अध्यायामध्ये भगवंत ज्ञान व अज्ञान ह्याबद्दल सांगणार आहेत
मनुष्य नेहमी त्याचा स्वार्थ कसा साधला जाईल ह्याचाच विचार करत असतो. जेव्हा स्वार्थाचा विचार प्रबळ होतो तेव्हा माणसाला त्याच्या कर्तव्याचा विसर पडतो. अर्जुनाचेही तसेच झाले होते. नातेवाईकांची वर्तणूक दुष्टपणाची असली तरी त्यांना मारण्याचे पाप आपल्याला लागेल ह्या कल्पनेने त्याने युद्धातून पळ काढण्याचा विचार केला होता. भगवंतांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी त्याला कर्तव्याची जाणीव करून देण्याचे ठरवले. देव जशा पद्धतीने विचार करतात तशा पद्धतीने मनुष्य विचार करू लागला की, त्याची वागणूक नीतिशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होते.
ह्यासाठी मनुष्याची विचारसरणी देवांच्या विचारसरणीशी मिळतीजुळती व्हायला पाहिजे. म्हणजेच मनुष्य विचारांनी देवाशी जोडला जायला पाहिजे. त्यालाच योग असे म्हणतात. जेव्हा एखादी गोष्ट मनासारखी होते तेव्हा माणसाला वाटते योग चांगला म्हणून अशी गोष्ट घडून आली पण हा काही खरा चांगला योग नव्हे तर आपले आणि परमात्म्याचे विचार जुळणे हा खरा योग होय. असा योग जुळून येण्यासाठी भगवंतानी अध्याय दोन ते पाचमधून अर्जुनाला सांख्य, बुद्धि, कर्म, संन्यास आणि आत्मसंयम, असे मार्ग सांगितले आहेत.
आता आपण अभ्यासणार असलेल्या अध्यायाचे नाव ज्ञानविज्ञानयोग असे आहे. सामान्यपणे माणसाला तो शाळा कॉलेजात जे शिकतो किंवा व्यवहार करण्यासाठी जी माहिती आवश्यक असते त्याला ज्ञान म्हणतो पण ती केवळ पोट भरण्याला उपयोगी पडणारी विद्या असते. तिचा आत्मज्ञानाशी संबंध नसल्यामुळे परमार्थात तिला अविद्या असे म्हणतात.
ह्या अध्यायात भगवंत विज्ञान आणि आत्मज्ञान ह्यातील फरक सांगणार आहेत. प्रथम भगवंत विज्ञान म्हणजे विश्वाच्या निर्मितीबद्दल सांगतात. आत्मज्ञानाची अनुभूती ज्याची त्याने घ्यायची असल्याने, ते म्हणतात, अर्जुना विज्ञान म्हणजे काय ते समजून घे आणि त्याव्यतिरिक्त जे उरेल ते आत्मज्ञान असे समज. ज्यांनी हे समजून घेतले आहे ते भगवंताशी जोडले जातात त्यामुळे त्यांची विचार करणेची पद्धत भगवंतांच्या विचार करण्याच्या पद्धतीशी मिळतीजूळती होते. भगवंताशी जोडले जाण्यामध्ये माया आडवी येत असते. म्हणून ते म्हणतात, मायानदी तरुन जाण्यासाठी माझी कास धरा. स्वत:च्या सामर्थ्याने कुणी माया नदी तरुन जाण्याचा प्रयत्न केला तर तो हमखास त्यात गटांगळ्या खाऊन बुडतो.
जे त्यांच्या आश्रयाने राहून त्यांची भक्ती करतात त्यांच्यासाठी ते मायानदीचे पाणी आटवून टाकतात त्यामुळे त्यांचा भक्त हसत हसत माया नदी पार करतो. विश्वाच्या पसाऱ्यात जे लोक रमतात ते भगवंतांना सोडुन अन्य देवांची उपासना करतात त्यांना प्रापंचिक जीवनातल्या हव्या असलेल्या गोष्टी मिळतात. पण कायम टिकणाऱ्या भगवंतांची प्राप्ती होत नाही. जे ज्ञानी भक्त असतात त्यांना मात्र त्यांची प्राप्ती होते. नंतर ते त्यांच्या स्वरूपाबद्दल बोलतात आणि शेवटी सांगतात की, मी सर्वत्र भरून राहिलेलो आहे हे ज्यांच्या ध्यानात येते त्यांना हे जग सोडून जाताना माझे दर्शन होते.
क्रमश: