शिकण्यासाठी हा इतका प्रवास...
आपली शाळा, महाविद्यालय तसेच नोकरीचे स्थान आपल्या घरापासून शक्य तितके जवळ असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असणे स्वाभाविक आहे. तसे असल्यास येण्याजाण्यासाठीचा त्रास वाचतो. प्रवास खर्च कमी होतो. प्रवासाची दगदग करावी लागत नाही आणि मुख्य म्हणजे आपला वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो. अर्थात, अशी आदर्श स्थिती अगदी कमी जणांना लाभते हेही तितकेच खरे आहे. पण आपल्या सर्वांचा प्रयत्न तसा असतो, ही बाब स्पष्ट आहे.
दिल्ली, मुंबई, बेंगळूर आदी शहरांचा विस्तार प्रचंड झाला आहे. त्यामुळे येथे कार्यालय किंवा शिक्षणस्थळ घरापासून कित्येक किलोमीटर दूर असते. प्रतिदिन चाळीस-पन्नास किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. लोक यासंबंधी तक्रारीही करतात पण याला काही पर्याय नसल्याने हे सर्व सहन करावे लागतेच. तथापि, या जगात एक महिला अशी आहे, की जी केवळ शिक्षणासाठी आपल्या घरापासून 6 हजार 700 किलोमीटर अंतराचा प्रवास करते. प्रत्येक आठवड्याला एकदा ती असा प्रवास करते. या महिलेचे नाव नॅट सेडिलो असे आहे. तिचे पती अमेरिकेच्या मेक्सिको सिटी नामक शहरात राहतात. सेडिलो या या स्थानापासून 3 हजारांहून अधिक किलोमीटर दूर असणाऱ्या न्यूयॉर्क या शहरात शिक्षणासाठी जातात.
सेडिलो या वकीलीचे शिक्षण घेतात. त्यांना बौद्धिक संपदा कायद्यांच्या संदर्भात प्राविण्य मिळवायचे आहे. या शिक्षणाची सर्वात उत्तम सुविधा न्यूयॉर्कमध्येच आहे. त्यामुळे त्यांनी न्यूयॉर्कमधील महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तथापि, त्या न्यूयूर्कमध्येच शिक्षण संपेपर्यंत वास्तव्य करु शकत नाहीत. कारण त्या संसारी आहेत आणि पतीलाही वेळ देणे त्या आपले कर्तव्य मानतात. शिवाय, मेक्सिको सिटीत रहाण्याचा खर्च न्यूयॉर्कच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. अशा स्थितीत त्यांना शिक्षणासाठी इतका मोठा प्रवास करणे भाग पडते. त्या सोमवारी पहाटे 4 वाजता विमानाने न्यूयॉर्कला पोहचतात. त्या आठवड्याचे शैक्षणिक तास पूर्ण करुन त्या मंगळवारी रात्री घरी पोहचतात. मेक्सिको सिटी ते न्यूयॉर्क हे अंतर विमानाने चार तासांचे आहे. आता त्यांच्या शिक्षणाचे हे शेवटचे सत्र आहे. त्यांना या प्रवासासाठी मोठा खर्च करावा लागतो. आतापर्यंत त्यांनी या प्रवासासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. वास्तविक, त्या आणि त्यांचे पती या दोघांनाही न्यूयॉर्क शहर आवडले होते. पण, तेथे वास्तव्याचा खर्च फारच मोठा आहे. प्रत्येक वस्तू मेक्सिको सिटीपेक्षा महाग आहे. त्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे.