प्रलयकाळच्या पाण्यानेही बुडत नाही किंवा अग्नीने जळत नाही. तसेच वायूमध्ये देखील याला शुष्क करण्याची शक्ती नाही. हा नित्य, स्थिर, शाश्वत असून स्वयंप्रकाशित परिपूर्ण आहे. ह्याला तर्कशास्त्राने काही अनुमान काढून जाणता येत नाही तसेच डोळ्यांनी ह्याला बघू म्हंटले तर तेही शक्य नाही. ह्याला मनाने जाणता येत नाही तसेच कोणत्याही साधनाने प्राप्त होत नाही. तो नेहमी जन्म घेत असतो आणि मृत्यू पावत असतो, असे जरी तू मानलेस तर शोक करण्याचे काहीच कारण नाही.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, जो जन्मला आहे, त्याला मृत्यू नि:श्चित आहे आणि जो मृत्यू पावला आहे, त्याला नि:संशय जन्म आहे. म्हणून पार्था ह्या अटळ गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही.
जन्मता निश्चये मृत्यू । मरता जन्म निश्चये । म्हणूनी न टळे त्याचा व्यर्थ शोक करू नको ।।27।।
माउली श्लोकाच्या विवरणाला सुरवात त्यांच्या पुढील प्रसिद्ध ओवीतून करतात, ते म्हणतात, जे उपजे ते नाशे । नाशले पुनरपि दिसे । हे घटिकायंत्र तैसे । परिभ्रमे गा ।।
भगवंत अर्जुनाला म्हणाले, जे उत्पन्न होते ते नाश पावते आणि नाश पावलेले पुन्हा नवीन रूपात दिसू लागते. हा क्रम रहाटगाडग्याप्रमाणे सतत सुरु असतो अथवा, सूर्याचा, उदय आणि अस्त हा निरंतर होत असतो, त्याप्रमाणे देहाचे, जन्म-मरण अखंड होत असते, या विश्वात जन्म-मरण अपरिहार्य असल्याने कुणाला चुकवता येत नाही. अरे, प्राणिमात्रांचाच काय महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही नाश होतो, म्हणून अर्जुना लक्षात घे की, कोणत्याही वस्तूचा उत्पत्ती व नाश हा क्रम टळत नाही. हे जर तुला पटत असेल, तर मग व्यर्थ शोक का करतोस? अर्जुना तू शहाणा असून वेड्यासारखे का करतोस? कोणत्याही बाजूने विचार करून पाहिले, तरी तुला दु:ख करण्याचे काहीच कारण नाही.
पुढील श्लोकात ते म्हणतात, अर्जुना, सर्व प्राणिमात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात. मध्येच फक्त व्यक्त होतात म्हणजे त्यांचे पंचमहाभूतात्मक शरीर मूर्त होऊन दिसते व पुन्हा मृत्यूनंतर ते अव्यक्त होतात. तर मग शोक कसला?
भूतांचे मूळ अव्यक्ती । मध्य तो व्यक्त भासतो। पुन्हा शेवट अव्यक्ती । त्यामध्ये शोक कायसा ।। 28 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, सर्व प्राणिमात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात. मध्येच दिसतात व मृत्यूनंतर पुन्हा अदृश्य होतात. हे सर्व जीव हे जन्मापूर्वी निराकार होते, मग जन्मल्यानंतर त्यांना आकार प्राप्त झाला, मृत्यूनंतर हे आकार नाश पाऊन निराकार, अव्यक्त अवस्थेत असतात. आपण झोपेत स्वप्न बघतो आणि जागे झालो की स्वप्न दिसायचे बंद होते पण म्हणून कुणी त्याचे वाईट वाटून घेतं का? हे जीवन हे एक महास्वप्नच आहे असे समज. आत्म्याच्या ठिकाणी मायेमुळे हा देहाचा आकार दिसतो. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या स्पर्शाने पाण्यावर लाटा तयार होतात किंवा सोनाराच्या कलेने सोन्याला दागिन्यांचा आकार येतो, त्याप्रमाणे विश्वातील सर्व मूर्त पदार्थ मायेमुळे आकाराला आलेले आहेत. अर्थातच हे आकार तात्पुरते असतात आणि कालांतराने ते नष्ट होतात. असे असताना त्याबद्दल तू दु:खाने का रडत बसला आहेस?
क्रमश: