For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिसरा जिल्हा ‘अटल’; केपे मुख्यालय..!

02:47 PM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
तिसरा जिल्हा ‘अटल’  केपे मुख्यालय
Advertisement

सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय : आज जारी होणार अधिसूचना, फोंडावासीय संभ्रमात 

Advertisement

पणजी : राज्यात तिसरा जिल्हा व्हावा, यासाठी आग्रही असणाऱ्या स्व. रवी नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले असले तरी यातून फोंडा तालुक्याला वगळून आता राज्यात तिसरा जिल्हा ‘अटल’ या नावावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. या तिसऱ्या जिह्याचे मुख्यालय केपे या ठिकाणी असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली. काल मंगळवारी सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत तिसऱ्या जिह्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तिसऱ्या जिह्याला सर्वपक्षीय आमदारांनी सहमती दर्शवली असली तरी तिसऱ्या जिह्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत घाई नको, अशी भूमिका घेतली आहे.

विरोधी आमदारांच्या सूचनांचा विचार करणार

Advertisement

गोव्यात तिसऱ्या जिह्याच्या निर्मितीच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देताना सरकार विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या सूचनांचा विचार करेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. सरकारने नियुक्त केलेल्या समितीने प्रस्तावाची व्यवहार्यता, सीमा, खर्च आणि प्रशासकीय परिणाम तपासला आहे. तिसऱ्या जिह्यामुळे प्रशासन बळकट होईल. सेवा वितरणात सुधारणा होईल आणि केंद्रीय योजनांचा लाभ वाढेल. त्याचा अधिकाधिक लाभ हा ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे. या जिह्याच्या नावाची घोषणा आज बुधवार 31 डिसेंबर रोजी करण्यात येईल. विरोधी आमदारांनी  काही सूचना सादर केलेल्या आहेत. त्याकडे सरकार दुर्लक्ष करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

फोंडावासियांमध्ये संभ्रमावस्था 

ग्रामीण भागासाठी फोंडा हे मध्यवर्ती ठिकाण असून, फोंडा तालुका हेच तिसऱ्या जिह्याचे मुख्यालय असावे, अशी माजी मंत्री स्व. रवी नाईक यांची मागणी होती. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यापर्यंत फाईल पाठविण्याची भूमिका स्व. रवी नाईक यांनीच बजावली होती. तरीही तिसऱ्या जिह्यात फोंडा तालुक्याचा समावेश न केल्याने फोंडावासियांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. फोंडा तालुका हे तिसऱ्या जिह्याचे मुख्यालय करून सरकारने स्व. रवी नाईक यांना सरकारने खरी आदरांजली द्यायला हवी होती, असे फोंड्यातील नागरिकांतून बोलले जात आहे.

 विरोध नाही, पण समितीचा अहवाल तपासावा

विधानसभा अधिवेशनात तिसऱ्या जिह्याबाबत दीर्घकाळ चर्चा करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या जिह्याच्या अभ्यासासाठी सरकारने समिती स्थापन केली. या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच सरकारने तिसऱ्या जिह्याचे नामकरण केलेले आहे. तिसऱ्या जिह्याला विरोध नाही. परंतु याचा अभ्यास व्हायला हवा. कारण समितीचा अहवाल उघड होण्यापूर्वीच निर्णय घेणे योग्य नाही.

- युरी आलेमाव (विरोधी पक्षनेता)

तिसऱ्या जिह्याबाबत आनंद

ग्रामीण भागातील प्रशासकीय कामांसाठी कित्येक किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. आता दुर्गम ग्रामीण भागातील लोकांसाठी स्वतंत्र असा तिसरा जिल्हा स्थापन होणार असल्याने या निर्णयाबाबत आनंद आहे. तिसऱ्या जिह्यात सावर्डे, धारबांदोडा, केपे, कुडचडे, काणकोण व सांगे या मतदारसंघांचा समावेश होणार असल्याने दुर्गम मतदारसंघांतील लोकांना याचा लाभ होईल.

- गणेश गावकर (सभापती)

तिसरा जिल्हा सर्व तालुक्यांसाठी लाभदायी

‘धारबांदोडा, केपे, काणकोण व सांगे या चार तालुक्यांचा समावेश करून तिसरा जिल्हा स्थापन करण्यास सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नव्याने स्थापन होणारा तिसरा जिल्हा या सर्व तालुक्यांना शासकीय कामांसाठी लाभदायी ठरेल. लोकांचे त्रास कैकपटीने कमी होतील.’

- रमेश तवडकर (कला व संस्कृतीमंत्री)

समितीचा अहवाल येऊ द्या

सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत तिसऱ्या जिह्याबाबत सरकारने अंतिम निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत विरोध नसला तरी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर सरकारने त्याचा अभ्यास करायला हवा. कारण विधानसभा अधिवेशनात तिसऱ्या जिह्याबाबत दीर्घ चर्चा झाली होती. त्यानंतर समिती स्थापन करून त्याचा अभ्यास करण्याचे ठरले होते. त्याचा विचार सरकारने करावा.

- विरेश बोरकर (आमदार -‘आरजी पक्ष)

Advertisement
Tags :

.