‘मुक्ताई’च्या यात्रेतील छेडछाड
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील खडसे परिवार हा काही साधासुधा, सर्वसामान्य परिवार नव्हे. एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या कन्या महाराष्ट्रातील एका पक्षाच्या महिला आघाडीच्या राज्याच्या प्रमुख आहेत. तर त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. त्याचबरोबर रक्षाताई या एक माता देखील आहेत. त्यांची मुलगी आपल्या मैत्रिणीसह मुक्ताई देवीच्या यात्रेत फिरत असताना त्यांच्या बाबतीत वरील सर्व माहिती जाणणाऱ्या काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी छेड काढण्याचा प्रयत्न केला. वैशिष्ट्या म्हणजे खडसे यांच्या या मुलीसोबत गणवेशातील पोलीसदेखील तैनात होता. त्याने या छेडछाडीला अटकाव करताच गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. हे सगळे झाल्यानंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मात्र, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्यानंतरसुद्धा दोन दिवस या प्रकरणातील संशयिताला अटक करण्यात आली नाही. खुद्द केंद्रीय मंत्री रक्षाताई या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन बसल्या. त्यांनी रौद्ररूप धारण केल्यानंतर पुढची कारवाई सुरू झाली. एकनाथ खडसे यांनी आपल्या नातीला धीर देत या प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. तर त्यांच्या आत्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणांमध्ये विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत, असे म्हटल्यानंतर ते कार्यकर्ते शिंदे सेनेचे असल्याचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांची छायाचित्रे असल्याचे उघड केले. खरे तर जळगावच्या राजकारणात एकेकाळी प्राबल्य असणाऱ्या खडसे परिवाराच्या बाबतीत घडलेली ही घटना संतापजनकच आहे. एका मोठ्या राजकीय परिवाराच्या बाबतीत असे घडत असेल तर सर्वसामान्यांचे काय होत असेल, असा प्रश्न राज्यभर विचारला जात आहे. पण सर्वसामान्यांच्या बाबतीत काय होते ते स्वारगेट बस स्थानकावर एका पिसाट गुन्हेगाराच्या कृतीला बळी पडलेल्या युवतीला भोगावे लागत आहे. त्याने दोन वेळा त्या मुलीवर अत्याचार केला. पण, तेथील कार्यकर्ते वसंत मोरे यांच्या तक्रारीनुसार तिला घटना घडलेल्या दिवसापासून पोलीस वेगवेगळ्या वेळी पोलीस ठाण्यात बोलावतात आणि गुन्हेगारांनी केलेल्या आरोपाबद्दलच माहिती विचारतात. संशयिताकडून पैसे घेतले होते का, झटापट झाली तर कपडे का फाटले नाहीत? असले संतापजनक प्रश्न वारंवार विचारणे आणि रोज चौकशीला बोलावणे, म्हणजे सुद्धा एक प्रकारचा अत्याचारच आहे. मोरे हा जो आरोप करत आहेत तो खरा असेल तर ही खूपच गंभीर गोष्ट आहे. हे सर्व सुरू आहे ते संशयिताच्या वकिलाने आणि त्याच्या पत्नीने केलेल्या दाव्यानुसार. मात्र पोलिसांच्या स्वतंत्र तपासणीत संशयित गाडे याने त्या मुलीचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली होती, हे स्पष्ट झाले आहे. तिने सात हजार ऊपये घेतले, असा आरोप केला जात असला तरी तिची पर्स या काळात पोलीस ठाण्यातच होती. यावरून तरी पोलिसांनी संशयताच्या बाजूने प्रश्न विचारणे चुकीचे होते. या घटनेपूर्वीही एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. त्याला पकडून देण्यात आले होते. मात्र संबंधित महिलेने स्वत:च्या बदनामीला घाबरून त्याच्या विरोधात केवळ चोरीची तक्रार दिली, त्यानंतर मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात सुद्धा याच संशयिताला त्याच्या कुटुंबानेच पाठीशी घातल्याचे पोलिसांचेच म्हणणे असताना अत्याचार झालेल्या मुलीवर आणखी किती अविश्वास दाखवला जाणार? सर्वसामान्य माणसाला घाबरून जगायला लावणारी आणि आपल्यावरील अन्याय निमुटपणे सहन करून मान खाली घालून जायला लावणारी ही व्यवस्था जबाबदार कधी बनणार? हा प्रश्न आहे. हे सगळे त्यावेळी होत आहे, जेव्हा महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू झाले आहे. त्यामुळे याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेत उमटले नाहीत तरच नवल. आता या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी कोण्या मंत्र्याच्या मुलीने यात्रेत जायचेच कशाला? असा सवाल केला नाही म्हणजे मिळवले. राज्यातील सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत काय प्रकार घडत असतील ते या घटनेवरून अधिक स्पष्ट होईल. पॉक्सो अंतर्गत या प्रकरणातील सात संशयितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस ठाण्यात जाऊन बसावे लागले, हे विचार करायला लावण्यासारखे आहे. घर फिरले की घराचे वासे फिरतात, ही म्हण खडसे परिवाराच्या बाबतीत खरी ठरली आहे. भारतीय जनता पक्ष तळागाळातील आणि सर्वसामान्य ओबीसी परिवारांपर्यंत पोहोचवण्याचे काम ज्या एकनाथ खडसे यांनी आयुष्यभर एकनिष्ठेने केले. त्यांच्या कुटुंबावर गेल्या 12-13 वर्षांमध्ये एकामागून एक, अशी अनेक संकटे आली आहेत. त्यातील काही राजकीय होती. तर काही व्यक्तिगत आणि दुर्दैवी. या सर्वांवर मात करून एकनाथ खडसे आजही आपला निभाव लावून उभे आहेत. त्यांच्या सुनेची आणि मुलीची वाट वेगळी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील ज्या सहकारी संस्थांवर खडसेंचे एकहाती वर्चस्व होते तिथे नेते म्हणून भिंतीवर टांगलेली त्यांची तसबीर सुद्धा काही वर्षांपूर्वी खाली उतरवली गेली. मात्र तो राजकीय वाद असल्याने महाराष्ट्राने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ती एका राजकारण्याची लढाई होती. खडसेना त्यातून आपले नेतृत्व सिद्ध करावेच लागणार होते. मात्र सध्याचे प्रकरण हे त्याहून खूपच खालच्या पातळीवरचे आहे. ही छेड जाणूनबुजून काढली गेली की, कोणी काही वाकडे करू शकणार नाही या अति आत्मविश्वासातून ते पोलीस तपासातून बाहेर येईल, याची सूतराम शक्मयता नाही. पण, घडलेली घटना ही महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे, हे निश्चित. राज्यातील आणि देशातील भाजपचे नेते कधी काळी महिलांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत टोकाचे आंदोलन करत होते. त्यांना अशावेळी आपल्या पूर्वीच्या आंदोलनाची आठवण झाली पाहिजे. किमान आपल्या पक्षासाठी 40 वर्षे खर्ची घातलेल्या नेत्यासाठी राहूदे. पण आपल्या पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांसाठी तरी ही वेळ आणू देणे योग्य नव्हते. पण हे आता घडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सर्वसामान्य माणसांना चिंतामुक्त केले पाहिजे. पुण्यातील घटना आणि मुक्ताईनगरमधील ही छेडछाड सर्वसामान्यांना अस्वस्थ करते. शिकणाऱ्या, नोकरी करणाऱ्या मुलींच्या जगण्यावर बंधने लादते. त्यांना एका दहशतीच्या वातावरणात पोहोचवते. मग केवळ सुरक्षितता हा मुद्दा राहत नाही. देवीचे नाव मुक्ताई असले तरी देवीचे रूप मानली जाणारी आधुनिक स्त्राr मात्र बंधनात किंवा जोखडात अडकते, हे गंभीर आहे. ही स्थिती बदललीच पाहिजे.