For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वत: भगवंतांनी सांगितलेला हा एकमेव ग्रंथ आहे

06:22 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वत  भगवंतांनी सांगितलेला हा एकमेव ग्रंथ आहे
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, ग्रंथ यथार्थ पूर्ण झाल्यामुळे श्री जनार्दन स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी अत्यंत कृपाळू दृष्टीने माझ्याकडे बघितले. स्वामी प्रसन्न आहेत हे बघून मी त्यांना विनंती केली की, जे हा ग्रंथ काही उद्देशाने वाचतील त्यांना ब्रह्मभावे अनन्य भक्ती प्राप्त होऊन त्यांच्या मनात नामाबद्दल अखंड प्रेम निर्माण होईल असा वर द्यावा. त्यांनी कुणाचाही द्वेष करू नये. त्यांनी कुणाचीही निंदा करू नये. जे दुसऱ्याची निंदा करतात ते सर्वप्रकारच्या पापाचे धनी होतात. माझी ही विनंती ऐकून तुष्ट झालेल्या सद्गुरुंनी अत्यंत कृपादृष्टीने माझ्याकडे पाहिले. ते म्हणाले, तू जे जे मागितले आहेस ते ते सर्व दिले असे समज. ह्या ग्रंथावर ज्यांची अनन्य भक्ती जडेल. कुणाची निंदा करावी, कुणाचा द्वेष करावा असे त्यांच्या मनातसुद्धा येणार नाही कारण निंदा आणि द्वेष त्यांच्या वाऱ्यालासुद्धा उभे राहणार नाहीत. तसेच त्यांना रामनामाचे प्रेम वाटायला लागून दिवसेंदिवस त्यांचे रामनामावरील प्रेम निश्चितपणे वाढतच राहील असाही वर मी देतो. त्यांची अविद्या नष्ट होऊन ब्रह्मभाव वाढत जाऊन त्यांची अनन्य भक्ती वाढत गेल्याने त्यांना निश्चितच ब्रह्मप्राप्ती होईल. असे वरदान देऊन जनार्दनस्वामींनी मला हृदयाशी धरून आलिंगन दिले.

पुढे म्हणाले ह्या ग्रंथाचे जो भजन करेल त्याचे भवबंधन मी नष्ट करून टाकीन. मी स्वत:ला पुरता भाग्यवान समजतो कारण समस्त श्रोत्यांनी माझ्यावर कृपा केली असून पूर्णपणे माझा सांभाळ केला. त्यामुळे ग्रंथार्थ यथार्थ उतरवता आला. ग्रंथाचा अर्थ आणि परमार्थ हे दोन्ही समसमान साधले गेले. येथून पुढे ह्या ग्रंथाचे जेथे जेथे कथाकथन होईल तेथे तेथे श्रोत्यांनी लक्ष द्यावे अशी ह्या दिनाची प्रार्थना आहे. माझी प्रार्थना ऐकून श्रोतेसज्जन समाधानी झाले. ते म्हणाले, ही कथा आता आम्हाला जीव की प्राण झाली आहे. त्यामुळे जेथे ह्या कथेवर आधारित व्याख्यान असेल तेथे आम्ही नक्कीच हजर राहू. श्रोत्यांचे असे समाधान होऊन ते संतुष्ट झाल्यावर वर देणारे श्रीजनार्दन महाराजही संतुष्ट झाले. अशा प्रकारे ग्रंथ सुफळ संपूर्ण झाला. वाराणसी महामुक्तिक्षेत्री, विक्रमशक शके सोळाशे तीसोत्तर ‘वृष’ संवत्सरी एकादश स्कंधावरील टीका जनार्दनकृपेने पूर्ण झाली. त्यादिवशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमा, सोमवार, शिवयोग होता. आपल्या येथील शालिवाहन शकवैभव शके चौदाशें पंचाण्णव ‘श्रीमुख’ संवत्सरात ही अपूर्व टीका पूर्ण झाली. हा ग्रंथ पैठण आणि वाराणसी ह्या दोन्ही ठिकाणी मिळून पूर्ण झाला असल्याने दोन्हीकडील शक संवत्सराचा उल्लेख केला आहे. एकतीस अध्यायात मिळून पंधराशे सुरस श्लोक असून ह्यातील वैशिष्ट्या असे की, त्यामध्ये स्वत: हृषीकेशाने ज्ञानरहस्य सांगितले आहे. स्वत: भगवंतांनी सांगितलेला हा एकमेव ग्रंथ आहे. तसंही अकरा म्हणजे एकावर एक असल्याने तिथे दुजेपणाला वावच नाही. त्यामुळे ही एकादश स्कंधाची  टीका जनार्दन कृपेने साधकांना फलदायी होईल. हा ज्ञानग्रंथ चिद्रत्न असून माझे नाव लिहून स्वत: श्री जनार्दन स्वामींनी यथार्थ संपूर्ण केला. मी एका जनार्दनाला शरण गेलो आहे. ज्याप्रमाणे सूर्याचे तेज लाभल्यामुळे सूर्याचे किरण अंधाराचा नाश करून टाकतात. त्याप्रमाणे श्री जनार्दन स्वामींच्या तेजाने संपूर्ण ग्रंथ प्रकाशमान झाला आहे. ‘जन जनार्दन एक’ हे ज्याने समजून घेतले तो ह्या भवसागरातून सुटल्यासारखाच असतो पण हे ज्यांच्या लक्षात येत नाही ते मात्र स्वत: तयार केलेल्या भ्रमजालात गुंतत जातात. मौसलोपाख्यान नावाचा एकनाथी भागवताचा एकतिसावा अध्याय येथे समाप्त झाला.

Advertisement

एकनाथी भागवत समाप्त

Advertisement
Tags :

.