तिरुवनंतपुरमचे नगरसेवक गोव्यात दाखल
दोन दिवसांत विकास प्रकल्पांचा करणार अभ्यास : भाजपशासित राज्यांना भेट देणार
पणजी : कैक वर्षांचे प्रयत्न आणि प्रतिक्षेनंतर विजय प्राप्त करून मनपात प्रवेश केलेले केरळमधील तिऊवनंतपुरम महापालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक आपल्या नगराध्यक्षांसह शनिवारी गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या या भोटीमागे देशातील सर्व भाजपशासित राज्यांचे अभ्यास दौरे करणे हे प्रयोजन असून त्यातूनच ते दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आले आहेत. सकाळी मोपा विमानतळावर उतरल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी पणजीत भाजप मुख्यालयास भेट दिली. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी मंत्री विश्वजित राणे, महापौर रोहित मोन्सेरात यांची उपस्थिती होती. त्याशिवाय उपमहापौर संजीव नाईक यांच्यासह ऊपेश कामत, करिना शिरोडकर, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार केरकर आदी, पदाधिकारीही उपस्थित होते. सदर नगरसेवकांमध्ये दिलीप कुमार डी, अक्कालकोडी सादीक, आर राज, दिनेश कुमार, प्रदीप कुमार ए, यमुना आर एस, सुमी एस एस, जयंती आरती, सुकन्या ओ, दीपा एस नायर, आर मिनी यांचा समावेश आहे.
आपल्या दोन दिवसांच्या भेटीत हे पथक गोव्यातील विविध विकासकामांचा अभ्यास करणार आहे. त्यात स्मार्ट सिटीसह महत्त्वाचे पायाभूत विकास प्रकल्प, मंदिरे, स्मारके यांचा समावेश असणार आहे. यावेळी बोलताना दामू नाईक यांनी खूप उशिरा का होईना, पण केरळमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे, याचा आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे सांगितले. या यशासाठी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन केले असून देशातील भाजपशासित प्रत्येक राज्याला भेट देऊन हे पथक अभ्यास करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पणजीत भाजप कार्यालयाच्या भेटीनंतर सायंकाळी त्यांनी मनपा कार्यालयात भेट देऊन तेथील कार्याची माहिती घेतली. आज दिवसभरात ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही भेट घेतील, शिवाय श्री. राणे यांच्या कार्यालयात त्यांच्यासाठी पालिका कार्यपद्धतीवर सादरीकरणही करण्यात येणार आहे, असे नाईक यांनी सांगितले.