असा तयार झाला नवा ताराबाई रोड
कोल्हापूर :
महाद्वार रोड नंतर कोल्हापुरात दुसरा मोठा आणि वर्दळीचा रस्ता म्हणजे ताराबाई रोड. महाद्वार आणि ताराबाई रोडचा संगम अंबाबाई मंदिराच्या समोर होतो. आणि कायम या दोन रस्त्यावर गर्दीचा प्रवाह वाहत राहतो. ताराबाई रोड खूप वर्दळीचा आहे. उलाढालीचा आहे आणि एक नव्हे दोन नव्हे तब्बल 82 वर्षे कोल्हापूरकरांच्या पायाखालचा आहे. पण आम्ही त्यांना माहित नाही हा ताराबाई रोड म्हणजे एक अतिशय छोटासा बोळ होता. आणि तो मोठा करण्यासाठी जवळजवळ वीस ते पंचवीस वाडे व जुन्या घरावर त्यासाठी हातोडा पडला आहे. या रस्त्यावर पूर्वी वाडे होते याचा सांगूनही पटणार नाही असा बदल काळाच्या ओघात झाला आहे.
कोल्हापूर शहर अंबाबाई मंदिराच्या अवतीभोवती पसरले आहे. मूळ कोल्हापूर त्यावेळी ब्रह्मपुरी म्हणजे पंचगंगा नदीच्या काठावर होते. पण अंबाबाई मंदिरानंतर अगदी दाटीवाटीने मंदिराच्या आसपासच वस्ती वाढत गेली. ही वस्ती वाढताना जागा मिळेल तशी घरी उभी राहिली. आणि शहरातले काही रस्ते असे अरुंद झाले की त्यातून बैलगाडी ही जाणे अशक्य झाले. असाच रस्ता ताराबाई रोडचा त्याला ताराबाईंचे नाव नंतर दिले गेले. पण ब्राह्मणपुरी अशीच या परिसराची मूळ ओळख होती. लाकडी कौलारू अनेक वाडे एकमेकाला लागून. त्यामुळे अंबाबाई मंदिराकडून थेट समोर रंकाळा तलावाकडे जाण्यासही मोठा रस्ता नव्हता. त्यात मूळ छोट्या रस्त्यावर कपिल तीर्थ आणि खंबाळा अशी दोन तळी होती. गच्च दाटीवाटीने सारा परिसर बांधून गेला होता.
1943 साली मात्र कोल्हापूर नगरपालिकेला जे.पी. नाईक यांच्यासारखा मुख्य अधिकारी मिळाला. आणि त्यांनी दाटीवाटीने गच्च भरलेल्या कोल्हापूरला मोकळा श्वास मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केला. त्यांनी अंबाबाई मंदिर ते पश्चिमेला समोर रंकाळा तलावापर्यंतचा रस्ता मोठा करायचे ठरवले. या मार्गात गोविंदराव सरदेसाई या अतिशय मोठ्या वजनदार व्यक्तींचा वाडा होता. ते आपला वाडा पाडण्यास परवानगी देणार नाहीत. आणि रस्ताही रुंद करून देणार नाहीत अशी हवा तयार झाली होती. पण जे की जे पी नाही हे असे एक अधिकारी होते की, ते नगरपालिकेत फार कमी खुर्चीवर बसायचे. पण बराचसा वेळ शहरात फिरण्यात व नागरिकांच्या अडचणी फिरून समजून घेण्यात घालवायचे. घोळदार चड्डी, शर्ट, टोपी अशा अगदी साध्या पेहरावात असायचे. खिशात खायला शेंगदाणे गुळ ठेवायचे. रस्ता रुंदीकरणाबद्दल रहिवाशांशी ते रोज त्यांच्या दारात जाऊन बोलायचे. ते गोविंदराव सर देसाई यांच्या वाड्यात गेले व त्यांना रस्ता रुंदीकरणाची गरज सांगितली.आणि तुम्ही विरोध करू नका अशी विनंती केली.
सरदेसाई यांनी जे. पी. नाईकांची धडपड पाहिली व त्यांनी मी विरोध करायचाच ठरवला तर माझ्या वाड्याची वीटही हलणार नाही व इतर वाडेही पाडू देणार नाही. पण तुमची धडपड पाहून मी कधीच विरोध करणार नाही असे सांगितले. व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले घरे पाडण्याचा चक्क समारंभ आयोजित करण्यात आला. 16 डिसेंबर 1943 रोजी संस्थांचे कायदामंत्री बॅरिस्टर केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ झाला. ताराबाई रोड तयार करण्यासाठी ज्यांची घरे पाडण्यात येणार होती त्यांचा सन्मान करण्यात आला. जे .पी. नाईक यांच्यासारख्या कुशल अधिकाऱ्याचा यात 100 टक्के वाटा राहिला. त्यामुळे आजही कोल्हापूरच्या विकासात जे पी नाईक यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यानंतर जे नाव घेतले जाते ते दुसरे प्रशासक द्वारकानाथ कपूर यांचे. ताराबाई रोड तयार करत असताना त्यात सरदेसाई, सेवेकरी, वैद्य मैंदर्गीकर, खांडेकर ,कसबेकर जाधव, लिमये, मुंडले, बापट, डॉक्टर परदेशी, डॉक्टर देशपांडे, गुळवणी यांचे वाडे घरे पाडली गेली. कपिलतीर्थ व बाबू जमाल दर्ग्यासमोरचे खंबाळा तळे बुजवले गेले. कपिल तीर्थ तळे होते त्या ठिकाणी आज कपिल तीर्थ मंडई आहे. आणि खंबाळा तलाव जेथे होते तेथे लक्ष्मी ,सरस्वती टॉकीज व आता बहुमजली पार्किंग आहे .आता ताराबाई रोड म्हणजे मोठ्या वर्दळीचा रस्ता आहे. मोठी उलाढाल आहे. कोल्हापुरातला तो मोठा रस्ता आहे. बाजारात नव काही आलं की ते ताराबाई रोडवर पाहायला मिळणारच हे ठरलेले आहे. पण ताराबाई रोडची चर्चा करताना एका छोट्या बोळाचे रुपांतर ताराबाई रोड मध्ये कसे झाले, हे या पिढीला किंवा कोल्हापूरकरांना माहीत असणे गरजेचे आहे.