For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक प्रतिष्ठेची...अस्तित्वाची देखील!

06:35 AM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक प्रतिष्ठेची   अस्तित्वाची देखील
Advertisement

पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील 29 महापालिकांची निवडणूक आज होत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक ही फार महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची ठरते. त्यामुळेच या महापालिकेवर आपला झेंडा फडकावा, यासाठी राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा प्रयत्न आहे तर दुसऱ्या बाजूने अनेक वर्षे आपली सत्ता गाजविणाऱ्या ‘उबाठा’ या उद्धव शिवसेनेने, आपल्या भावाशी ‘मनसे’चे राज ठाकरे यांच्याशी युती करून भाजपला नामोहरम करण्यासाठी बराच प्रयत्न केलेला आहे. सुमारे सहा वर्षानंतर ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुका वारंवार पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत राहिला. अखेरीस या निवडणुका घेणे न्यायालयाने सरकारला भाग पाडले. मुंबई महापालिका निवडणूक ही सर्वात जास्त गाजली. गेला महिनाभर या महापालिकेसाठी निवडणुकीचा प्रचार विविध राजकीय पक्षांनी जोरात सुरू केलेला आहे परंतु सर्वात मोठी लढत ही भाजप-शिवसेना विरोधात ‘उबाठा’ अशीच आहे. ही निवडणूक यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे की, कोण, कोणत्या पक्षाबरोबर आहे, याबाबत जनतेमध्ये फार संभ्रम निर्माण झाले कारण युती सरकारमधील भाजप-शिवसेना हे एकत्र असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सत्तेत सामील असून देखील सरकारच्या विरोधात गेलेले आहे. त्यामुळे ही निवडणूक फार लक्षवेधी ठरत आहे. अजित पवार हे या सरकारमधील उपमुख्यमंत्री आहेत. असे असतानाही त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे महापालिका निवडणुका व त्यांचा निकाल झाल्यानंतर युतीमध्ये बराच मोठा स्फोट होईल, असे मत राजकीय भविष्यकारांनी व्यक्त केले आहे. वैयक्तिक हेवेदावे, त्याचबरोबर एकमेकांच्या भानगडी चर्चेत आणणे, नेहमीप्रमाणे उद्धव आणि राज ठाकरे यांची भन्नाट निवेदने, त्यामुळे उद्विग्न झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पलटवार आणि नेहमीप्रमाणे काय वाटेल ती निवेदने करण्यास प्रसिद्ध असलेल्या खासदार संजय राऊत यांनी केलेली निवेदने, हे सर्व पाहिल्यानंतर या निवडणुका अटीतटीच्या तर होतीलच शिवाय त्या फार निर्णायक ठरणार आहेत. सर्वाधिक जोर हा मुंबई महापालिका निवडणुकीवर आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महापालिकेचा कारभार व त्याची व्याप्ती ही एका मध्यम आकाराच्या राज्यासारखीच आहे. त्यामुळे या महापालिकेवर सत्ता येण्यासाठी शिवसेना-भाजपा आणि ‘उबाठा’ प्रयत्न करणार परंतु निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांचे उणेदुणे काढताना राजकीय नेत्यांनी नैतिकतादेखील पाळली नाही, हे सत्य आहे. मराठी माणूस वाचविण्यास आपणच सिद्ध आहोत, असा दावा ‘उबाठा’ नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी केलेला आहे. त्यांनी ही निवडणूक म्हणजे मराठी माणसांच्या अस्मितेची आहे आणि मराठी माणसांच्या अस्तित्वासाठीची निवडणूक आहे, असे जाहीर केले आहे. दुसऱ्या बाजूने भाजप-शिवसेनेने म्हटले आहे की, ही निवडणूक मराठी माणसांच्या अस्तित्त्वाची नसून ही लढाई ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठीची आहे आणि ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही की, या छोटेखानी राज्य पातळीवरील निवडणुका असल्या तरीदेखील त्या अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये, विशेषत: मुंबईमध्ये मराठी माणसे मागे का पडतात आणि परराज्यातील माणसे तिथे स्थायिक होतात आणि अनेक धंदे-व्यवसाय त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. हा विषय कसा संवेदनशील आहे. त्याला अनेक कंगोरेदेखील आहेत परंतु निवडणुकीच्यादरम्यान मराठी माणूस आणि परराज्यातून आलेली मंडळी, असा जो मतभेद करण्यात आला तोच एक महत्त्वाचा मुद्दा धरून उद्धव-राज यांनी या निवडणुकीच्या तोफा डागल्या, त्या भारतीय जनता पक्षावरच. या निवडणुकीत मतदान करणारे केवळ मराठी माणूसच नाहीत तर महाराष्ट्रात आतापर्यंत स्थायिक झालेली परराज्यातील देखील मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. ही निवडणूक काही राज्य विधानसभेची निवडणूक नाही. ही केवळ महापालिकांची निवडणूक आहे. तरीदेखील या निवडणुकीत राज्य पातळीवरचे विषय हाताळण्यात आले. मराठी माणूस विरोधात पर राज्यातील माणूस आणि खास करून गुजराती माणसांना टार्गेट करून ‘उबाठा’ व ‘मनसे’ या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या आणि त्यांच्या सभांना मिळालेला उदंड प्रतिसाद हा प्रत्यक्षात मतदानामध्ये किती रुपांतरित होतो, हा विषय अलग. परंतु निवडणुका मात्र गाजलेल्या आहेत, निश्चित. महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकींना जर एवढा मोठा दर्जा मिळत असेल तर निश्चितच मानावे लागेल कारण या निवडणुका फार अटीतटीच्या आहेत आणि राजकीय पक्षांसाठी त्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत. यापूर्वीच्या मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीने जिंकलेली होती मात्र दोन्ही पक्ष वेगवेगळे झाले आणि त्यात शिवसेनेची सत्ता कायम राहिली. आजपर्यंत मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा कधी फडकला नव्हता. आता राज्यात भाजपने शिवसेनेबरोबर आघाडी केलेली आहे आणि शिवसेनेमध्ये दोन तट पडले. त्यातील उद्धव ठाकरे यांची ‘उबाठा’ विरोधी पक्षाबरोबर आहे तर शिवसेना शिंदे हा पक्ष भाजपबरोबर युती करून आहे. प्रथमच या निवडणुकीत ‘हिंदुत्व’ हा विषयदेखील प्रामुख्याने खुलेआम जाहीर सभांमधून भाषणातून उघड करण्यात आलेला आहे. अनेक नेत्यांची जीभ या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे घसरलीच. महापालिका क्षेत्रातील मतदार सर्वांच्याच कारभारावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या मतदानात महाराष्ट्रातील सूज्ञ शहरी मतदार नेमकी कोणती भूमिका बजावतो, हे पाहण्याची गरज आहे. या निवडणुकीचा राज्य सरकारवर फारसा परिणाम होणार नाही कारण सरकारकडे बहुमत आहे परंतु या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे थोडी-फार निश्चितच बदलली जातील, यात शंका नाही. निवडणुका महापालिकेच्या परंतु काही राजकीय पक्षांसाठी त्या अस्तित्वाच्या आहेत तर काही राजकीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या देखील आहेत. सूज्ञ मतदारांच्या हातात बरेच काही आहे. त्यामुळेच मतदार सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करतील, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.