हा ऊद्रावतार अनाकलनीय!
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) डॉक्टर तथा कॅज्युअल्टी वैद्यकीय अधिकारी डॉ. ऊद्रेश कुर्टीकर यांचा अनेक रुग्ण तसेच गोमेकॉचा कर्मचारीवर्ग आणि डॉक्टर्स यांच्यासमोर ज्या पद्धतीने पाणउतारा केला आणि अत्यंत अवमानास्पद शब्द वापरले हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे, शिवाय तो मंत्रीपदाला अशोभनीयच आहे. डॉ. ऊद्रेश कुर्टीकर यांच्यावर अतिदक्षता विभागात कामाचा ताण असतो. तरीदेखील ते अति मेहनतीने संयमाने काम करीत असतात. ज्या व्यक्तीने तक्रार केलेली होती त्यांची तक्रार मान्य करावी आणि त्याच अनुषंगाने एक तर डीन किंवा तत्सम अधिकाऱ्यांना सांगून संबंधित डॉक्टरला समज द्यावी. मंत्र्यांनी कायदा हातात घेऊ नये. मंत्री जरी खात्याचे प्रमुख असले तरी संबंधित अधिकारी हे मंत्र्याच्या हाताखाली काम करत नाहीत, तर ते गोमेकॉचे डीन यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतात. मंत्री आपल्या खात्यामध्ये लक्ष देऊ शकतात, परंतु जे काम अधिकाऱ्यांनी केले पाहिजे ते मंत्र्यांनी करायचे नसते. मंत्र्यांचे अधिकार वेगळे आणि अधिकाऱ्यांचे अधिकार वेगळे. आपणच त्या खात्याचा मालक आहे, अशा पद्धतीने जर एखादा मंत्री गैरसमज करून घेऊन वागत असेल तर मग त्याला जनक्षोभाला सामोरे जावे लागेलच. आपल्याकडून चूक झाली हे मंत्री विश्वजित राणे यांनी अगोदर मान्य केले पाहिजे आणि चूक झाली असेल तर माफी मागायला कोणतीही हरकत नाही. कारण मंत्री राणे यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली ती साऱ्या देशाने पाहिली. कोणीही कितीही मोठा असू दे, मंत्री राणे यांचे कोणीही समर्थन करूच शकत नाही, जर संबंधित आरोग्याधिकाऱ्याचे काही चुकले असेल आणि मंत्री राणे यांना त्याला धडा शिकवायचीच जर खुमखुमी असेल तर त्यांनी आपल्या केबिनमध्ये सदर अधिकाऱ्याला बोलावून घ्यावे आणि समज देणे योग्य ठरले असते. शनिवारी गोमेकॉत जो काही प्रकार घडला त्यामध्ये सदर डॉक्टरची चूक या एवढ्या प्रकरणामध्ये दुय्यम ठरली आहे आणि मंत्र्यांनी एवढी मोठी घोडचूक केली की त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली. प्रकरण देशपातळीवर पोहोचले. मंत्री राणे यांनी जी भाषा वापरली ती मुळीच पदाला शोभणारी नाही. काहीवेळा रागाला कान नसतात, डोळे नसतात आणि एकदा राग आला की तो आवरणे अशक्मय होते. इथे नेमके तेच झालेले आहे. एखाद्या ऊग्णाच्या मदतीला राणे गेले ते योग्य आहे, परंतु त्याचवेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला एका ठिकाणी बोलावून त्याला त्याचा जाब विचारला असता तर गोष्ट वेगळी, इथे तर त्यांनी चारचौघांमध्ये ज्या भाषेमधून उपदेशाचे डोस पाजले ते योग्य नव्हते. कोणत्याही गोष्टीला काही मर्यादा असतात आणि या मर्यादेचे पालन उच्च पदस्थानी असणाऱ्या व्यक्तींनी करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे देखील दररोज अनेक तक्रारी येत असतात, परंतु त्यांचा तोल कधी जात नाही. त्यांच्याकडचा हा गुण इतर मंत्र्यांनी घेणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणाने नेमके काय झाले तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे एकंदरीत राजकीय भवितव्य टांगणीला लागले. त्यांच्यावर ज्या पद्धतीने सर्वबाजूने प्रखर टीका होत आहे ते पाहता मंत्री राणे यांनी राजीनामा नको किमान सार्वजनिकरित्या जाहीर माफी मागायला काहीही हरकत नाही. विश्वजित राणे यांनी ज्या पद्धतीने भूमिका बजावली ती पद्धत अत्यंत चुकीची आणि अत्यंत आक्षेपार्ह होती. राणे यांचा डॉ. ऊद्रेश यांच्यासमोरचा ऊद्रावतार पाहता तो असमर्थनीयच आहे. राजकारणातील मंडळींनी आपला तोल कधीही ढळू देता कामा नये. ज्या दिवशी आपला तोल ढळला त्यादिवशी राजकारणामध्ये तुमचे स्थान घसरत जाते. विश्वजित राणे हे अनेक वर्षे राजकारणामध्ये आहेत. त्यांनी आपल्या वडिलांकडून राजकारणाचे धडे, बाळकडू घेतलेले आहे. अलीकडे वर्ष दीड वर्ष ते एवढे देवभक्त बनलेले आहेत की प्रचंड खर्च करून मोठमोठी अनुष्ठाने देखील ते करीत असतात. असे असताना देखील त्यांच्या वागण्यामध्ये जर फरक पडला नाही तर देव त्यांच्यावर प्रसन्न कसा होईल, हे त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. जो प्रकार घडला, आपण फार मोठ्या आवाजाने बोललो आणि जो काही प्रकार आपल्या हातून घडला त्याची आपण पुनरावृत्ती करणार नाही, असे निवेदन मंत्री राणे यांनी केले, याचाच अर्थ आपल्याकडून चूक झाली हे त्यांच्या लक्षात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर डॉक्टरला कोणत्याही परिस्थितीत निलंबित करणार नाही, असे जेव्हा ठासून सांगितले त्यावेळी खरेतर आरोग्यमंत्र्यांना हा एक फार मोठा धक्का बसलेला. मुख्यमंत्र्यांनी प्रक्षुब्ध जनतेला शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनता डॉ. ऊद्रेश कुर्टीकर यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यामुळेच एखादा कोणताही निर्णय घेताना त्याचे कोणते परिणाम होतील याचा अंदाज घ्यावा. बाहेरच्या बाहेर निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतले असते तर कदाचित ही परिस्थिती उद्भवली देखील नसती. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बजावलेली भूमिका योग्य आहे. परंतु आरोग्यमंत्र्यांना जनतेशी कसे वागावे या संदर्भात प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांचे प्रकरण गाजत असतानाच आता आरोग्यमंत्र्यांनी नव्याने भर घातली आणि गोव्यातील भाजपच्या सरकारची जास्तीत जास्तपणे नाचक्की झालेली आहे. जनता शांत असली तरी ती प्रत्येक मंत्र्याकडे, आमदाराकडे त्याचे वागणे, चालणे व बोलणे याकडे लक्ष ठेऊन असते. जनता श्रेष्ठ आहे म्हणून लोकप्रतिनिधी आहेत ही गोष्ट जेव्हा लक्षात येईल किंवा ध्यानात घ्याल तेव्हा कोणाशी कसे वागावे हे राजकीय नेत्यांच्या लक्षात येईल. डॉक्टरांच्या संघटनेने राणे यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी केलेली आहे. राज्यातील डॉक्टर्सनी संप पुकारला तर ऊग्णांचे हाल होतील हे आरोग्यमंत्री राणे यांनी लक्षात घ्यावे. एका ऊग्णाच्या मदतीला जायचे आणि हजारो, लाखो ऊग्णांच्या आरोग्याशी खेळावे, असा प्रकार होऊ नये. यासाठी तातडीने आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांच्या ‘गार्ड’ संघटनेशी बोलणी करुन जोड तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, त्यातून प्रकरण काहीसे निवळत असल्याचे दिसतेय, ते गोव्याच्या हिताचाचेच आहे.