For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

असे सुरू झाले कोल्हापुरात लॉ कॉलेज

12:51 PM Aug 14, 2025 IST | Radhika Patil
असे सुरू झाले कोल्हापुरात लॉ कॉलेज
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशीद :

Advertisement

साधारण 1932 चा काळ. त्या काळात देशात अगदी हाताच्या बोटावर मोजता येणारी लॉ कॉलेज होती आणि काळाची गरज ओळखून छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापूरसाठी कॉलेज काढायच्या दृष्टीने जाणकारांशी चर्चा सुरू केली. त्यांनी अॅड. ए. बी. चौगुले जे कोल्हापूर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांना लॉ कॉलेज सुरू करण्यासंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यांनी तसा अहवाल सादर केला. लॉ कॉलेजची कोल्हापुरात आवश्यकता का आहे, याबद्दल रावबहादुर चौगुले यांनी काही मुद्दे सुचवले होते. राजाराम महाराजांनी अहवाल पाहिला आणि आधी आपल्यापासून काहीतरी सुरुवात म्हणून लॉ कॉलेज सुरू करण्यासाठी 29 हजार रुपयांचा निधी दिला.

सुरुवात तर चांगली झाली होती. पण लॉ कॉलेजला बॉम्बे युनिव्हर्सिटी आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी यांच्या संमतीची गरज होती. मात्र हे कॉलेज सुरू करण्यासाठी प्रत्यक्षात छत्रपती राजाराम महाराजांचे प्रयत्न आणि त्यांचे या कॉलेजला असलेले पाठबळ पाहून बॉम्बे प्रेसिडेन्सी, बॉम्बे युनिव्हर्सिटी या दोघांनीही या कॉलेजला संमती दिली. त्याची राजपत्रात घोषणा राजाराम महाराजांनी केली. कॉलेज चालवण्यासाठी द कौन्सिल ऑफ लिगल एज्युकेशन ही संस्था स्थापन केली. सात सदस्यांची ही समिती होती. त्यांनीच या लॉ कॉलेजचे व्यवस्थापन पाहायचे होते.

Advertisement

17 जून 1932 रोजी या कॉलेजला संस्थानची तोफखाना ही इमारत राजाराम महाराजांनी खुली करून दिली. पण काही दुरुस्त्या कराव्या लागणार होत्या. तोपर्यंत हे कॉलेज आता शाहूपुरीत बी. टी. कॉलेज जेथे आहे तेथे सुरू होते. त्यानंतर ते तोफखान्यात आले. तोफखाना म्हणजे बिंदू चौकात कॉमर्स कॉलेज जेथे आहे ती जागा. पहिल्याच वर्षी या कॉलेजमध्ये 140 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यात कोल्हापूरबरोबरच म्हैसूर, बेळगाव, रत्नागिरी, सोलापूर आणि खानदेशमधून ही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

17 जून 1932 ला कॉलेज सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात उद्घाटन 2 नोव्हेंबर 1933 रोजी तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचे राज्यपाल सर फ्रेडरिक साईक्स यांच्या हस्ते झाले. या साईक्सचे नाव कॉलेजला दिले गेले. साईक्स लॉ कॉलेज या नावाने लॉ कॉलेज कोल्हापुरात ओळखले जाऊ लागले. राजारामपुरीच्या विस्तारीकरणानंतर याच साईक्सचे नाव साईक्स एक्स्टेंशन  झाले.

साईक्स लॉ कॉलेजचे पहिले प्राचार्य बॅरिस्टर केळवकर होते. आणि इतर समित्यांवर ज्ञानी मंडळीच होती. समिती करायची असेल तर माझे नाव घाला, त्याचे नको, असला प्रकारच कधी या कॉलेजसंदर्भात झाला नाही. ज्याला ज्या क्षेत्रातले कळते त्याला समितीवर स्थान, असे समिती स्थापन करताना अगदी स्पष्ट धोरण होते.

पण स्वबळावर हे कॉलेज चालवणे पुढे-पुढे अडचणीचे होऊ लागले. विद्यार्थ्यांच्या फीमधून कॉलेज सुरू राहिले, पण कोल्हापूर संस्थांनचे वेगळेपण असे, की कॉलेज बंद करण्याचा विचारही त्यांनी मनात आणू न देता हे कॉलेज कोल्हापूर संस्थानने चालवायचा निर्णय घेतला. विलिनीकरण होईपर्यंत हे कॉलेज बॉम्बे प्रेसिडेन्सीने रखडत रखडत चालवले आणि एके दिवशी कॉलेज बंदचा निर्णय घेतला. पण कोल्हापूरच्या नागरिकांनी कौन्सिल ऑफ लीगल एज्युकेशन ही नवी संस्था सुरू केली. 17 फेब्रुवारी 1951 रोजी नवीन घटना केली. बॉम्बे प्रेसिडेन्सीने त्यांच्याकडील फर्निचर आणि पुस्तके या कॉलेजला दिली आणि संस्थांनी तोफखाना ही इमारत अगदी अल्प दरावर या कॉलेजसाठी दिली. त्या वेळचे जिह्याचे नेते रत्नाप्पा कुंभार यांनी या कॉलेजला आत्ताची जागा अतिशय अल्प दरात मिळवून दिली. या कॉलेजमध्ये दोनच पूर्णवेळ प्राध्यापक होते. पण कोल्हापुरातील जाणकार ज्येष्ठ वकिलांनी मानद प्राध्यापक म्हणून सेवा दिली. आज हे कॉलेज राजारामपुरीतील जनता बाजार चौकात आहे आणि कायद्याचे ज्ञानदान तेथे सुरू आहे. कोल्हापूर संस्थान शिक्षणाबद्दल किती जागरूक होते, याचे हे शहाजी लॉ कॉलेज हे एक उदाहरण आहे.

  • पहिले विद्यार्थी शहाजी महाराज

शहाजी छत्रपती महाराज हे या लॉ कॉलेजचे पहिले विद्यार्थी. त्यांच्याच नावाने ही कॉलेज सुरू आहे.

  • एक मोठी दुर्घटना

शहाजी लॉ कॉलेज आता जेथे भरते. तेथे त्यापूर्वी हे कॉलेज बागल चौकातील बी. टी. कॉलेज येथे सुरू होते. त्यावेळी शेजारच्या एका इमारतीचा पाया काढताना सुरुंग लावून दगड फोडला जात होता. त्यातला एक दगड स्फोटामुळे उंच उडून तो कॉलेजच्या कौलावर पडला आणि कौले फुटून दगड खाली वर्गात पडला. त्यावेळी एस. पी. सावंत त्या वर्गात तास घेत होते. त्यांच्याच डोक्यात हा दगड पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

  • उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती याच कॉलेजचे विद्यार्थी

माजी उपराष्ट्रपती आणि कर्नाटकचे काही काळ मुख्यमंत्री असलेले बी. डी. जत्ती हे याच कॉलेजचे विद्यार्थी .

  • लॉ कॉलेजचे पहिले प्राध्यापक

एस. के. केळकर, के. एन. पंडित, आर. पी. करंदीकर, व्ही. आर. करंदीकर, एस. जी. दाभोळकर, बी. के. दळवी, के. आर. आपटे, एस. पी. सावंत.

Advertisement
Tags :

.