Satara News : सातारा शहरातील सुरक्षा वाढीसाठी ‘तिसरा डोळा’ प्रकल्प; १५० हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे बसणार
सातारा शहरात हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा वाढवणार
सातारा : सातारा शहर आणि उपनगरांतील वाढत्या चोऱ्या, चेन स्नॅचिंग आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शहराला पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी सातारा पोलीस आणि नगरपालिकेने संयुक्तपणे 'तिसऱ्या डोळ्या'चे पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला असून, शहरात १५० हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर आणि पालिकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा जिल्हा नियोजन समितीकडे (DPDC) मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वारे, गल्लीबोळ आणि संवेदनशील 'हॉटस्पॉट्स'वर या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चोवीस तास लक्ष ठेवले जाईल.
केवळ सुरक्षाच नव्हे, तर पोवई नाक्यावरील सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू करून वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांवरही ठोस कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. या प्रकल्पामुळे सातारकरांना सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होणार आहे