For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वत:ची कबर खोदणे म्हणजे हेच!

06:40 AM Dec 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वत ची कबर खोदणे म्हणजे हेच
Advertisement

मतचोरीच्या मुद्यावर भारतीय राजकारणात तापमान वाढत असताना दिल्लीतील राजकीय रंगमंचावर एक विचित्र चित्र उभे राहिले. एकीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘व्होट चोर, गद्दी छोड’ या घोषणेअंतर्गत रामलीला मैदानावर आयोजित रॅलीत सत्ताधारी भाजपवर धारदार हल्ला चढवला. दुसरीकडे, त्याच रॅलीतील ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ सारख्या आक्रमक घोषणांमुळे लोकसभेत खळबळ उडाली आणि राज्यसभेतही गोंधळ माजला. या घटनांमधून काँग्रेसचा सत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न दिसतो, पण नेत्यांचे ‘सेल्फ गोल’ स्वत:च्याच पक्षाची कबर खोदण्यासारखे ठरत आहेत. यापूर्वी मोदी यांना 111 वेळा गलिच्छ भाषेत वैयक्तिक हल्ले आणि अपमानजनक बोलून काँग्रेस नेत्यांनी लोकांची सहानुभूती गमावली. आताही त्यांच्यातील काहींचे वक्तव्य मुख्य मुद्यांना बाजूला सारत आहे. याचा फायदा भाजपला होत असून, जनतेत काँग्रेसबद्दल संताप निर्माण होत आहे. राहुल गांधी यांचे रामलीला मैदानावरील भाषण हा काँग्रेसच्या सध्याच्या रणनीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांना थेट इशारा दिला. ‘काँग्रेस सत्तेत आल्यावर या आयुक्तांवर कठोर कारवाई होईल,’ असे म्हणत त्यांनी मतचोरीचे आरोप केंद्रस्थानी ठेवले. निवडणूक आयोगाने भाजपच्या बाजूने भूमिका घेतल्याचा दावा करत, राहुल म्हणाले की, हा संविधानावर हल्ला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘सत्ता सर्वोपरी’ या विचारसरणीची टीका करून त्यांनी सत्याच्या जोरावर सत्ता उलथवण्याचा विश्वास व्यक्त केला. रॅलीत पाच कोटी सह्यांची पोती प्रदर्शित करून काँग्रेसने देशव्यापी मोहिमेचा दबदबा दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रियांका गांधी यांनीही बिहारमधील आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यात 10 हजार रुपयांचे वितरण ‘मतचोरी’ असल्याचे सांगितले. हे मुद्दे खरे तर काँग्रेसला मजबूत करणारे आहेत. पण या रॅलीत घडलेल्या घोषणांनी सगळे काही बिघडवले. ‘मोदी तेरी कब्र खुदेगी, आज नही तो कल खुदेगी’ ही हिडीस घोषणा महिला कार्यकर्त्यांनी दिली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अर्थात या महिलेची पात्रता ती काय? देशाच्या राजकारणातील महत्त्व ते किती? पण आपली पायरी सोडून देशाच्या सर्वोच्च नेत्यावर वक्तव्य करणे या असल्या फुटकळ कारभारामुळे संपूर्ण काँग्रेस तोंडघशी पडली आहे. वास्तविक आतापर्यंत त्या महिलेची पक्षातून हकालपट्टी केल्याचे काँग्रेसकडून तातडीने जाहीर होणे किंवा तिला समज देणे गरजेचे होते. मात्र इतक्या गंभीर मुद्यावर काँग्रेसकडून निर्णय झाला नाही हे दुर्दैवी आहे. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी आणि राहुल यांसारखे शीर्ष नेते उपस्थित असतानाही ही घोषणा रोखली गेली नाही असे वातावरण निर्माण झाले. वास्तविक अशा घोषणा एखाद्या कोपऱ्यात दिल्या तरी त्याचा गवगवा होण्याचे दिवस आहेत. परिणामी, सोमवारी लोकसभेत संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ‘काँग्रेसने पंतप्रधानांची कबर खोदण्याची भाषा केली, माफी मागा,’ अशी मागणी करत त्यांनी 2014 च्या एका घटनेचा उल्लेख केला, ज्यात भाजप नेत्याने चुकीचा शब्द वापरला म्हणून माफी मागितली होती. राज्यसभेत जे.पी. न•ा यांनीही हे काँग्रेसच्या ‘विचारसरणीचे प्रतिबिंब’ असल्याचे म्हटले. या वादामुळे लोकसभा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झाली. अशा आक्रमक भाषेचा परिणाम असा झाला की, मतचोरीसारखा गंभीर मुद्दा बाजूला पडला आणि चर्चा फक्त शिव्यांवर केंद्रित झाली. येथे ‘112 वेळा शिव्या’ हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. भाजपकडून सांगितले गेले की, काँग्रेस नेत्यांनी मोदींना विविध भाषणांत 112 वेळा अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे. खरी संख्या कितीही असो, पण हा आकडा भाजपला सोयीचा पडतो. तो जनतेसमोर काँग्रेसला ‘अव्यवस्थित आणि वैयक्तिक द्वेषाने प्रेरित’ दाखवतो. यापूर्वी भाजप नेत्यांनी देखील पातळी सोडून टीका केलेली आहे. भाजपच्या समर्थकांनी फेसबुक आणि व्हाट्सअप वर गांधी घराण्याची यथेच्छ बदनामी केली आहे. तेही दुर्लक्ष करण्यासारखे नाही. मात्र सार्वजनिक व्यासपीठावर असा मुद्दा करून भाजपचे नेते सेल्फ गोल करत नाहीत. त्याऐवजी समाज माध्यमांवर आपल्या समर्थकांमार्फत माहिती पसरवून कुजबूज सुरू केली जाते. तो मुद्दा गाजू लागला आणि भाजपच्या अंगलट आला तर दिलगिरी व्यक्त करून मोकळे होतात. काँग्रेस अशावेळी गप्प राहिली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा किंवा छत्तीसगड अधिवेशनात ‘सत्याग्रही’ म्हणून बनवलेल्या प्रतिमेला धक्का बसतो. काँग्रेसचे नेते मुख्य मुद्यांऐवजी ‘सेल्फ गोल’ मध्ये अडकतात, ज्यामुळे जनतेत संताप निर्माण होतो. एका बाजूला ते सत्तेच्या भ्रष्टाचारावर बोलतात, दुसरीकडे स्वत:ची प्रतिमा ‘ताळतंत्र नसलेले हल्लेखोर’ अशी बनवतात. याचा थेट फायदा भाजपला होतो, जो आपल्या नेत्यांना ‘संयमित आणि विकासकेंद्रित’ म्हणून सादर करतो. काँग्रेसने यापूर्वीही अशा वक्तव्यांमुळे स्वत:ला धक्का दिला आहे. 2017 मध्ये मणिशंकर अय्यर यांनी मोदींना ‘चायवाला’ म्हणून अपमानित केले आणि गुजरात निवडणुकीत पराभव झाला. त्याच वर्षी त्यांच्या ‘नीच आदमी’ वक्तव्याने पक्षाला आणखी नुकसान झाले. 2019 मध्ये राहुल गांधींचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी 1984 च्या दंग्यांबाबत ‘हुआ तो हुआ’ असे म्हटले, ज्यामुळे काँग्रेसने शिख आणि इतर अल्पसंख्याक मतदार गमावले. 2024 मध्ये त्यांचेच उत्तर भारतातील लोकांच्या शारीरिक वैशिष्ट्यांवरील वक्तव्याने पक्षाला झळ बसली. अलीकडे केरळ काँग्रेसने ‘बीडी आणि बिहार’ ही सोशल मीडिया पोस्ट टाकली, ज्याने बिहारमध्ये मतदारांना दुखावले आणि पक्षाला माफी मागावी लागली. राहुल यांचे अमेरिकेतील कथित ‘अँटी-इंडिया’ वक्तव्य किंवा बिहारमधील ‘हायड्रोजन बॉम्ब’ आरोपही अपयशी ठरले, ज्याने मतचोरीचा मुद्दा कमकुवत पडला. अशा वक्तव्यांनी जनतेत संताप वाढतो. विशेषत: मध्यमवर्गीय आणि महिलांमध्ये विरोधी पक्षाची ताकद कमी होते. काँग्रेसला गांधीजींच्या सत्याग्रहाप्रमाणे मुद्यांवर लक्ष ठेवा, वैयक्तिक हल्ल्यांवर नाही हे शिकावे लागेल. ही घटना भारतीय राजकारणाला एक धडा देते. सत्ता उलथवायची असेल तर जनतेच्या मनात शिरावे लागेल. डोक्यात नाही. शिव्या देऊन तर नाहीच नाही. अन्यथा, ‘कब्र खुदेगी’ ही घोषणा स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी लागू होईल. लोकशाहीत परिपक्व विरोधी पक्षाची गरज आहे. त्यांच्या मुद्यातून सरकारविरोधी असंतोष निर्माण व्हायला हवा त्या ठिकाणी विरोधी पक्षाबद्दल संताप निर्माण होतोय.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.