हा ओसामाचा देश नाही : शर्मा
वृत्तसंस्था/ सिवान
बिहार निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या अंतिम दिनी आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हेमंत विश्व शर्मा यांनी सिवानमध्ये प्रचारसभेला संबोधित केले. सभेदरम्यान शर्मा यांनी स्थानिक नेते आणि राजद उमेदवार ओसामा शहाब यांचे नाव न घेता त्यांची तुलना ओसामा बिन लादेनशी केली. या देशात जितके ओसामा आहेत, त्या सर्वांना हाकलून लावायचे आहे. हा देश भगवान राम आणि सीतामातेचा आहे आणि कधीच ओसामा बिन लादेनसारख्या कुणाचे वर्चस्व मान्य होणार नाही असे वक्तव्य शर्मा यांनी केले आहे.
माझे हिंदीचे ज्ञान काहीसे कच्चे आहे, तरीही मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आसाममध्ये कामाख्या माता असून तिचा आशीर्वाद बिहारवर देखील कायम रहावा. रघुनाथपूर नावच शुभ आहे आणि ही भूमी देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र बाबू यांची कर्मभूमी राहिली असल्याचे शर्मा यांनी सभेत बोलताना म्हटले आहे.
पक्षाने मला येथे प्रचारासाठी पाठविल्यावर येथे राम-सीता भेटतील, असे वाटले होते. परंतु लोकांनी येथे ओसामा देखील असल्याचे सांगितले. ओसामा बिन लादेन तर मारला गेला आहे, आता हा कोण अशी मी विचारणा केली असता, लोकांनी हा तसाच छोटा ओसामा असल्याचे सांगितले. याचमुळे या निवडणुकीत आम्हाला अशा ओसामाला पराभूत करावे लागेल, अशी टिप्पणी शर्मा यानी केली आहे.
शहाबुद्दीनचा उल्लेख
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या भाषणात माफिया शहाबुद्दीनचा उल्लेख केला. ओसामाच्या पित्याचे नाव शहाबुद्दीन आहे, ज्याने हत्येप्रकरणी गिनिज रिकॉर्ड केला होता, यामुळे ओसामाला येथेच न रोखण्यात आल्यास तो पूर्ण देशात फैलावेल. घुसखोरांना मतदानाचा अधिकार नाही. राहुल गांधींनी घुसखोरांसाठी यात्रा काढली होती. परंतु बिहारच्या मतदारयादीतून अशा घुसखोरांना वगळण्यात आले आहे. देशात जेव्हा हिंदू जागा होईल, तेव्हा कुठला ओसामा किंवा औरंगजेब समोर टिकू शकणार नाही असे वक्तव्य हेमंत विश्व शर्मा यांनी केले आहे.