गेली १६ वर्षे चाललेल्या पर्यावरण चळवळीचे हे मोठं यश
डॉ . जयेंद्र परुळेकर , संदीप सावंत यांची प्रतिक्रिया ; सावंतवाडी , दोडामार्गातील २५ गावे इको सेन्सिटिव्ह यादीत
सावंतवाडी । प्रतिनिधी
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने सावंतवाडी , दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे इको सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर केली आहेत.त्यामुळे गेली सोळा वर्षे चाललेल्या पर्यावरण चळवळीचे हे मोठं यश आहे. न्यायालयात लढा दिलेल्या वनशक्ती फाउंडेशन या संस्थेचे आम्ही सदर पंचवीस गावांतील ग्रामस्थ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी जनतेच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ . जयेंद्र परुळेकर आणि संदीप सावंत यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला हा जैवविविधतेने नटलेला निसर्ग संरक्षित होईल अशी आशा आहे. परंतु , उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सावंतवाडी तालुक्यातील १३ गावांमध्ये आणि संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात वृक्षतोडबंदी असून देखील बेसुमार वृक्षतोड अजूनही सूरूच आहे हे दुःखदायक आहे. केसरी फणसवडे,सरमळे,कोलझर,फुकेरी अशा अनेक गावांमध्ये शेकडो एकर जमिनीवर वृक्षतोड झालेली आहे आणि होत असून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे त्यामुळे लवकरच याबाबत कोर्टाच्या निर्णयाच्या अवमाना संदर्भात याचिका दाखल करण्यात येईल असे जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले . दोन दिवसांपूर्वी आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यात होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडी संदर्भात आणि वाढत चाललेल्या वन्यजीव आणि ग्रामस्थ या मधील संघर्षा संबंधी विधीमंडळाचे लक्ष वेधले .जिल्ह्यातील वन खात्याच्या भोंगळ कारभारावर कडक ताशेरे देखील ओढले आहेत. त्या बद्दल जिल्ह्यातील जनतेच्या आमदार राणेंचे आभार त्यांनी मानले .गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील तेरा गावांमध्ये वृक्षतोड बंदीचे काटेकोर पालन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती नेमण्याचे आदेश दिले होते. पण ही समिती फक्त कागदावरच राहिलेली दिसून येत आहे. सदर टास्क फोर्स समितीने सक्षमतेने आपले कार्य बजावले असते तर एवढी प्रचंड वृक्षतोड झालीच नसती.परंतु ,आता पंचवीस गावांना इको सेन्सिटिव्ह जाहीर केल्यामुळे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग या भागातून नेता येणार नाही असा आशेचा किरण या भागातील सामान्य जनतेच्या आणि पर्यावरण प्रेमी जनतेच्या मनात निर्माण झाला असून नजिकच्या काळात सह्याद्री पायथ्याशी असलेल्या इतर अनेक गावांमध्ये इको सेन्सिटिव्ह निर्बंध लागू व्हावेत या अपेक्षेने कार्यरत राहावे लागेल असे डॉ जयेंद्र परुळेकर ,संदीप सावंत यांनी सांगितले .