सोहम नाईक विरोधात तिसरे आरोपपत्र दाखल
पणजी : कुडचडे येथील वासनाकांड प्रकरणी सोहम नाईक याच्या विरोधात गुन्हा शाखेने काल सोमवारी तिसरे आरोपपत्र दाखल केले आहे. सोहम नाईकच्या विरोधात याप्रकरणी तब्बल पाच गुन्हे नोंद झाले आहेत. त्यातील दोन गुह्यांमध्ये या अगोदर आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. भारतीय न्याय संहिता (बीएनएस), पॉक्सो कायदा आणि गोवा बाल कायद्याच्या विविध कलमांखाली हे तिसरे आरोपपत्र दाखल केले आहे. तब्बल 200 पानांच्या या आरोपपत्रात 19 साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे समाविष्ट आहेत. हा गुन्हा सुऊवातीला कुडचडे पोलिसस्थानकात नोंदवलेला होता, मात्र तो नंतर गुन्हा शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला. गुन्हा शाखेच्या पथकांनी फॉरेन्सिक आणि वैद्यकीय पुराव्यांवर मोठ्या प्रमाणावर भर दिला. ज्यात कथितरित्या जप्त केलेले डिलीटेड व्हिडिओ, फोटो आणि मोबाईल डेटा यांचा समावेश आहे.
पहिले आरोपपत्र बाल न्याय मंडळासमोर (जेजेबी) 158 पानांचे दाखल केले होते, ज्यात 19 साक्षीदारांची नावे आहेत. कथित गुह्याच्या वेळी आरोपी आणि पीडित दोघेही अल्पवयीन असल्याने, हे आरोपपत्र नियमित आरोपपत्राऐवजी बाल न्याय अहवालाच्या स्वरूपात दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलगी इयत्ता दहावीत शिकत होती, तेव्हा ती सोशल मीडियाद्वारे सोहमच्या संपर्कात आली. त्या दोघांमध्ये कथितरित्या मैत्री झाली, ज्यानंतर नाईकवर तिचे लैंगिक शोषण केल्याचा आणि त्या अश्लील कृत्याचे चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. वैद्यकीय पुराव्यांनी लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या विरोधात गोळा केलेल्या पुराव्यांचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. गुन्हा शाखेने वेर्णा येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत तपासणीनंतर जप्त केलेले मोबाईल न्यायवैद्यक पुरावे देखील आरोपपत्रात जोडले आहेत. दुसऱ्या आरोपपत्रात गुन्हा शाखेने 25 साक्षीदार आणि इलेक्ट्रॉनिक व कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे 140 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.