तीस कारखान्यांची धुराडी पेटली
साडेपाच लाख टन ऊस गाळप
विधानसभा निवडणुकीनंतर गळीत हंगामास गती : 70 हजार ऊसतोड मजूर दाखल
कोल्हापूर
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील गळीत हंगामाला गती प्राप्त झाली आहे. कोल्हापूर विभागातील तीस साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून सुमार साडे पाच लाख टनहून अधिक ऊसाचे गाळप झाले आहे. पाच लाख साठ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले असून 8.70 टक्के साखर उतारा राहिला आहे.
गळीत हंगाम दरम्यानच राज्यात विधानसभा निवडणुका लागल्याने जिल्ह्यातील साखर हंगामाकडे दुर्लक्ष झाले. बहुतांश साखर कारखानदारच उमेदवार असल्याने ते प्रचारात व्यस्त राहिले. त्यामुळे कारखान्यांची धुराडी पेटली पण गाळपाने गती घेतली नाही. प्रचार, मतदान प्रक्रियेनंतर शनिवार 23 रोजी झालेल्या मतमोजणीनंतर ऊस गाळपाने गती घेतली आहे. कर्नाटक राज्यात साखार कारखाने सुरु झाले असून सीमाभागातील ऊस गाळप जोमात सुरु आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप ऊस तोडणीला सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विशेषता पूरबाधित क्षेत्रातील ऊसाचे वेळेत गाळप होणे आवश्यक आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 40 हजार हेक्टरवरील ऊसाला महापुराचा फटका बसला आहे. त्यामुळे पूरबाधित शेतकऱ्यांना वेळेत गाळप होणार का याची चिंता लागून राहिली आहे.
कोल्हापूर विभागात 40 साखर कारखाने आहेत. यापैकी 30 कारखान्यांनी हंगाम सुरु केला आहे. जिल्ह्यात ऊसाला वाढ चांगली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे एक लाख 40 हजार हेक्टर तर सांगली जिल्ह्यात एक लाख 37 हजार हेक्टर ऊसाच्या नोंदी झाल्या आहेत. ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यातून 80 हजार मजूर येतात. पण यंदा हंगाम लांबल्याने अनेक मजूर कर्नाटकमध्ये गेले आहेत. सध्या 70 हजार मजूर दाखल झाले आहेत. तर स्थानिकचे 50 हजार मजूर ऊस तोडणीत व्यस्त आहेत.