तिसरी आघाडी, गणित बदलणार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका अगदी उंबरठ्यावर उभ्या आहेत.निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी कार्यक्रम जाहीर करेल व आचारसंहिता लागू होईल अशी स्थिती आहे. राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा गट यांची महायुती विरुद्ध कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची महाआघाडी असा सामना आहे. युती आणि आघाडी यांच्यात जागावाटप बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. या निवडणुकीत मनसे सर्व 288 जागा स्वतंत्र लढवणार अशी घोषणा झाली आहे. मनसेने काही उमेदवार जाहीरही केले आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनीही सर्व जागा लढवणार अशी घोषणा केली आहे. वंचीत मार्फत प्रकाश आंबेडकर काय करणार हे बघावे लागेल. आघाडी आणि युतीतील बंडखोर शांत राहतील अशी स्थिती नाही. अशावेळी राज्यात तिसरी आघाडी ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने आकारली आहे, आणि ती निवडणुकीत गेम चेंजर ठरेल. महाराष्ट्रात निवडणुकीचे गणित बदलवेल असे मानले जाते आहे. लोकसभेला महाराष्ट्रात महायुती व महाआघाडीत जेमतेम एक ते दीड टक्के मताचा फरक होता. बहुतेक लढती थेट होत्या. विधानसभा निवडणुकीत तसे चित्र राहणार नाही. सर्वत्र बहुरंगी लढती होतील आणि प्रमुख सहा पक्ष व परिवर्तन आघाडी, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर वगैरे भिडू एकमेकांना भीडतील. याचा काही ठिकाणी महायुतीला फायदा शक्य आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रत्येक निवडणुकीत निरनिराळे प्रयोग केले आहेत. काही प्रयोग फसले काही साधले. यावेळी त्यांच्या पुढाकाराने प्रहार संघटनेचे बच्चू कडू, स्वराज्य संघटनेचे नेते युवराज संभाजीराजे छत्रपती, वामनराव चटप आणि राज्यातील छोट्या मोठ्या स्थानिक संघटना यांना एकत्र करुन तिसरी आघाडी आकारली आहे. प्रकाश आंबेडकर यांना व अन्य छोट्या पण एक दोन जिह्यांमध्ये प्रभावी असलेल्या संघटनांना त्यांनी आमंत्रित केले आहे. एकुणच छोटे पाकीट बडा धमाका करण्याचा त्यांचा विचार आहे. या तिसऱ्या आघाडीत काही बंडखोर सामिल झाले तर नवल नको. एकुणच या तिसऱ्या आघाडीने महाआघाडी व महायुतीचे गणित बिघडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे, महायुतीचे तीन पक्ष, महाआघाडीचे तीन पक्ष, राज ठाकरे, मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर यांच्या शक्ती आणि नव्याने आकाराला आलेली तिसरी आघाडी तथा परिवर्तन महाशक्ती अशा बहुरंगी लढती अपेक्षित आहेत. जे सर्वे येत होते व आहेत ते महाआघाडी सत्ता मिळवणार असे आहेत. हे सर्वे सर्वेच असतात याचा लोकसभा निवडणुकीचा अनुभव ताजा आहे. तथापि शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आता महाआघाडीची सत्ता येणारच असे गृहीत धरुन बोलू वागू लागले आहेत. कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगले यश मिळाले, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम राहिला या पार्श्वभूमीवर व सर्वे पाहून या मंडळींनी मोठा भाऊ व मुख्यमंत्रीपदाचा चेहरा या वरुन वाद आरंभला आहे. कॉंग्रेसने आम्हीच मोठा भाऊ आणि मुख्यमंत्री आमचाच असे जाहिरपणे सांगितले आहे तर शरद पवारांनी आधी भाजपाला खाली खेचू मग ठरवू मुख्यमंत्री कोण. ज्याचे जास्त आमदार तो पक्ष मोठा भाऊ व मुख्यमंत्री त्यांचा, अशी भूमिका मांडली आहे. महाआघाडीत अशी धुसफूस सुरू असताना ही तिसरी महापरिवर्तन आघाडी निवडणुकीत उतरल्याने आता लढाई सोपी नाही हे महाआघाडी व महायुतीला लक्षात आले आहे. ही तिसरी आघाडी नावाप्रमाणेच परिवर्तन महाशक्ती ठरू शकते, महाआघाडीचे नेते आणि त्यांचे विचारवंत, डावे, पुरोगामी वगैरे या परिवर्तन शक्तीला भाजप बी टिम म्हणू लागले आहेत. आघाडीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी, मत खाण्यासाठी ते उभे राहत आहेत असा युक्तिवाद केला जात आहे पण तो तितकासा खरा नाही. ही आघाडी कुणाला पाडण्यासाठी नव्हे तर परिवर्तनासाठी मैदानात उतरली आहे. बच्चू कडू अमरावती भागात चांगली कामगिरी करु शकतात, राजू शेट्टी व युवराज संभाजीराजे कोल्हापूर, सांगलीत प्रभाव दाखवू शकतात. जरांगे आणि प्रकाश आंबेडकर व शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे या परिवर्तन महाशक्तीत सहभागी होऊ शकतात. तशा चर्चाही सुरु आहेत. तसे झाले तर मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथेही निवडणूक फिरु शकते. मूळात ही निवडणूक काटे की टक्कर असणार आहे. कुणीही एक पक्ष तीन आकडी स्कोअर करेल असे वाटत नाही. अशावेळी परिवर्तन आघाडी निर्णायक ठरु शकते. मतमोजणीनंतर कोण कुणाचा हात धरेल आणि कोण 145 ही मॅजिक फिगर संघटीत करेल हे आज सांगणे कठीण आहे. ओघानेच तिसरी आघाडी अर्थात परिवर्तन महाशक्ती मॅजिक फिगरसाठी महत्वपूर्ण ठरु शकते. परिवर्तन आघाडी साकारायला थोडा उशीर झाला आहे पण राजू शेट्टी, बच्चू कडू कसलेले राजकारणी आहेत. युवराज संभाजीराजे युवकात लोकप्रिय आहेत. ओघानेच या परिवर्तन शक्तीमुळे निवडणूक रिंगणात नवा रंग आला आहे. ही आघाडी मत खाण्यासाठी उभी केली आहे असे जर कुणाला वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. निवडणूक मैदानात आणि सत्ता स्थापनेत परिवर्तन महाशक्तीची भूमिका महत्त्वाची ठरेल असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा फरक असतो. अजितदादा पवार आणि उद्धव ठाकरे महायुती व महाआघाडीत गुदमरल्यासारखे वाटत आहेत. मैदान उभे राहीपर्यंत अनेक बदल होणार हे सांगायला नको. तूर्त परिवर्तन महाशक्तीमुळे राजकारणाची दिशा बदलली आहे. रोज वातावरण बदलत आहे. बदलापूर घटनेतील आरोपीचे झालेले
एन्काऊंटर आणि सिंधुदुर्गमध्ये किल्यावर पन्नास फूट उंच व मजबूत पुतळा उभा करणेची घोषणा महायुतीला फायदेशीर ठरली आहे. असं जरी असलं तरी सध्याला कुणालाच निर्णायक विजयाची खात्री दिसत नाही. मतमोजणीनंतरचे मॅनेजमेंट ज्याला जमणार त्याचे साधणार हे पक्के आहे, तूर्त परिवर्तन महाशक्तीमुळे निवडणूक गणितात बदल झाले आहेत.