'तुम्ही खोटे बोलता, पैसे का देत नाही, तुम्हाला आता दाखवितो,' तीस हजार परत न दिल्याने सराईत गुन्हेगाराने पेटवले घर
कोल्हापूर: हातउसने घेतलेले ३० हजार रुपये परत न दिल्याच्या रागातून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार उमेश श्रीमंत साळुंखे याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. या आगीत घरातील सोफा सेट जळून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अशोक मारुती पोवार, (वय ६५, रा. नवशा मारुती मंदिराजवळ, शाहूनगर, कोल्हापूर) त्यांचा मुलगा मयूर अशोक पोवार याने उमेश श्रीमंत साळुंखे, (वय २८, रा. यादवनगर) याच्याकडून ३० हजार रुपये हातउसने घेतले होते. ते पैसे वेळेत परत न केल्याने आरोपी उमेशने बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी फिर्यादीच्या घरात जाऊन त्याने पैशाची मागणी केली. फिर्यादी यांनी आज पैसे मिळाले नाहीत, उद्या देतो असे सांगताच आरोपी संतापला. 'तुम्ही खोटे बोलता, पैसे का देत नाही, तुम्हांला आता दाखवितो,' अशी धमकी देत त्याने घर जाळण्याच्या उद्देशाने हातातील बाटलीतील पेट्रोल हॉलमधील सोफा सेटवर ओतले. खिशातून काडेपेटी काढून काडी पेटवून ती सोफा सेटवर टाकली. यात सोफा सेट पूर्णपणे जळून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेनंतर फिर्यादी अशोक पोवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उमेश साळुंखे सराईत गुन्हेगार
आरोपी उमेश साळुंखे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर राजारामपुरी पोलीस जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गर्दी जमवने, मारामारी, चोरी तसेच संघटीत गुन्हेगारी (मोक्का) असे गुन्हे दाखल आहेत.
